सत्य करी आपुलें वचन
919.
सत्य करी आपुलें वचन । आमुचे करी बंधमोचन । आमुचे विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥
इंद्रबारी चंद्र कर्हेरी । यम पाणी वाहे घरोघरी । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथे करी दळाकांडा ॥२॥
अश्विनी देव दोन्ही । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥
मारको केली तरळी । सटवी बाळाते पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥
मैराळ देव कानडा । करी राक्षसांच्या दाढ । आरसा न दाखवी ज्यापुढा । तो रोकडा बुकाली ॥५॥
विघ्न राहुं न शके ज्यापुढे । तो गणेशबापुडें । गाढवांचें कळप गाढे । एका जनार्दनी वळीत ॥६॥
