आस्वादु स्वादु ये दो
672.
आस्वादु स्वादु ये दोन्ही नाही ।
तेरावे पाही सहावा ठायी ॥१॥
तेथे सातवे पंचाक्षरी जपणे ।
संहार होणे तमोरुपे ॥२॥
रखुमादेविवरु शुद्धसत्त्वेंवीण ।
शुद्धबुद्ध मी जाण जाले गे माये ॥३॥
अर्थ :
त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वाद, आस्वाद म्हणजे ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीत. दहा इंद्रिये, चित्त व अहंकार या बाराजणांच्या पलीकडे असणारे जे तेरावे मन तेंही तेथे राहात नाही. असे सहा शास्त्रांत निर्णीत केले आहे. तेथे सातवे म्हणजे बुद्धीतत्त्वाने तमोगुणप्रधान होऊन सर्व जगाचा संहार करणारा जो शंकर त्याचा नमःशिवाय, या पंचाक्षराने जप करावा. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हे शुद्ध सत्त्वावाचून असणारे, शुद्ध बुद्ध परमात्मा मी स्वतःच झालो. असे माऊली सांगतात.
