मज ते हांसतील संत ।
4042.
मज ते हांसतील संत । जीही देखियेली मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगले चित्त । आहाच भक्त ऐसे दिसे ॥१॥
ध्यानी म्या वर्णावेति कैसे । पुढे एकी स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसे ॥धृपद॥
कासया पाडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । आम्हा लेंकरांसि पीडा । एक मागे जोडा दुसर्याचा ॥२॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसे मी धरीतसे पाय । तू तव समचि सकळा माय । काय अन्याय एक माझा ॥३॥
नये हा जरी कारणा । तरी का व्यालेति नारायणा । वचन द्यावे जी वचना । मज अज्ञाना समजावी ॥४॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहाता श्रमलो वाट । तुका म्हणे विस्तारले ताट । काय वीट आला नेणो स्वामीया ॥५॥
अर्थ :
ज्या संतांनी तुला प्रत्यक्ष पाहिले देवा ते संत मला म्हणतील की, तू इतके दिवस भक्ति करुनही तुला अजूनही देवाचे दर्शन कसे झाले नाही व मला असे म्हणून ते हसतील. म्हणून तर देवा माझ्या चित्ताला उद्वेग आला आहे कंटाळा आला आहे आणि तुझा भक्त वाया गेला असेच मला दिसत आहे. देवा आजपर्यंत मी तुला प्रत्यक्ष पाहिले नाही त्यामुळे तुझे ध्यान कसे करावे आणि तुझ्या स्वरुपाचे वर्णन कसे करावे हे मला समजत नाही परंतू मागे तर संतांनी तुला प्रत्यक्ष पाहिले आहे व त्यांनी तुझी स्तुतीही केलेली आहे. देवा तुझी स्तुती संतांनी केली आहे त्यामुळे तर माझा जीव येथून निघत नाही केव्हा तरी तुझे दर्शन मला होईल या अपेक्षेला मी लागलेलो आहे. अहो देवा तुम्ही अशी वेडीवाकडी पध्दत उगाचच का निर्माण केली आहे ? देवा तुम्ही एकाला दर्शन देऊन मुक्त करता तर एकाला संसारामध्ये बध्द करता. आम्हा लेकरांना तुम्ही उगाचच त्रास पीड
