संतांचे संगती मनोमार
65.
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
अर्थ :
मनाचा मार्ग सोडुन साधुमार्गाने गेले की तो श्रीपती आकळतो कळतो. वाचेत सतत रामकृष्ण जप व आत्मारामात शिवाचा जप हा जीवांचा भाव असावा. द्वैताचे बंधन टाकुन एकतत्वाने हरिनाम साधन व तेच साध्य साधता येते. एकदा नामामृताची गोडी वैष्णवांना लाभली की त्यांना जीवनकळाच प्राप्त होते. ह्याचा नाममृतामुळे प्रल्हाद भक्त झाला व उध्दवाला कृष्णकृपा झाली. नामपाठ करणे हे सर्वात सुलभ आहे पण हे जाणारे फार दुर्लभ आहेत. असे माऊली सांगतात.
