वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४. समुद्रदेवाची प्रार्थना

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088184 · अभंग क्र. ४

4.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चौथा ॥
राक्षस – वानरांचे युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लगबगीने रावण सभेत येतो; त्याची बिकट अवस्था :

प्रबळ बळे रघुनंदन । आला ऐकोनि रावण ।
अतिशये चितानिमग्न । म्लानवदन सभेसी ॥१॥

तेन शंखविमिश्रेण भेरीशब्देन रावणः ।
मुहूर्तं ध्यानमास्थाय सचिवानभ्युदैक्षत ॥१॥
ततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान्नाम राक्षसः ।
उवाच रावणं मंत्री कृतबुद्धिर्बहुश्रुतः ॥२॥
तन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण ।
यदर्थमभियुक्तोसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥३॥
तस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः ।
विरोधं मा गमस्तेन रामेणाभिततेजसा ॥४॥

सभे संचित दशानन । तंव शंख भेरी ढोल निशाण ।
श्रीरामकटकीं त्राहाटिले पूर्ण । तेणे रावण गजबजिला ॥२॥
ऐकोनि वाजंत्रांचा गजर । त्यामाजी वानरांचा भुभुःकार ।
तेणे दचकला दशशिर । मुहूर्तमात्र तटस्थ ॥३॥
कार्यकारणकर्तव्यता । काही नाठवे लंकानाथा ।
तेव्हा माल्यवंत जाला बोलता । निजहितार्था शिकवाया ॥४॥

माल्यवानाचे दुश्चिन्हकथन :

रावणाचा परम आप्त । वृद्ध राक्षस माल्यवंत ।
बहुश्रुतत्वें बुद्धिवंत । धर्मी धर्मवंत सुनीति ॥५॥
म्हणे ऐक लंकानाथ । दिवी भुवि अंतरिक्षांत ।
त्रिविध उत्पातीं लंकाव्याप्त । आला कुळघात राक्षसा ॥६॥
माध्यान्हीं उल्कापात । राजद्वारी भूस्फोट होत ।
दिवाभीते घराआंत । बळेंचि रिघत झडपोनी ॥७॥
रुधिरवृष्टी होत नागरी । गोमायु गर्जती चौबारीं ।
भाणी झडपोनि नेती घारी । आली महामारी राक्षसा ॥८॥

त्याची गंभीर सूचना :

यालागी ऐक लंकानाथा । सीता अर्पूनि रघुनाथा ।
रामरावणां अतिसख्यता । करी सर्वथा क्षणार्धे ॥९॥
येथे कलहाचे कारण । मुख्यत्वे सीताचि जाण ।
ते केलिया रामार्पण । कृतकल्याण सर्वांसी ॥१०॥
श्रीरामाची निजकांता । रामार्पण करिता सीता ।
रावणा तुज का व्यर्थ व्यथा । हेचि कुळघाता निजमूळ ॥११॥
श्रीरामाचा प्रताप पूर्ण । समुद्री तारिले पाषाण ।
लंके आणिले वानरसैन्य । त्यासमुख कोण राहू शके ॥१२॥
गजापुढें मशक जाण । सिंहापुढे भुंके श्वान ।
तेंवी श्रीरामी रावण । करिता रण निमेल ॥१३॥
सूर्यासीं करावया रण । उठावले घृतकण ।
तैसा श्रीरामी रावण । मरेल पूर्ण रणरंगीं ॥१४॥
पतंग अग्नीसीं झगडा । करु पाहे पंखझडाडा ।
तेंवी रावण रामापुढा । मरेल रोकडा बाणे एके ॥१५॥
धरोनिया शहाणपणा । सुगुद्धि ऐकावी रावणा ।
सीता अर्पूनि रघुनंदना । कुशकल्याणा साधावें ॥१६॥

तत्तु माल्यवतो वाक्यं हितमुक्तं दशाननः ।
न मर्षयति दुष्टात्मा कालस्य वशमागतः॥५॥
अमर्षात्परिवृत्ताक्षो माल्यवंतमथाब्रवीत् ।
मानुषं कृपणं राममेकं शाखामृगाश्रयम्॥६॥
समर्थं मन्यसे केन त्यक्तं पित्रा वनाश्रयम् ।
वीरद्वेषेण वा शंके पक्षपातेन वा रिपोः॥७॥
एवं बुवाणं संरब्धं क्रुद्धं विज्ञान रावणम् ।
व्रीडितो माल्यवांस्तूर्णं रस्माद्देशादपाक्रमत्॥८॥

रावणाने माल्यवानाचा केलेला धिक्कारः

क्षीर ज्वरिता कडू विख । तेंवी हितवाक्य दशमुख ।
माल्यवंताचे न मानूनी सुख । परम दुःख पावला ॥१७॥
परम क्रोधे दशकंठ । वटारुनि नेत्रवाट ।
स्वमिनिंदक तू अति दुष्ट । शठ नष्ट माल्यवंता ॥१८॥
राम बापुडे मनुष्यमात्र । घेवोनि आले वानरभार ।
त्यासी वानिसी थोर थोर । मी राज्यधर मज निंदिसी ॥१९॥
शत्रुपक्षाचा अभिमान् । वानिसी श्रीराममहिमान ।
निखंदिसी दशानन । कुळनिर्दळण श्रीरामे ॥२०॥
श्रीरामासी करिता रण । रणी राक्षसा निर्दळण ।
मुख्य मरेल रावण । ऐसे कठिण वदतोसी ॥२१॥
तुवा भेडसाविल्या जाण । मज रामाचे भय कोण ।
रणी मारीन राम-लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥२२॥
विरुधद अनुवादतां येथ । तुझा कराव् म्या घात ।
अति वृद्ध परम आप्त । म्हणोनि हात राखिला ॥२३॥

त्यामुळे माल्यवान निघून जातो :

कोपला दशवदन । माल्यवंत स्वये सरकोन ।
सत्वर गेला पै निघोन । मुख परतोन पाहेना ॥२४॥
सीता अर्पावी रघुनाथा । ऐसे माल्यवंत सांगता ।
रावण करु पाहे घाता । तो अदृश्यता फडकला ॥२५॥
माल्यवंत गेलिया जाण । प्रधाना सांगे रावण ।
दुर्ग सज्जून दारुण । वीरी सावधान राहावे ॥२६॥

लंकायास्तु तदा गुप्तिं कारयामास राक्षसः ।
प्रहस्तं व्यादिदेशाथ पूर्वद्वारे निषूदनम् ॥९॥
दक्षिणे तु महावीर्यौ महापार्श्वमहोदरौ ।
पश्चिमे तु तथा द्वारे पुत्रमिंद्रजितं तदा ॥१०॥
उत्तरे चापि स द्वारे व्यादिश्य शुकसारणौ ।
स्वयमत्र भविष्येहमिति तान्मंत्रिणोऽब्रवीत् ॥११॥
राक्षसं तु विरुपाक्षं महाबलपराक्रमम् ।
मध्ये संस्थापयामास बहुभिः सह राक्षसैः ॥१२॥

रावणाचे सैन्यनियोजन :

रावण करी दुर्गसंस्था । पूर्वद्वारी ठेवी प्रहस्ता ।
दक्षिणद्वारीं होय ठेविता । महोदर तथा महापार्श्व ॥२७॥
पश्चिमद्वारीचा निर्धार । इंद्रजित ठेविला ज्येष्ठ कुमर ।
कोट्यनुकोटी निशाचर । सहपरिवार सहसैन्य ॥२८॥
उत्तरद्वारीं पै जाण । तेथे ठेविले शुकसारण ।
सहपरिवारें रावण । ते द्वारी आपण स्वये राहे ॥२९॥
उत्तरद्वारी श्रीरघुनाथ । निश्चये येईल येथ ।
यालागी तेथे लंकानाथ । स्वये राहत सावधान ॥३०॥
अमित सैन्य देवोनि त्यासी । मध्यगुल्मीं ठेविले विरुपाक्षासी ।
उणें देखावें ज्या द्वारासी । साह्य त्यासी तेणे जावे ॥३१॥
देखोनिया लंकाभुवन । दुर्ग घ्यावया वानरगण ।
रामापासी अवघे जण । कर जोडून राहिले ॥३२॥
मिळोनिया वानरवीर । नमस्कारोनि रामचंद्र ।
आम्हांसी घ्यावया लंकापुर । आज्ञा सत्वर दे स्वामी ॥३३॥
आज्ञा पुसतां जुप्तत्ती । बिभीषण श्रीरामाप्रती ।
सांगे दुर्गाची पातळी । प्रथानाहस्तीं जे आणविली ॥३४॥

अथ तेषु ब्रुवाणेषु रावणावरजोऽब्रवीत् ।
अनलः पनसश्चैव संपतिः प्रमतिस्तथा ॥१३॥
गत्वा लंकाममात्या मे पुरी पुनरिहागताः ।
भूत्वा शकुनयाः सर्वे प्रविष्टाश्च रिपोर्बलम् ॥१४॥
संविधानं यदाहस्ते रावणस्य दुरात्मनः ।
राम ते ब्रुवतः सर्वं यथातथ्येन मे शृणु ॥१५॥

बिभीषण दुर्गरक्षणाची केलेली योजना सांगतो :

लंका घ्यावया हातोहाती । गर्जत उठता वानरपंक्ती ।
बिभीषणें थांबवोनि जुत्पत्ती । दुर्गपाळती स्वये सांगे ॥३५॥
करु जाता रणकंदन । रणी पडे पारखें सैन्य ।
ऐसे दूर्गाचें विंदान । बिभीषण स्वये सांगे ॥३६॥
यंत्रें शतघ्नी गुप्तगोळ । दारुयंत्रें पाषाण प्रबळ ।
निर्दळावया पारीखें दळ । दुर्ग प्रगळ सज्जिले ॥३७॥
माझे चौघेही प्रधान । धांडोळोनि लंकाभुवन ।
दुर्गाचें मारक विंदान । पाळती पूर्ण घेवोनि आले ॥३८॥
तुझ्या चौघा प्रधानांसी । ओळखी सर्वत्र सर्वांसीं ।
पाळती आणिली कैसी । बिभीषणासी पुसे राम ॥३९॥
माझे चौघे प्रधान । ऐक त्यांचे नामभिधान ।
अनळ हर प्रघस संपाती जाण । अति विचक्षण कामरुपी ॥४०॥
पक्षिवेषाचे अनुवृत्ती । रिघोनिया लंकेप्रती ।
तिही दुर्गाची पाळती । यथार्थगतीं आणिली ॥४१॥
पूर्वे प्रहस्त अति प्रसिद्ध । दक्षिणे महोदर माहापार्श्वद ।
पश्चिमे इंद्रजित अगाध । सन्नद्ध बद्ध सैन्येंसीं ॥४२॥
उत्तद्वारी शुकसारण । ठेविले नाममात्र जाण ।
सकळ सैन्येंसी आपण । राहे रावन ते द्वारी ॥४३॥
सैन्यसमुदाय मध्यगुल्मासी । अग्रगणी केले विरुपाक्षासी ।
मोड जाल्या ज्या द्वारासीं । साह्य त्यासी तेणे जावे ॥४४॥
मारावया वानरपंक्ती । हडोहडीं गुप्तगतीं ।
यंत्रे जोडिली नेणो किती । क्रोधानुवृत्ती रावणे ॥४५॥
दुर्गासीं झोंबता वानरे । मारावया गुप्तमारें ।
चर्याचर्या सज्जिले यंत्रें । दशशिरें रणमारा ॥४६॥
दुर्ग सज्जिले दारुण । दुर्गी झोंगतां वानरगण ।
यंत्रमारें मरती पूर्ण । ऐसे आपण न करावे ॥४७॥
यंत्रोयंत्रीं दीर्घ ध्वजा । श्वेत पीत आरक्त विरजा ।
दुर्गवेष्टणीं समसमजा । उभविल्या बोजा शोभती ॥४८॥
हलमुखे दीर्घ हडे । विचित्र निर्वाळिले कडे ।
पताका सज्जिल्या चहूंकडे । राक्षस गाढे राखिती ॥४९॥

ती योजना ऐकून वानरांवर काहीच परिणाम होत नाही.
वानरांनी आकाशातून हल्ला केल्यामुळे राक्षसांचा एकच गोंधळ उडतो :

ऐकोनि बिभीषणाची युक्ती । वानर गदगदा हांसती ।
आमच्या उड्डाणव्युपत्ती । दुर्ग किती यंत्रेंसी ॥५०॥
लंकेचिया शिखरावरी । उड्डाण किजे वानरी ।
तेथे दुर्गाच्या यंत्रमारी । कवणावरी पडावें ॥५१॥
ऐकोनि वानरांची मात । बिभीषण अति विस्मित ।
श्रीराम स्वानंदे हासत । अति पुरुषार्थ वानरा ॥५२॥
दुर्गातळीं जे राहती । यंत्रमारें ते मरती ।
वानरा दुर्गावरी गती । यंत्रें जाती सुनाट ॥५३॥
ऐशी बिभीषणाची पाळती । ऐकोनि दुर्गाची संस्थिती ।
श्रीराम सांगे सुग्रीवाप्रती । द्वारानुवृत्ती निरोधा ॥५४॥
दुर्गामाजि तडा पडे । तैसी धरावीं पाणियाडें ।
दुर्ग वेढावें चहुंकडे । मागेपुढें ढळो नेदी ॥५५॥
भितरिल्या बाहेर नव्हे गती । बाहेरील भीतरी जावो न शकती ।

कपीनामुग्रवीर्याणां सहस्त्रैर्बर्वहुभिर्वृतः ।
नीलः प्रहस्तं प्लवगो राक्षसं प्रति धावताम्॥१६॥
अंगदो वालिनः पुत्रो बलेन महता वृतः ।
दक्षिणे धावतां द्वारे महापार्श्वमहोदरौ ॥१७॥
हनूमान्पश्चिमं द्वारं निष्पीड्य पवनात्मजः ।
प्रविशत्वप्रमेयात्मा कपिभिर्बहुभिर्वृतः ॥१८॥
परिक्रामति यत्सर्वाल्लोकान्संतापयन्प्रजाः ।
तस्याहं राक्षसेंद्रस्य रावणस्य वधे ध्रृतः ॥१९॥
उत्तरं नगरद्वारमहं सौमित्रिणा सह ।
निपीड्याभिप्रवेक्ष्यामि सबलो यत्र रावणः ॥२०॥
वानरेंद्रश्च बलवान्ऋक्षराजश्च वीर्यवान् ।
राक्षसेंद्रानुजश्चैव गुल्मे भवतु मध्यमे ॥२१॥

प्रहस्त पूर्वद्वारनुवृत्ती । त्यासी भिडावया नीळ दळपती ।
सवे वानर भद्रजाती । दुर्गगती निरोधा ॥५७॥
दक्षिनद्वारीं महावईर । महापार्श्वद महोदर ।
त्यांवरी अंगद वाळिकुमर । द्वारनिर्धार रणकंदना ॥५८॥
पश्चिमद्वारी इंद्रजित । त्याचा करावया घात ।
बळिया ठेविला हनुमंत । रणकंदनार्थ राक्षसा ॥५९॥
मुख्यत्वें कपटी पूर्ण । उत्तरद्वारी असे रावण ।
त्याचे करावया कुळनिर्दळण । रामलक्ष्मण आम्ही दोघे ॥६०॥
राजा सुग्रीव जांबवंत । बिभीषण शरणागत ।
यांही रागावें मध्यगुल्मांत । सैन्य समस्त लक्षूनी ॥६१॥
कोणे द्वारी कैंसें रण । वीरा वानरा युद्धकंदन ।
भंगलिया बळासी जाण । साह्य संपूर्ण इहीं व्हावे ॥६२॥
ऐसा मध्यगुल्मवृत्तांत । दुर्ग रोधूं सांगे रघुनाथ ।
ते वानरी ऐकोनि मात । लंकाग्रहणार्थ मांडिला ॥६३॥
ज्यांच्या वांट्या जे द्वार । ते ते द्वारी वानरवीर ।
करिते झाले चरित्र । अति विचित्र अवधारा ॥६४॥
दुर्गतळीं राहता वीर । होईल यंत्रांचा महामार ।
हे जाणोनिया वानर । करिती दुर्धर ते ऐका ॥६५॥
लंकेहूनि उंच पर्वत । आणोनियां योजनांत ।
वानर निजद्वारीं स्थपित । राक्षसांत करावया ॥६६॥
पर्वती वेंधले वानर बळी । लंकादुर्ग राहिले तळी ।
राक्षसदुर्गाचिये पौळी । घायातळी आतुडले ॥६७॥
त्यासी हाणिता शिळाशिखर । घायीं अष्टांगे होती चूर ।
वानरी करिता महामार । दुर्गधर पळाले ॥६८॥
वीर धीर सपुरते । हुडोहुडां नित्य जागते ।
वानर देखोनि आपणावरते । तेही निश्चिती गजबजिले ॥६९॥
आम्ही तळी ते दुर्गावरी । येथे झाली विपरीत परी ।
वानरी आणोनि महागिरी । आम्हांहीवरी वळंघले ॥७०॥
हुडोहुडां वीर अमित । वानर करिती पर्वतघात ।
शतसहस्र चूर्ण करित । हुडे खचत आघातें ॥७१॥
पारख्या करिता महामारी । दुर्गी जोडल्या यंत्रहारी ।
त्याही उचलोनि वानरी । नेवोनि सागरी घातल्या ॥७२॥
दुर्गासभोंवते याचिपरी । हुडोहुडां पै वानरी ।
राखणाइतां महामारी । अपांपरी राक्षसा ॥७३॥
एके निमाली प्राणांत । एके निमाली प्राणांत ।
एके घायवट हुंबत । उरलीं जीव घेवोनि पळत । दुर्गनिर्मुक्त कपिभये ॥७४॥
दुर्गाचिया पौळोपौलीं । राक्षसा करोनि रवंदळी ।
वानरवीरीं आतुर्बळी । नगरधांडोळी मांडिली ॥७५॥
एकाचे मुकुट आसुंडती । एकाची शस्त्रे हिसकिती ।
वीर हाणिता आघाती । उडोनि जाती आकाशी ॥७६॥
न घेता रत्‍ने मुक्ताफळें । हाटवाटींचीं विकतीं फळे ।
आणोनिया निजबळे । सुखसमेळें भक्षिती ॥७७॥
आणोनि गुळचिया भेंडा । वानर खाती मतमटां ।
दुकानींचा काढोनियां सांटा । मधु घटघटां सेविती ॥७८॥
आणोनिया फुटाण्यांची पाटी । वानर खाती लाळघोटी ।
चारें बोरें लुटिती हाटी । नाचती चौहाटीं लंकेच्या ॥७९॥
देखोनि वानरांची धाडी । निशाचरीं दिधली उडी ।
घरोघरी कडाफोडी । केली बापुडीं राक्षसें ॥८०॥
श्रीराम म्हणे सुवेळागिरी । वळंघोनियां तयावरी ।
युद्ध होत लंकागिरीं । विरीं वानरी ते पाहो ॥८१॥

स तु कृत्वा सुवेलस्य मतिमरोहणं प्रति ।
लक्ष्मणानुमतो रामः सुग्रीवमिदमब्रवीत् ॥२२॥
बिभीषणं च धर्मज्ञमनुरक्तं निशाचरम् ।
लंकामालोकयिष्यामो निलयं तस्य रक्षसः॥२३॥
रामः सुवेलमारोहद्वासार्थं चित्रकाननम् ।
अध्यारोहंत शतशः सुवेलं यत्र राघवः॥२४॥
शासनादथ रामस्य सुग्रीवस्य बिभीषणः ।
द्वारे द्वारे प्लवंगानां कोटिं कोटिं न्यवेशयत्॥२५॥

नंतर सुवेळागिरीवर आक्रमण :

राम जावया सुवेळेप्रती । लक्ष्मणाच्या विचारवृत्तीं ।
आणी सांगोनिया सुग्रीव कपीप्रती । बिभीषणानुमतीं निघे राम ॥८२॥
आता येथून अहर्निशी । नित्यवस्ती सुवेळेसीं ।
ऐसे सांगोनि सर्वांसी । निघे वेगेंसीं श्रीराम ॥८३॥
ऐसी ऐकतांचि गोष्टी । वानरवीर कोट्यानुकोटी ।
धावोनियां सुवेळापृष्ठीं । शिळा समपृष्ठीं आंथुरिती ॥८४॥
लंकेआंतील वृत्तांत । सुवेळेहुनि असे दिसत ।
याचि अनुलक्षीं रघुनाथ । सुवेळाआंत राहिला ॥८५॥
लावोनियां निशाण भेरी । श्रीराम चढे सुवेळागिरी ।
परिवारिला वानर भारीं । निजगजरीं पै आला ॥८६॥

राक्षस तळात असताना वानरांचे लंकेवर व दुर्गावर आकाशातून आक्रमण :

लंका देखोनि रघुपती । स्वये सांगे वानराप्रती ।
दुर्ग घ्यावे हातोहाती । लंकापती गांजोनी ॥८७॥
राक्षसी भय घेतलें भारी । कोणी नये लंकेबाहेरी ।
आपण रिघोनिया भीतरी । सहपरिवारी दुर्ग घ्यावें ॥८८॥
ऐकोनि श्रीरामाची मात । सुग्रीव वानरा सांगत ।
करोनि राक्षसांचा घात । दुर्गाआंत रिघावे ॥८९॥
बिभीषण सांगे रामाजवळी । जे जे आले लंकेच्या मूळीं ।
त्या त्या सैन्या हाती रांगोळी । यंत्रानुमेळीं महामारें ॥९०॥
लंकेसी वारा वाजता भीत । पक्षी भोंवों न शकती तेथ ।
रावणे राखिली अति गुप्त । जाले विपरीत ते ठायी ॥९१॥
लंकेहूनि उंच योजनांत । वानरी आणिले पर्वत ।
वीर वळंघोनि तेथ रणकंदनार्थ राक्षसा ॥९२॥
श्रीरामप्रतापनव्हाळी । लंकादुर्ग राहिले तळी ।
पर्वतावरुनि वानर बळी । करिती रांगोळी राक्षसा ॥९३॥
लाहोनि श्रीराम सामर्थ्य । वानरी केला विपरीतार्थ ।
जोडोनियां पर्वता पर्वत । लंका समस्त रोधिली ॥९४॥
पाडोनि दुर्गाच्या पौळी । यंत्रे उचटून संमूळीं ।
सागर भरिला यंत्रगोळी । आतुर्बळी वानर ॥९५॥
वानरांच्या भयेंकारीं । हाट चौहाटा लंकापुरीं ।
कोणी वागेना बाहेरी । अपांपरी राक्षसा ॥९६॥
ऐसे बोलोन बिभीषण । वानरा सांगे आपण ।
आता घ्यावें लंकाभुवन । रणभुवन । रणकंदन करीतही ॥९७॥
श्रीरामा असता पाठिराखा । कायसा पाड दशमुखा ।
कांही न धरोनि शंका । अवश्य लंका तुम्ही घ्यावी ॥९८॥
ऐसे एकतां उत्तर । वानरी केला जयजयकार ।
देवोनि रामनामे भुभुःकार । लंकापुर ठाकिलें ॥९९॥

लंकेला वेढा व आत प्रवेश :

श्रीरामाज्ञेची थोरी । लंका वेढिली वानरी ।
गुळीं जैशा मुंग्यांच्या हारी । तैशापरी झोंबती ॥१००॥
न लगे अर्गळा काढणें । न लगे शृखला तोडणें ।
न लगे कपाटें उघडणें । वानर किराणे गड घेती ॥१॥
राक्षसी हाणावें हातियेरीं । वानर उंच पर्वताग्रीं ।
मारावे जों यंत्रमारी । वानरी यंत्रें बुडविलीं ॥२॥
लंकेभोंवती दुसरी । पर्वतलंका केली वानरी ।
त्यावरी वळंघोनि महावीरी । दुर्गाभीतरीं प्रवेश ॥३॥
वानरवीर जगजेठी । असंख्य निगाले लंकात्रिकुटीं ।
मारिता राक्षसांच्या कोटी । सुग्रीवे पाठी राखिली ॥४॥
करिता राक्षसा महामारी । वानर ढेंसले लंकेभीतरी ।
बोंब सुटली घरोघरी । अपांपरी राक्षसा ॥५॥

ततः सहस्त्रय्थाश्च कोटियूयाश्च यूथपाः ।
कोटियूथशताश्चान्ये लंकामारुरुहुस्तदा ॥२६॥
जयत्युरुबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवः श्रीरात्रेणानुपालितः॥२७॥
परिखां पूरयंतश्च गंभीरविमलोदकाम् ।
पांसुभिस्तृणकाष्ठैश्च पर्वतागैश्च वानराः॥२८॥
इति ते घोषयंतश्च गर्जतश्च प्लवंगमाः ।
अभ्यधावंत लंकायाः प्राकारं कामरुपिणः॥२९॥

श्रीरामाज्ञासन्निष्ठी । वानर लक्षानुलक्षकोटी ।
वृंदानुवृंद जगजेठी । लंकापीठीं प्रवेशले ॥६॥
यृथपावरी यूथप । वानर आले सप्रताप ।
विध्वंसावया मठ मंडप । अति साटोप चालिलें ॥७॥
फाडिती पताका तोडिती तोरणे । पाडिती मंदिरे सप्तखणें ।
राजमंदिरें शोभायमानें । करिती कंदनें वानरे ॥८॥
खंदक बुजिती आतुर्बळी । खंदकामाजी घालिती धुळी ।
पर्वतशिखरें काष्ठें शिळीं । परिघ समूळी बूजिला ॥९॥
करिती राक्षसांची होळी । पाडिती दुर्गाचिया पौळी ।
वानर येवोनि आतुर्बळी । पिटिटी टाळी जयाची ॥११०॥
आम्ही श्रीरामाचे दूत । प्रवेशलों लंकेआंत ।
श्रीराम जाला यशवंत । हर्षे गर्जत वानर ॥११॥
श्रीराम नित्य विजयान्वित । लक्ष्मण सदा यशवंत ।
श्रीरामे सुग्रीवा राज्य प्राप्त । तोही निश्चित निजविजयी ॥१२॥
जयजयकाराचा गजर । रामनामे गर्जती वानर ।
लंका घेतली सत्वर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥१३॥
लंकाराज्य समस्त । बिभीषणासी जाले प्राप्त ।
ऐसे वानर गर्जत । हर्षयुक्त स्वानंदे ॥१४॥
यापरी स्वये लंकेआंत । वानर गर्जत नर्तत ।
राक्षस त्रासले समस्त । सांगती आकांत लंकेशा ॥१५॥

ततस्ते राक्षसास्तत्र गत्वा रावणमंदिरम् ।
न्यवेदयत्पुरी रुद्धा रामेण सह वानरैः॥३०॥
रुद्धां तु नगरी श्रुत्वा जातकोपो दशाननः ।
विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरुरुहत्॥३१॥
स ददर्शावृतां लंका सशैलवनकाननाम ।
असंख्यातैर्हरिगणैः सर्वतो योद्धुमाहवे ॥३२॥
सदृष्ट्वा वानरैः सर्वैंः काननं कपिलं कृतम् ।
कथं क्षपयितव्याः स्युरिति चिंतापरोऽभवत्॥३३॥

वानरी त्राशिले निशाचर । रावणा सांगती सत्वर ।
पर्वतशिळाशिखरांचा मार । करीत वानर पै आले ॥१६॥
दुर्गाहूनि योजनांत । लंकेसभोवतें पर्वत ।
वानर वळंघोनि तेथ । केला निर्घात राक्षसा ॥१७॥
वानर पर्वताग्रीं महाबली । लंकादुर्ग राहिले तळी ।
वर्षोनि पर्वतशिखरशिळी । केली रांगोळी राक्षसा ॥१८॥
कपींसी न चाले हतियेर । उंच पर्वताग्रीं वानर ।
त्यांसी न चले यंत्रमार । निशाचर चडफडती ॥१९॥
वानरा न लगे दुर्ग पाडणें । न लगतीं कपाटें उघडणें ।
त्रिकूट घेतलें जी निजकिराणें । अति सत्राणे उडोनी ॥१२०॥
उड्डाणबळें जगजेठी । वानरांच्या कोट्यनुकोटी ।
पैल पाहे लंकापीठीं । वीर त्रिकुटी दाटले ॥२१॥
वानरांचे माराभेण । राक्षस जाले पलायमान ।
राक्षस पळती जीव घेऊन । दुर्गरक्षण असेना ॥२२॥
यापरी गा लंका एथ । वानरी करोनि निर्मुक्त ।
प्रवेशले रामदूत । कपि गर्जत रामनामे ॥२३॥
वृथा वानिती प्रौढी । आम्ही मारुं वानरकोडी ।
आल्या वानरांच्या धाडी । देवोनि दडी लपताती ॥२४॥
सवेग येता वानरधाडी । दुर्गींच्या फांजी पौळी पाडी ।
खंदक बुजिले निर्वडीं । कडाफोडी लंकेसी ॥२५॥
ऐकोनि राक्षसांची मात । गजबजिला लंकानाथ ।
वानर भरले लंकेआंत । पाहू चढत अटाळीं ॥२६॥
रावण चढोनि गोपुरीं । पाहे तंव वानरहारी ।
दाटले लंके आंतबाहेरी । वनोवनांतरीं कपिभार ॥२७॥
वानरसैन्य असंख्यात । न समाये लंकेआंत ।
पौळी वानर समस्त । वनी वृक्षस्थ ढेंसले ॥२८॥
वानरसभेच्या समेळी । पिंवळ्या दिसती दुर्गपौळी ।
कपिप्रभा आणि प्रभावळी । दिसती पिंवळीं वृक्षवनें ॥२९॥
लंकां सबाह्य संपुटी । देखोनिया वानरथाटी ।
रावणा चळकांप उठी । कैशी निकटीं कपिधाडी ॥१३०॥
रावण देखोनि गोपुरीं । जो तो वानर उपराउपरी ।
युद्धालागीं स्वये पाचारी । निघें बाहेरी नपुंसका ॥३१॥
एकी देवोनी किराण । ढिलावूं पाहती रावण ।
ते देखोनि दशानन । अति उद्विग्न स्वये जाला ॥३२॥
मज दशमुखासमोर । वनचरें पालेखाइर ।
युद्धां धांवती सत्वर । वानरवीर महाबळी ॥३३॥
वानर देखोनि दुर्धर । तळी उतरला दशशिर ।
कपींसीं करावया रणमार । सैन्य सत्वर मोकली ॥३४॥

ततःकोपपरीतात्मा रावणो राक्षसाधिपः ।
निर्याणं सर्वसैन्यानां दुतमाज्ञापयत्तदा ॥३४॥
निष्पतंति तदा सेना हृष्टा रावणचोदिताः ।
एतस्मिन्नंतरे रौद्रः संग्रामः समपद्यत ॥३५॥
राक्षसानां वानराणां घोराणां कामरुपिणाम्ः ।
ते दगाभिः प्रवृत्ताभिः शूलशक्तिपरश्वधैः॥३६॥
निर्जघ्नर्वानरोन्घोरान्कंपयंतः स्वविक्रमान् ।
तदा वृक्षैमहाकायाः पर्वताग्रैश्च वानराः॥३७॥
निर्जघ्नुरथ रक्षांसि नखैर्दतैश्च वेगिताः ॥३८॥

त्यामुळे रावणाचा क्रोध, राक्षस वानरांचे युद्धः :

कपि प्रवेशले लंकेआंत । तेणे कोपला लंकानाथ ।
निजसैन्या स्वये मोकलित । रणकंदनार्थ वानरा ॥३५॥
सैन्य पाठवीलें सत्वर । तेथे वानर निशाचर ।
युद्ध करिती घोरांदर । येरयेरा नोकूनी ॥३६॥
राक्षस आले करीत गजर । नामे वानरांचा भुभुःकार ।
घाय हाणिती निष्ठुर । येरयेरा उपमर्द ॥३७॥
राक्षसांचा शस्त्रसंपात । वानर तळपोनि चुकवित ।
कपींनी करिता पर्वतघात । रणी हुंबत राक्षस ॥३८॥
वानर धरोनिया पुच्छी । उपटितां अति आवेशी ।
वानरे ओरबडोनि नेत्रांसी । आणिले राक्षसांसी अंधत्व ॥३९॥
वामहस्तें नेत्र फोडी । दक्षिणहस्ते देवोनि थापडी ।
राक्षसांतें तळी पाडी । नाक कान करांडी अतिरागें ॥४०॥
वानर धरोनि चरणकमळीं । उपटूं जाता आतुर्बळीं ।
पुच्छे त्यांची निमटून नळीं । पाडिती भूतळीं राक्षसा ॥४१॥
राक्षसी वानरा उठाउठी । रणी झाली लटापटी ।
झोंटी धरोनि पाडितीं सृष्टी । हाणिती मुष्टी निष्ठुरा ॥४२॥
गदा मुदगल शूळ शक्ती । राक्षस निजबळे हाणिती ।
शालताल शिळापर्वतीं । वानर मारिती राक्षसा ॥४३॥
दंडीं मुंडपीं उरी शिरी । थडका हाणिती शिरोदरीं ।
पुच्छ आणोनी उरावरी । पाडिती हारी राक्षसांच्या ॥४४॥
शस्त्रास्त्रासीं घडघडाट । आले राक्षस रथथाट ।
ते देखोनिया मर्कट । रथानिकट स्वये आले ॥४५॥
शस्त्रे हाणिता राक्षसी । वानर उसळले आकाशी ।
वर्शोनियां पर्वतांसी । सहित रथेंसीं चकचूर ॥४६॥
वानर वेगी निमेषार्धांत । मकरतोंडीं धरोनि रथ ।
बळे भूतळीं उपडित । केले भस्मांत असंख्य ॥४७॥
राक्षसरथ कोट्य्नुकोंटी । वानरी उपडितां सृष्टी ।
रणी एक बोंब उठी । लंकात्रिकूटी आकांत ॥४८॥
वानरश्रेणी पडता रणी । श्रीरामाच्या नामस्मरणीं ।
व्यथा जावोनि तत्क्षणीं । उठतीं रणी संग्रामा ॥४९॥
नाम स्मरतां प्रल्हादासीं । शस्त्रे न रुपती अंगासीं ।
श्रीराम असता पाठीसी । वानरांसी भय काय ॥१५०॥
आम्ही श्रीरामाचे दूत । वानर निजनामे गर्जत ।
गजवाजिरथांचा निःपात । असंख्यात राक्षसा ॥५१॥

स संप्रहारस्तुमुलो मांसशोणितकर्दमः ।
राक्षसानां वानराणां बभूवादभुतदर्शनः ॥३९॥
वनौकसां तत्र तु सन्निनादो ।
लंकागतानां च निशाचराणाम् ।
प्रक्ष्वेडितास्फोटितनर्दितानां ।
व्दाभ्यां महद्‍भ्यांमिव सागराभ्याम् ॥४०॥

वानर राक्षस रणांगणी । भिडिन्नले आयणींपायणीं ।
मांसशोणितकर्दम धरणी । पर्वतपाषाणीं विमर्द ॥५२॥
वानर पर्षती पर्वत । निवारण न चलेची तेथ ।
अनिवार पर्वतघात । तेणे प्राणांत राक्षसा ॥५३॥
आड धरिता वोढण । वोढणेंसीं वीरां मरण ।
पर्वतघातें शतचूर्ण । अचुक मरण राक्षसा ॥५४॥
राक्षस दुर्गाचिया पौळी । वानर पर्वताग्रीं आतुर्बळी ।
वर्षोनि वृक्षपर्वतशिळीं । केली रांगोळीं राक्षसा ॥५५॥
पर्वती न चले शस्त्रासंपात । पर्वती न चले बाणावर्त ।
राक्षस पावोनि आकांत । लंकेआंत पळाले ॥५६॥
दोनी समान सैन्यसागर । समान बळ समान शूर ।
युद्ध केले घोरांदर । अति दुर्धर रणमर्द ॥५७॥
परस्परें गर्जत । परस्परें नर्तत ।
परस्परें नोकित । रणोन्मत्त भिडिंनले ॥५८॥
वानरांचा पर्वतघात । राक्षस त्रासले अद्‍भुत ।
ते पळाले लंके आंत । अति कुंथत घायाळ ॥५९॥
राक्षससैन्या बोहट तेथ । श्रीरामसैन्य विजयभरित ।
हे देखोनि श्रीरघुनाथ । सुग्रीवादि तोषले ॥१६०॥
एका जनार्दना शरण । लंकावेष्टन राक्षसकंदन ।
पुढे अंगदशिष्टाईकथन । सावधान अवधारा ॥६१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां
प्रथमयुद्धकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
ओव्या ॥१६१॥ श्लोक ॥४०॥ एवं ॥२०१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग