घारीमुखींचा पिंड अंज
7.
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करी । पडता निर्धारी भक्षियला ॥१॥
नवमास होता झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडले ती ॥३॥
जन्मतांची जेणे सूर्याते धरियले । इंद्रादिका दिले थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटी मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथे ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पै होती । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशी बाळ । देता प्रात:काळ होता तेव्हा ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥
