वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २०, कूट अभंग ९७१ ते ९९०

अचिंत बाळक सावध जाले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074627 · अभंग क्र. ९७६

976.
अचिंत बाळक सावध जाले ।
निशब्दी बोभाईले मीचि मीचि ॥१॥
गरोदरेविण बाळक जाले ।
माया मारून गेले निरंजना ॥२॥
तेथे मज एक नवल पै जाले ।
पेहे सूदले निरालंब ॥३॥
छत्तीस अकरा घोटु पै घेतला ।
उदरेंवीण भरले पोट देखा ॥४॥
सहज गुण होते निर्गुण जाले ।
भलत्या झोंबले निराकारे ॥५॥
बापरखुमादेविवरू शून्याहूनि वेगळे ।
त्या बाळका सामाविले आपुल्याव्योमी ॥६॥

अर्थ :
अविचारी बाळक हे अज्ञानरूपी माया गरोदर न होता जन्माला आले म्हणजे आपणास जीव (सुखी दुःखी) समजू लागले. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरू माऊली भेंटली व तिने तत्त्वमसि महावाक्योपदेश केला त्यामुळे जागे झाले. म्हणजे ब्रह्माकार वृत्ति निर्माण झाली. व शब्दरहित असलेल्या ब्रह्माविषयी (अह ब्रह्मास्मि) मी ब्रह्म आहे अशी गर्जना करू लागले. व त्या गर्जनेने अज्ञानरूपी मायेचा निरास करून निर्गुण स्वरूपाकार होऊन ती स्वतः मावळली ( ती म्हणजे अह ब्रह्मास्मि इत्याकारक वृत्ति). त्याठिकाणी या बाळकाला एक आश्चर्य झाले ते असे की हे बाळक 'पेहें' म्हणजे पिण्याला योग्य म्हणजे अभेदयोग्य आलंबनरहित निर्विषय अशा स्वरूपाला प्राप्त झाले. त्यामुळे छत्तीस तत्त्वांचे शरीर, दहा इंद्रिये व अकरावे मन यांना गिळून टाकले म्हणून उदरेवीण पोट भरले. म्हणजे शरीरादिकावांचून स्वस्वरूपे करून तृप्त झाले. अज्ञानावस्थेत सहज असणारे गुण नाहीसे होऊन ते सर्व निर्गुण परमात्मस्वरूप झाले. म्हणजे चांगल्या रितीने निर्गुण निराकार परमात्मस्वरूपाशी ऐक्य पावलो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सत्तास्फूर्तिशून्य असलेल्या मायेहून वेगळे असल्याने त्यांनी त्या बाळकाला आपल्या चिदाकाश स्वरूपामध्ये सामावून घेतले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग