॥ श्रीएकनाथमहाराजकृत
37.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सदतिसावा ॥
श्रीरामगुण संकीर्तन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सुखनिद्रित भास्करवंशभूषण । जेंवी शेषशयनी नाराय़ण ।
तृतीयभाग निशी क्रमोनि भृगुनंदन । पूर्वे आगमन पै केले ॥१॥
सद्गुरु मावळला । तृतीयभाग रात्रीचा क्रमिला ।
पुण्यपुरुषां चेवो झाल ।प्रातःस्मरामि करिते झाले ॥२॥
सकळ जना चेडरे झाले । रतिसुखांपासोनि सुटले ।
मार्गस्थ मार्गीं लागले । तीर्थयात्रा करावया ॥३॥
विप्रवेदाध्ययन करिती । गाई घरोघरी दुभती ।
एकी त्या दधिमथनीं प्रवर्तती । सारासार निवडोनि ॥४॥
कागपक्षी चेडरे झाले । तमेंसी निशीणें प्रयाण केले ।
ऐसे जाणॊनि गंधर्व आले । श्रीरामांते उठवावया ॥५॥
करिती सुस्वरें गायन । वीणा वेणु वाद्यें गहन ।
आलाप मूर्च्चना तान मान । सुरस गायन मांडिले ॥६॥
सर्व किन्नरांची गायनध्वनी । ऐकिली श्रीरामे शयनस्थानीं ।
अति आनंदला मनी । श्रीराम कीर्तनी तुष्टला ॥७॥
पर्यकींहूनी श्रीरघुपती । उठलियावरी समस्ती ।
आपुलाले प्रयोजनीं सावधान चित्ती । होते झाले ते काळी ॥८॥
एक पादुका पुढे ठेवोन | एक परिमळ मिश्रित जीवन ।
सुवर्णपात्रीं भरोन पूर्ण । समीप तिष्ठत राहिले ॥९॥
एके दंतकाष्ठ आणिले । श्रीरामे मुख प्रक्षाळिलें ।
सवेंचि स्नानतर्पण सारोनि तये वेळे । सेवकंसहित बाहेर आला ॥१०॥
आधींच तो श्रीरघुनंदन । कोटि मदनांचा गाभा पूर्ण ।
पूर्णावतार गुणनिधान । भक्तजीवन श्रीराम ॥११॥
कौसल्यानंदवर्धन । नगरजनां सुखवर्धन ।
भक्तचकोरां चंद्र पूर्ण । षोडझ कळां शोभला ॥१२॥
पराक्रमें विष्णुसमान । रूप अश्विनौदेवांसम जाण ।
बुद्धि ब्हुहस्पतीहूनि गहन । श्रेष्ठपण स्रष्ट्याऐसें ॥१३॥
पृथ्वीसारिखी क्षमा पूर्णा । तेजे दुसरा सूर्य जाणा ।
वेगे पाहता मागे पवन । ठाके कोण त्यापुढे ॥१४॥
समुद्रासारिखा गंभीरू । धैर्य जैसा पर्वत मेरू ।
कांति चंद्राहूनि अपारू । नृपति किंकरू जयाचे ॥१५॥
ऐसा तो अवनिजापति । सवे ऋषिमुनि जयांची अगाध कीर्ति ।
भद्रासनीं येवोन श्रीरघुपती । समस्तेंसी बैसला ॥१६॥
दोहींकडे उभे प्रधान । आणि नगरनागरिक जन ।
बैसले असती गुणसंपन्न । सभा सधन घनटवली ॥१७॥
इक्ष्वाकुकुळींचा भूपती । क्षत्रियांमध्ये अगाध कीर्ति ।
ऐशा श्रीरामभवंत्या ऋषिपंक्ती । तपोधनांच्या बैसल्या ॥१८॥
जैसा स्वर्गी सुरवर । सुधापानियांमध्ये इंद्र ।
तैसाचि श्रीरामचंद्र । शेष शत्रुघ्न भरत उभे समीप ॥१९॥
शत्रुघ्न भरत लक्ष्मण । सेवा करिती संमुख उभे ठाकोन ।
जैसा अध्वरीं हुताशन । नाना अवदाने घेतसे ॥२०॥
किंकर सुभट सेवक । सेवा करिती प्रफ़ुल्लितमुख ।
हात जोडोनि संमुख । भाट ब्रीदे वर्णिती ॥२१॥
श्रीरामाचे पार्श्वभागीं । बैसले महानुभव योगी ।
वानर बळियाढे वीर ते प्रसंगी । सुग्रीवादि अनुसरले ॥२२॥
चौघा प्रधानसहवर्तमान । सेवेसी तिष्ठत बिभीषण ।
जैसे कुबेरासी गुह्यक जाण । नाना पदार्थे सेविती ॥२४॥
ऐसा तो श्रीरामचंद्र । सेविताती ऋषिवृंद ।
एक नाना करिती वाद । एक प्रबंध पै गाती ॥२५॥
एक करिती हरिकीर्तन । एक मंजुळ गाती गायन ।
एक सांगती पुराण । रामायणादिकथा हो ॥२६॥
ऐसा भक्तजनमनोरंजन । लीलाविग्रही श्रीरघुनंदन ।
अवतारनाट्य जनार्दन । स्वये आपण दावीतसे ॥२७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
श्रीरामगुणवर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥ ओव्या ॥२७॥
