॥ श्रीएकनाथमहाराजकृत
9.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ अध्याय नववा ॥
वानरसेनेला श्रीरामदर्शन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सुग्रीव श्रीरामांना वानरसेनेचा विस्तार समजावून सांगतो :
सुग्रीवे विनविला रघुवीर । सैन्य सेनानी सेनाधर ।
सैन्ययूथपाळ महावीर । नमस्कार करू पाहती ॥१॥
स्वामि समवेत सौमित्र । पहावा वानरांचा संभार ।
ऐकोनि सुग्रीवांचे उत्तर । जाला सादर श्रीराम ॥२॥
यूथपा दशसाहस्रं वृता वानरकोटिभिः ।
वानयैः पार्वतीयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ॥१॥
माझे कटकीं दहा सहस्र । सेनानायक सेनाधर ।
एकएकातळीं कोटि वीर । अति दुर्धर रणयोद्धे ॥३॥
उदयास्तगिरिपर्यंत । वानर आले जी समस्त ।
नंदवनींचे वीर विख्यात । आले त्वरित रामाकार्या ॥४॥
सप्तारण्य सप्तसमुद्र । नदीस्रोत वने उखर ।
तेथोनिया वानरवीर । आले सत्वर रामकार्या ॥५॥
मेरू मंदार आणि विंध्याद्री । वेंकटाद्रि आणि सह्याद्री ।
तेथोनि यावा केला वानरी । निजगजरीं रामकार्या ॥६॥
हिमाचळ अर्बुदाचळ । गंधमादन आणि श्रीशैल ।
पर्वती वानर सकळ । आले तत्काळ रामाकार्या ॥७॥
घेवोनि आपुलाला भार । पृथक् करू येती नमस्कार ।
स्वामीनें पहावे सादर । वानरवीर रणयोद्धे ॥८॥
शतबळीनामा वानर । सेना दशकोटिसहस्र ।
घेवोनिया वानरभार । केला नमस्कार श्रीरामा ॥९॥
हनुमंताचा पिता सावत्र । केसरिनामा महावीर ।
सेना कोट्यनुकोटि वानर । केला नमस्कार श्रीरामा ॥१०॥
वानराचे जातीआंतौता । केसरी अंजनीचा निजभर्ता ।
तो हनुमंताचा क्षेत्रजपिता । येणे ग्रंथार्था सत्यत्व ॥११॥
हनुमंत वायूचा वीर्यज सुतु । केसरी क्षेत्रत्वें पितु ।
दोही बापाचा हनुमंतु । सत्य ग्रंथु वाल्मिकी ॥१२॥
नळ वीरू दहनदीप्त । बालसुर्यासम आरक्त ।
वानरसेना अयुतायुत । वेगे श्रीरघुनाथ वंदिला ॥१३॥
गोळांगूळ असंख्यात । कोट्यनुकोटि लक्षानुलक्ष ।
घेवोनि आला गवाक्ष । श्रीराम संमुख वंदिला ॥१४॥
अभ्रवर्ण अति दुर्धर । धूम्रनामा महावीर ।
घेवोनि सेना शतसहस्र । केला नमस्कार श्रीरामा ॥१५॥
पनस वानर दुर्धर । पर्वतोपम महावीर ।
दशकोटि सहपरिवार । केला नमस्कार श्रीरामा ॥१६॥
मैंद द्विविद दोनी वीर । एका सप्तकोटि परिवार ।
एका अष्टकोटि वानर । केला नमस्कार श्रीरामा ॥१७॥
वीर वानर गंधमादन । साठी कोटि वानरसैन्य ।
घेवोनि आला आपण । केले नमन श्रीरामा ॥१८॥
तार तेजाचा घडिला । की चंद्रबिंबाचा ओतिला ।
तैसा तारवानर शोभला । श्रीरामे देखिला तेजस्वी ॥१९॥
ऐसा तार महावीर । सवे शतकोटि वानरभार ।
घेवोनि आला सत्वर । केला नमस्कार श्रीरामा ॥२०॥
गाळोनि व्योमींची नीळिमा । ओतिली नळाची प्रतिमा ।
सुनीळशोभा प्लवंगमा । जो का श्रीरामा पढियंता ॥२१॥
सेतुबंधाची अनुवृत्ती । याचेनि हाते शिळा तरती ।
हे जाणोनि श्रीरघुपती । करी अति प्रीती नळासीं ॥२२॥
नामे नील वर्णें नीळ । कांस घातली सुनीळ ।
शतसहस्रकोटि दळ । घेवोनि तत्काळ तो आला ॥२३॥
सुग्रीवदळचा दळपती । नीळ दुर्धरप्रतापशक्ती ।
तेणे येवोनि विनीतवृत्ती । श्रीरघुपती वंदिला ॥२४॥
दधिमुख दुराधर्ष दोनी । अकरा कोटि सेना घेवोनी ।
श्रीरामाते अभिवंदोनी । कर जोडूनी राहिले ॥२५॥
तरू तरळ कुमुद कुमुदाक्ष । गज शरभ गवय गवाक्ष ।
महाहनु इत्यादि प्रमुख । यूथप असंख्य पाहो श्रीरामा ॥२६॥
तारेचा पिता वाळीचा श्वशुर । सुषेण वैद्यराज वानर ।
दहा अयुतें वानरभार । केला नमस्कार श्रीरामा ॥२७॥
जांबवंताचा जेष्ठ बंधु । नामे धूम्र पै अगाधु ।
रीससैन्यासीं सन्नद्धु । आला साधू रामाकार्या ॥२८॥
जांबवंत वरि प्रबळ । बाहत्तर कोटि रीस सबळ ।
घेवोनयां निजदळ । आला तत्काळ निजगजरें ॥२९॥
जांबवंत आपण । नित्य करिता रामस्मरण ।
तेचि अस्वलांसी गुणगुण । अनुदिन अहर्निशी ॥३०॥
रामनामाची गुणगुण । तेणे कोंदलें त्रिभुवन ।
महीजीवन पावन । नामे गगन कोंदलें ॥३१॥
देखोनिया जांबवंत वीर । श्रीरामसौमित्रां आल्हाद थोर ।
त्यासी स्वये श्रीरामचंद्र । पुसे विचार निजविजया ॥३२॥
नामापासीं नित्य कीर्ती । नामापासीं नित्य शांति ।
नामापासी विजयवृत्ति । भवनिर्मुक्ति रामानामे ॥३३॥
ऐसे जाणोनि श्रीरघुनाथ । आप्त मानी जांबवंत ।
त्यांसी करोनि नित्य एकांत । निजविजयार्थ साधावया ॥३४॥
ऐसे वानरांचे भार । श्रीरामे देखिले अपार ।
तंव जाला अति गजर । तुरे अपार लागलीं ॥३५॥
ततः पद्महस्रेण वृत्तः शंखशतेन च ।
युवराजोंऽगदः प्राप्तः पितृतुल्यपराक्रमः ॥२॥
निशाणे त्रहाटिली लवलाही । ढोल टिमक्या बुरंगे पाही ।
गिडिबिडिती ठायींच्या ठायी । विराणीं पाही वाजती ॥३६॥
काहळा आणि रणकाहळा । शंख त्राहाटिला भूगोळा ।
महागजर भेरींचा जाला । अंगद झाला युवराजा ॥३७॥
तडक फुटले एकसरें । वोडणें भिंडिमाळांचे पागोरे ।
खाखाइलीं रणतुरें । भुभुःकारें गिरि गर्जे ॥३८॥
पद्म महापद्म जाणा । शंखशब्दे असंख्यगणना ।
अंगदाची वानरसेना । आंगवण दाटुगी ॥३९॥
वृक्ष उन्मूळिले सहसुमनां । श्वेत पीत केतक वानरसेना ।
शालतालवृक्षकर्दळीपाना । ध्वजा संपूर्णा शोभती ॥४०॥
किंशुक फुलले आरक्त । अगस्तिवृक्षीं सुमने श्वेत ।
कांचन फुलले श्वेत पीत । तेणे सैन्यांत अति शोभा ॥४१॥
ऐसा निजसेनासंभार । त्यामाजी अंगद राजकुमार ।
युवराज मनोहर । श्वेतच्छत्र रत्नांक ॥४२॥
कनकदंडयुग्मचारी । आरुढला रथावरी ।
ध्वजीं मुक्ताफळें झालरी । जयजयकारीं चालिला ॥४३॥
हैकार थैकार जैकार । तळपत चमकत चमत्कार ।
वृक्ष झेलिती अपार । देती वानर किराणे ॥४४॥
वानरवीर अति सावध । शालतालशिळायुद्ध ।
महावीर पै उन्नद्ध । सन्नद्ध बद्ध दळभार ॥४५॥
रथ लोटिले घडघडाट । वानरसेनेचा पै थाट ।
वीर चालिले उद्भट । कडकडाट सैन्याचा ॥४६॥
वाजंत्रांचा नाद गंभीर । वानरी केला भुभुःकार ।
दुर्धरदेनानिजसंभार । अंगद वीर पै आला ॥४७॥
वाळिबळें सबळबळ । अंगद आला समदळ ।
वीर परुषार्थी प्रबळ । दुर्धर मेळ युद्धाचा ॥४८॥
सुग्रीव व अंगदाचे स्वागत :
देखोनि अंगदाचा यावा । सुख जाले श्रीराघवा ।
सुख सुग्रीवाच्या जीवा । सुख सर्वा सुरनरां ॥४९॥
अंगदे सांडोनिया रथा । श्रीरामचरणीं ठेविला माथा ।
श्रीरघुनाथही उल्लासता । होय आलिंगिता अंगदासी ॥५०॥
अंगदाकडून सुग्रीवाची स्तुतीः
चुंबोनि अंगदाचें वदन । श्रीरामे दिधले आलिंगन ।
तेणे त्यासी समाधान । सुखसंपन्न श्रीरामे ॥५१॥
केले सुग्रीवासी नमन । सुग्रीवे दिधले आलिंगन ।
अंगदे सुग्रीवा समाधान । सुखसंपन्न श्रीरामे ॥५२॥
सुग्रीवे करविलें वाळिघाता । हा द्वेक्ष नाठवे अंगदाचे चित्ता ।
श्रीरामे उद्धरिला माझा पिता । त्यासी मुख्य कर्ता सुग्रीव ॥५३॥
वाळिजन्मशतांच्या कोडी । सुग्रीवे तोडविली ते बेडी ।
श्रीरामसुखाची निजगुढी । उभविली रोकडी वाळीनें ॥५४॥
आम्ही पावलो श्रीरघुनाथा । हाही सुग्रीवधर्म तत्वता ।
पित्याहूनि अधिक चुलता । आम्हा समस्ता उद्धरिले ॥५५॥
ज्याचेनि पाविजे परमार्था । तोचि माझा सखा पिता ।
सुग्रीवाहूनि परता । सखा सर्वथा मज नाही ॥५६॥
सुग्रीवे वंश उद्धरिला । सुग्रीव वानरसखा अवतरला ।
पुढती सुग्रीवाच्या चरणा लागला । अंगदा जाला वंदिता ॥५७॥
ऐकोनि अंगदाचें वचन । सुग्रीवासी आले रुदन ।
अंगद वंशासीं सुखनिधान । मी सुखसंपन्न अंगदे ॥५८॥
ऐसे सुग्रीव बोलोन । अंगदासी दिधले अलिंगन ।
सभेद द्वेष गेला विरोन । सुखसंपन्न श्रीरामे ॥५९॥
वानरांचा उल्लास व लीला, रामांचा उपहासः
देखोनि अंगदाचा दळभारू । नळनीळादि प्रधान वानरू ।
अवघी केला जयजयकारू । श्रीरामाचंद्र वंदिला ॥६०॥
एक फळ ठेविती श्रीरामापुढें । एक वानर घेवोनि ते उडे ।
संमुख बैसोनि रामापुढें । खाती निवाडे विटंबिती ॥६१॥
वांकुल्या दाविती रामापुढें । डोळे मिचकाविती लक्ष्मणापुढें ।
सुग्रीवा घुलकाविती रोखडें । नाचे उडती किळकिळित ॥६२॥
श्रीरामे हारवोनि सीता । ऐसा ऐसा रडत होता ।
उकसाबुकसी होय स्फुंदता। पडे मूर्च्छित सीते सीते ॥६३॥
वानरचेष्टा श्रीरघुनाथ । देखोनि खदखदा हांसत ।
हांसतां सौमित्र मूर्च्छित । चेष्टायुक्त वानर ॥६४॥
मारुतीची स्तुती :
देखोनि वानरांचे भार । सुखी जाला श्रीरामचंद्र ।
तंव येवोनि पवनपुत्र । केला नमस्कार श्रीरामा ॥६५॥
सुग्रीव सांगे निजनिवाडे । सकळ सैन्य एकीकडे ।
न तुके हनुमंताचेनि पाडे । अति बळ गाढे हनुमंताचे ॥६६॥
हनुमंताच्या बळापुढें । सकळ सैन्य ते बापुडे ।
फोडिलें राहूचें जाभाडें । रवि यापुढें चळी कांपे ॥६७॥
वाळीचे निवारण मारूतीने का केले नाहीः
ऐकोनि सुग्रीवाची मात । श्रीराम जाला विस्मित ।
आतुर्बळी हा हनुमंत । श्रीरघुनाथ स्वये जाणे ॥६८॥
असता निजसखा हनुमंत । तुझा साधावया कार्यार्थ ।
वाळीचा केला नाही घात । तो वृत्तांत मज सांगे ॥६९॥
ऐसे पुसता सुग्रीवासी । तंव तेथे आला अगस्ति ऋषी ।
देखोनि सकळ वानरांसी । भेटे विशेषी श्रीरामा ॥७०॥
अगस्तींचे आगमन व रामांच्या प्रश्नाला उत्तर :
पर्वविशेषीं स्नानासी । पंपे आला अगस्ति ऋषी ।
देखोनिया श्रीरामासी । आला उल्लासीं भेटावया ॥७१॥
ऋषीस देवोनि सन्मान । श्रीरामे केले अभिवंदन ।
मग बैसवोनि सावधान । केला प्रश्न श्रीरामे ॥७२॥
सुग्रीवसखा हनुमंत । असता अतुर्बळी वीर्यवंत ।
वाळीचा केला नाही घात । तो वृत्तांत मज सांगे ॥७३॥
हनुमंताचे जन्मकथन । नारदे सांगितले संपूर्ण ।
ते मी सांगेन आपण । सावधान अवधारी ॥७४॥
हनुमंताचे जन्मकर्म । बाळपणी अति पराक्रम ।
कथा रम्य मनोरम । श्रोता संपूर्ण श्रीराम ॥७५॥
हनुमंताचे बाळकिराण । ग्रासूं गेला रविबिंब पूर्ण ।
ते कथा परम पावन । एकाजनार्दन विनवीत ॥७६॥
रामायणींचा एक एक श्लोक । वेदशास्राहूंनी अधिक ।
एकले रामनाम एक । होय छेदक जन्ममरणा ॥७७॥
ऐसी रामायणींची कथा । अगस्ति वक्ता श्रीराम श्रोता ।
जन्मप्रयोग हनुमंता । होय सांगता ऋषिवर्य ॥७८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सर्वसुग्रीवसेना श्रीरामदर्शनं नाम नवमोऽध्यायः ॥९॥
॥ ओव्या ७८ ॥ श्लोक २ ॥ एवं ८० ॥
