पति जन्मला माझे उदरी
986.
पति जन्मला माझे उदरी ।
मी जाले तयाचि नोवरी ॥१॥
पतिव्रता धर्म पहा हो माझा ।
सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२॥
निर्गुण पति आवडे मज ।
आधी माय पाठी झालिये भाज ॥३॥
मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ।
ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी ॥४॥
अर्थ :
मायेची भूमिका घेतलेली गवळण म्हणते. पति जो ईश्वर तो माझ्या पोटी जन्माला आला म्हणजे माझ्यामुळे त्याला ईश्वरत्व आले. असे जरी असले तरी मी त्याच्या आज्ञेत वागते. म्हणजे मला त्यांच्याहून स्वतंत्र सत्ता नाही. अर्थात् मी त्याचे नोवरी झाले. आता माझा पतिव्रता धर्म पाहा की मी सर्व प्रकारांनी व्यवस्थित पतिचा उपभोग घेते. मला निर्गुण पति फार आवडतो. मी अगोदर त्याची आई होऊन पाठीमागून त्याचीच बायको झाले. मीच त्याची पट्टराणी असे असून सुद्धा पतिव्रतेतील अग्रपूजेचा मान मलाच आहे. माऊली ज्ञानदेवानी हे सर्व पाहून या स्वरूपाच्या ठिकाणी जनसंपर्क नाही अशा अद्वैतस्थितीत क्रीडा केली.
987
काळे ना सावळे ।
श्वेत ना पिवळे ।
नादबिंदाहून वेगळे ।
ते कवण रे चांगया ॥१॥
ज्ञानदेव म्हणे जाण का माझे उमाणे ॥धृ॥
गोडा परिस गोड ।
गगनाहूनि वाड ।
चौदाभुवना ज्याची चाड ।
ते कवण रे चांगया ॥२॥
ज्ञानदेवो मानवले ।
माझे मज सांगितले ।
दोहींचे मिळोनि एक जाले ।
भले केले चांगया ॥३॥
अर्थ :
चांगदेवा जे काळे नाही, सांवळे नाही पांढरे नाही, पिवळे नाही नादबिंदु ही नाही त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे. हे माझे उखाणे तू जाण. जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाड, चौदाही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड ते काय आहे. ते परमात्मरूप असे चांगदेवाने उत्तर दिले ते माऊलीनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तेसे सांगितले. यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्याठिकाणी ऐक्य झाले आहे. चांगदेवा हे फार चांगले केलेस. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
