वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

काळोखी खाऊन कैवाड के

🙏 3. संत तुकाराम · ABH-080247 · अभंग क्र. १८६०

1860.
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हिते जाले जनामध्ये शूर ॥१॥
का रे तुह्मी नेणा का रे तुह्मी नेणा । अल्प सुखासाठी पडशी विपत्तीचे घाणा ॥धृपद॥
नाही ऐसी लाज काय तयापे आगळे । काय नव्हे केले आपुलिया बळे ॥२॥
तुका म्हणे तरी सुख अवघेचि बरे । जतन करून हे आपुलाली ढोरे ॥३॥

अर्थ :
ज्या संतांनी साधकावस्थेत असताना मोठ्या धैर्‍याने परमार्थासंबंधी अनेक युक्त्या लढवून हरीविषयी अज्ञान दूर केले ; व आपले हित साधले, ते संत या जनामध्ये मोठे शूर झाले आहेत. लोकहो, हे तुमच्या लक्षात का येत नाही ? विषयाच्या अल्प सुखासाठी अनेक विपत्तींच्या घाण्यात निष्कारण का पडता ? संतांप्रमाणे तुम्हीदेखील परमार्थाचा पक्ष घेऊन व अज्ञान नष्ट करून हित साधा. परमार्थ करण्याकरिता तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणता विशेष गुण होता ; आणि तुमच्यात त्यांच्यापेक्षा कोणती न्यूनता आहे. सांगा ! दोघानाही मनुष्यदेह तर सारखाच आहे, मग संतांनी मुक्त होऊन सुखी व्हावे ; आणि तुम्ही मात्र मनुष्यदेह असून बध्द दुःखी राहावे, याची तुम्हाला लाज वाटू नये काय ? अरे, आपल्या प्रयत्नबळाने केले तर काय एक होत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो, संतांप्रमाणे तुम्ही परमार्थ केला, तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होऊन सुखप्राप्ती होईल ; पण त्याकरिता प्रथम इंद्रियरूपी पशूंचे रक्षण करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग