सखी म्हणे बाई समपण त
824.
सखी म्हणे बाई समपण ते कैसे ।
येरी म्हणे देश हिंडू नको ॥१॥
आधी शोधी आप मग पाही दीप ।
कोह सोहं रूप दवडी दुरी ॥२॥
त्रिपुटी झोंबो नको मायावी सकळ ।
अवघा सरळ हरि आहे ॥३॥
ज्ञानदेव बुझवी बुझे ज्ञानधारण ।
तुज मज सौजन्य येणे न्याये ॥४॥
अर्थ :
एक सखी, दुसऱ्या सखीला विचारते बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अग या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनांत तू गुंतू नकोस. कारण ज्ञाता, ज्ञान ज्ञेयादि सर्व त्रिपुट्या मायाकार्य आहेत. त्यांना तू झोंबू नकोस कारण यश्चावत् सर्व त्रैलोक्या श्रीहरिच आहे. याकरिता तू अगोदर 'कोऽहं' म्हणजे मी कोण आहे. याचा विचार कर. व असा विचार केला असता सोऽहं' म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा आपला अनुभव घे. व ती वृत्ति सुद्धा टांकून दे. या ज्ञानधारणेला तू समजून घेतले आणि ती वृत्ति निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
