वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १०, देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१

माझिये हृदयी बुंथी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074875 · अभंग क्र. ३४१

341.
माझिये हृदयी बुंथी ।
ते डोळ्या सगुणप्रीति ।
वाचे नाम संपत्ति ऐसेचि असो ।
म्हणोनि तुझे नाम आवडे ।
हेचि प्रेम न विसंबे वर्म निजध्यास रया ॥१॥
श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी ।
हीच आवडी देई मना ॥२॥
तुझिये सगुण बुंथीचा वासु ।
व्हावा माझ्या हृदयी ऐसा ।
निज सुखाचिया निजध्यास ।
तुझिये आवडी अनुसंधान ।
तुझिया स्वरूपी मन डोळा बैसो ।
का ध्यान हेचि रूप हेचि ।
निज आवडी देई का दातारा ।
चुकवी येरझारा गर्भवासु ॥३॥
म्हणौनि रखुमादेविवरा विठ्ठला ।
उदारा भावे जोडलासी आम्हा ।
श्रुतिपुराणे वर्णिती नेति नेति तुझा महिमा ।
तुझे नाम रूप सुंदर हेचि निरंतर ।
देई आम्हा सर्वोत्तमा रया ॥४॥

अर्थ :
हे श्रीकृष्णा तुझी सगुण मूर्ति नित्य माझ्या अंतःकरणात असावी. त्याच सगुण मूर्तिविषयी डोळ्यांत प्रेम असावे. वाणीमध्ये नामोच्चाराची संपत्ती असावी अशी फार इच्छा असल्यामुळे मला तुझे नाम फार आवडते. याच नामाच्या प्रेमाने मनाला निदिध्यास लागून तुझा कधीही विसर होऊ नये कानांनी नेहमी तुझ्या नामाचे श्रवण करण्याची गोडी धरावी, अशी आवडी माझ्या मनामध्ये उत्पन्न कर. स्वकीय आत्मस्वरूपाच्या निजध्यासाने तुझ्या सगुण मूर्तिचा वास हृदयात नित्य असावा. तुझ्या आवडीचे अनुसंधान तुझ्या स्वरूपांच्या ठिकाणी मनात डोळ्यांत ह्याच रुपाचे सगुण मूर्तिचे दर्शन नित्य असावे, अशी आवडी मला होऊ दे. हे श्रीकृष्ण दातारा वारंवार गर्भवास घेऊन जन्ममरणाराच्या येरझारा कराव्या लागणाऱ्या त्यातून तू मला सोडव. अशी मला बुद्धि उत्पन्न झाली. म्हणून रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, ह्या भावांने आम्हाला तुझी जोड झाली. ज्याचे अंतःकरणांत तुझ्या विषयी भाव नाही. त्यास तुझी प्राप्ती किती कठीण आहे म्हणून सांगू? अठरा पुराणे सहा शास्त्रे साक्षात् श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून तुझा महिमा वर्णन करून गप्प बसतात. परंत भावबळाने तु आम्हाला प्राप्त झालास. एवढ्याकरिता हे सर्वोत्तमा नारायणा तुझ्या सुंदर नामरूपाचा लाभ आम्हाला सतत दे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग