॥ श्रीएकनाथमहाराजकृत
15.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय पंधरावा ॥
सीतेचा पूर्वजन्मवृत्तान्त :
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पदकमलरजोभिः मुक्तपाषाणदेहा
द्वियमभवदहल्या गौतमे धर्मपत्नी ।
त्वयि चरति विशीर्ण ग्रावविंध्याद्रिपादे
कति कति भवितारस्तापसा दारवण्त ॥१॥
श्रीरामचरण स्पर्शाचा परिणाम :
लागता श्रीरामपादरजःकण । जावोनिया पाषाणपण ।
जाहले अह्ल्योद्धरण । ते दारग्रहण गौतमें केले ॥१॥
चरणरजांचा प्रताप । अहल्या जाहली निष्पाप ।
हरून गौतमाचा विकल्प । स्त्री अनुरूप पतिव्रता ॥२॥
अगाध पदमहिमा देखोन । विस्मित जाले ऋषिजन ।
स्वर्गी सुरवर करिती स्तवन । नाम पावन तिही लोकी ॥३॥
पुढे विंध्याद्रीचे ठायी । जे पाषाण लागती रामपायीं ।
ते निःशेष विरोनि पाही । उठतील स्त्रीदेहीं सुंदरत्वें ॥४॥
तया स्त्रियांचे देखोन । बहुसाल तपस्विजन ।
ब्रह्मचर्य विरर्जून । दारग्रहणकरतील ॥५॥
ऋषिमुनींचे मिथिलानगरीकडे प्रयाण :
एवं ऋषिवर्यमंडली । रामकीर्तनाचे समेळी ।
चालती आनंदकल्लोळी । पुधे मिथिला देखिली ॥६॥
विदेहाची विदेहपुरी । पताका झळकती चिदंबरी ।
रविचंद्रांची लोपोनि थोरी । रत्नकळसांच्या हारी शोभती ॥७॥
वनश्रियेचिया शोभा । पूर्णत्वे पूर्ण करी नभा ।
प्राण स्तब्ध राहे उभा । होय प्रवेशारंभा आल्हाद ॥८॥
वृक्ष समूळी सपत्रीं गोड । बीजेवीण फळांचे घड ।
देखता पंथिकांचे पुरे कोड । छाया सेविता चाड निचाड होय ॥९॥
नवल त्या छायेची विश्रांती । कामक्रोधा होय शांती ।
त्रिविध ताप स्वये शमती । भ्रांति ते चिच्छक्ती स्वये होय ॥१०॥
सेविता त्या फळांचा स्वाद । क्षुधेतृषेचा निमे बाध ।
सबाह्य कोंदे परमानंद । अति सुस्वाद विटेना ॥११॥
जाणोनि त्या फळांची गोडी । शुकांची सवेग पडे उडी ।
तृप्ती लाहोइयां गाढी । उडण्याची ओढी विसरोनि गेली ॥१२॥
विदेहवनींच्या हंसांसी । नवलीला दिसे त्यांसी ।
सांडोनी उभय पक्षांसी । चिदाकाशीं उड्डाण ॥१३॥
देखोनि वनस्थळी । मुमुक्षुमयूर स्वानंदमेळीं ।
पिच्छें पसरोनि रोमावळी । सुखसुकाळी नाचती ॥१४॥
विदेहवनींचा सुगंध । पावतां प्रकटे परमानंद ।
देही पावे आनंद । होय निजबोध स्वानंदे ॥१५॥
स्वानंदे मयूर गर्जती । तेणे वेदार्थ चवकती ।
सांडोनि कर्मवादवृत्ती । निश्चल राहती निःशब्दें ॥१६॥
वनी पारवे ते घुमती । तेणे गंधर्वगाणी वेडावती ।
सामवेदाची उपरमे वृत्ती । पक्षी बोलती अनुतम्य ॥१७॥
प्रवेशतां रामचरण । ऐसी स्थिति पावे उपवन ।
हे विदेहाचे विदेहवन । अगाध महिमान कोण वर्णी ॥१८॥
स्वधर्में वसतां मगरीं । पिंगळा वेश्या समाधी वरी ।
ते विदेहाची विदेहपुरी । कोणे थोरी वर्णावी ॥१९॥
ज्याचे द्वारपाळाचें वचन । शुकासी दे समाधान ।
हे जनकाचें अति महिमान । अगाध लक्षण परमार्थी ॥२०॥
स्वयंवर यज्ञमंडपावरील रूपक :
तेचि नगरबाह्य प्रदेशीं ।राम देखे जनकयागासी ।
जो सीतास्वयंवरोद्देशी । बहुक्लेशेंसीं योजिला ॥२१॥
धैर्याचा स्तंभ निर्धारी । धर्माचे आडवळे तयावरी ।
शांतीनें सेविला कुसरी । त्या मंडपामाझारी यज्ञ्वाट ॥२२॥
निर्धूम अग्नि अति उद्भट । इंधनेंविण अति लखलखाट ।
ज्वाळा अतिशये चोखट । सुखस्वादिष्ट प्रकाश ॥२३॥
ॐकार अर्धमात्रा निजार्थें । जे जाणती पै परमार्थें ।
तेचि होते पोते उद्गारते । अक्षरार्थें द्वारपाळ ॥२४॥
निर्गुणेंसी वळिलें त्रिगुण । तेंचि तेथींचे त्रिसंधान ।
विवेकाचे परिस्तरण । परिसमूहन नैराश्ये ॥२५॥
निष्कंटक इध्मा पूर्ण । भूता ऐक्यें बर्हिबंधन ।
श्रद्धा आज्यस्थाली स्थापून स्रुक्स्रुवामार्जन प्रत्यगावृत्ति ॥२६॥
वक्रबुद्धीच्या वक्रोक्ती । त्याची आघाराज्याहुती ।
पाठी प्रधानहोम होमिती । सहित प्रकृतिमहत्तत्वेंसीं ॥२७॥
युक्तिप्रयुक्तीं ज्ञानाभिमान । द्रव्य दारा ममता मान ।
गुरुमंत्रें त्यांचे केले हवन । विनियोगविधान न ममेति ॥२८॥
सावधानतासादृश्य । कर्मी ब्रह्मतारहस्य ।
अवभृथस्नानसामरस्य । निमज्जनीं उल्लास परमानंदे ॥२९॥
कॆह्त्रा प्रतिपाळी संपूर्ण । क्षेत्रपाळ तो चिद्घतन ।
त्यासी देती विषयांचे बळिदान । वासनास्मरणव्समवेत ॥३०॥
यालागी त्या बळिदानासी । परतोनि पाहो नये त्यासी ।
स्मरण उरो नये मानसी । एवं शुद्धविधीसी बळिदान ॥३१॥
अखंडत्वे नित्यस्थिती । तेचि वसुधारा अहोरातीं ।
अहंकाराची पूर्णाहुती । फळसंयुक्तीं होमिली ॥३२॥
स्वये सांडणे मीतूंपण । हेंचि श्रेयः संपादन ।
आत्मत्व देणे हे अगाध दान । समाधान स्वानंदे ॥३३॥
परमानंदे अभिषिंचन । सवेंचि भवभय विसर्जन ।
ऐसा विदेहाचा यज्ञ । रामे आपण देखिला ॥३४॥
नाना देशींचे ब्राह्मण । नाना भाषा अति प्रवीण ।
वेदशास्त्रार्थी अति संपन्न । देदीप्यमान तेजस्वी ॥३५॥
ऐसिया ब्राह्मणांच्या थाटी । विदेहाच्या यज्ञवाटीं ।
श्रीरामे देखोनिया दृष्टी । पोटी अत्यंत सुखावला ॥३६॥
श्रीरामाचा यज्ञभूमीजवळ निवास केला :
श्रीराम म्हणे विश्वामित्रासी । स्वामीनें रहावे यज्ञवाटापासीं ।
वचन मानले कौशिकासी । तेचि प्रदेशी निवास केला ॥३७॥
महीवतीचें स्वच्छ जीवन । तीरीं अगाध उपवन ।
सदाफळी शोभायमान । ते निवाडस्थान श्रीरामाचे ॥३८॥
घेवोनि ऋषिवरांचा संभार । आला ऐकोनि विश्वामित्र ।
जनक धांवला सत्वर । केला नमस्कार सद्भावे ॥३९॥
हर्षे दिधले शतगोदान । केले मधुपर्कपूजन ।
तैसेच पूजिले ऋषीजन । साधुसज्जन आल्हादे ॥४०॥
राजा बोलिला हरिखें जाण । आजि सुफळ माझा यज्ञ ।
आजि माझे सुफळ नयन । साधुदर्शन देखोनी ॥४१॥
साधूंसी क्षेत्र आलिंगन । तेणे शरीर होय पावन ।
साधूंसे मृदु भाषण । वाचा आवन तद्योगें ॥४२॥
साधूम्चे चरणतीर्थ । सेविता अंतर पुनीत ।
साधुसंगे सुनिश्चित । ब्रह्मप्राप्ति भाविका ॥४३॥
बहुकाळ याग यजिता विधीं । यज्ञीं नव्हेचि यज्ञसिद्धी ।
तू आलासि कृपानिधी । यज्ञाची त्रिशुद्धी सिद्धी झाली ॥४४॥
कौशिक रायातें पुसत । स्वस्थ राज्य स्वस्थ चित्त ।
येरु म्हणे हे कृपासमर्थ । स्वस्थ सुनिश्चित सर्वार्थभावें ॥४५॥
राजा जनकाकडून श्रीराम-लक्ष्मण वर्णन :
राजा पुसे दोघे जण । अग्नितेजें विराजमान ।
हेही उपमा यांसी गौण । तेंही लक्षन अवधारी ॥४६॥
अग्निसान्निध्य सर्वाते तावी । यांची सन्निधि सर्वांते निववी ।
यांची पाहता पै पदवी । जीवींच्या जीवी आल्हाद ॥४७॥
यांचे देखिलिया दर्शन । डोळियांस नावडे आन ।
यांच्या स्वरूपीं जडले मन । चित्त चिंतन विसरूनी ॥४८॥
सुंदर आणि सुकुमार । रूपरेखा मनोहर ।
ठाणमाण अति गंभीर । हे कोणाचे कुमर नृप पुसे ॥४९॥
दुर्गम मार्ग अति दारुण । यांचे कैसेनि आगमन ।
तुजसी यांसी का सन्निधान । हे समूळ कारण मज सांग ॥५०॥
विश्वामित्रांचे उत्तर :
ऋषि म्हणे हे दशरथाचे कुमर । रामलक्ष्मण महावीर ।
ऐक राया यांचे चरित्र । अति पवित्र सांगेन ॥५१॥
माझा याग न पवे सिद्धी । मारीच सुबाहु सदा बाधी ।
ताटिका सर्व मार्ग विरोधी । आश्रमा त्रिशुद्धी उपहती करी ॥५२॥
यालागी म्या अनुष्ठान । करूनि हर केला प्रसन्न ।
तेणे मज करूनि सावधान । हे गुह्य ज्ञान सांगितले ॥५३॥
साक्षात् पूर्ण परब्रह्म । अवतरले दाशरथि राम ।
त्याचेनि सिद्धि पावेल होम । राक्षसा भस्म तो करील ॥५४॥
शिववचनविश्वासीं । म्या जावोनि दशरथापासीं ।
मागून आणिले श्रीरामासी । निजयागासी सिद्ध्यर्थ ॥५५॥
मार्गीं ताटिका छेदिली । मार्गस्थां मार्ग निर्मुक्त केली ।
सिद्धाश्रमीं वस्ती जाली । ख्याती लाविली राक्षसा ॥५६॥
सुबाहु निवटिला वाणधारा । मारीचास लागला पिसारा ।
तो उडविला समुद्रतीरा । येरा निशाचरा निर्दाळिलें ॥५७॥
अवचट लागता चरणी । अहल्या उद्धरली तत्क्षणीं ।
अगाध श्रीरामाची करणी । वेदपुराणीं जगद्वंद्य ॥५८॥
तो हा हरचापदर्शनेच्छा । आला असे आम्हांसरिसा ।
देखोनि श्रीरामाचा ठसा । जनकमानसा उल्लास ॥५९॥
सीतेसी अनुरूप नोवरा । श्रीरामचि निजनिर्धारा ।
परी धनुर्धारणां महावीरां । अति दरारा बळिष्ठ ॥६०॥
सीतेचा जन्मवृत्तान्त :
जनक म्हणे ऋषिराजा । सीता माझी निजात्मजा ।
परी ते मुख्य अयोनिजा । ऐक महाद्विजा तो भाव ॥६१॥
अपवाहतयः क्षेत्रं हलाग्रात् उत्थितामिमाम् ।
सर्वलक्षणसंयुक्तां नाम्ना सीतेति विश्रमात् ॥२॥
नांगर वाहता शेतीं । पेटी लागली हलाचिये दांतीं ।
ती उघडितां त्यामाजी हे आंत होती । रूपवती ममात्मजा ॥६२॥
शतानंदाकडून कथाकथन :
ऐकोनि रायाचा शब्द । अहल्याकुमर शतानंद ।
जनकपुरोहित प्रसिद्ध । तेणे पूर्वानुवाद आरंभिला ॥६३॥
ब्रह्मशापाचें क्रूर अज्ञन । त्यामाजी माझी माता निमग्न ।
तिसी लागता श्रीरामचरण । जाली उद्धरण जगद्वंद्य ॥६४॥
लागता श्रीरामचरण । स्वये उद्धरती पाषाण ।
हेंही नवल नव्हे जाण । जगदुद्धारन श्रीराम ॥६५॥
नाममहिमा :
अगाध श्रीरामाचे नाम । नाम निर्दाळी क्रोध काम ।
नाम निवारी मरण जन्म । नाम ते ब्रह्म निर्द्वंद्व ॥६६॥
अबद्ध पडता वेद । तत्काळ बाधी निषेध ।
अबद्ध नामे प्रसिद्ध । होती शुद्ध पहापापी ॥६७॥
अबद्ध मंत्राच्या आवर्तीं । जपक चळले नेणो किती ।
अबद्ध नामाच्या नामोक्तीं । अबाध कीर्ति वाल्मीकाची ॥६८॥
अबद्ध नामे नारदोक्ती । मारा मारा या वचनोक्तीं ।
रामनामी लागली वृत्ती । पापनिष्कृति वाल्मीकाची ॥६९॥
करिता अबद्ध नामपठण । वाल्मीक उद्धरला आपण ।
वदला शतकोटी रामायण । कथा पावन शिववंद्य ॥७०॥
ते देखता श्रीराममूर्ती । हर्षे विरे चित्तवृत्ती ।
आनंद ओसंडेचि त्रिजगती । हे स्वरूपस्थिति श्रीरामाची ॥७१॥
रामनामी अभेदस्थिती । यालागी जड उद्धरती ।
राम केवळ ब्रह्ममूर्ती । आद्यशक्ती ते सीता ॥७२॥
ते सीतेची उत्पत्ती । ते मी सांगेन पूर्ववृत्ती ।
जे म्या ऐकिली नारदोक्तीं । तेचि तुम्हांप्रति सांगेन ॥७३॥
पद्माक्षराजाचे अनुष्ठान :
पूर्वी पद्माक्षराजा अति पावन । त्याने करोनि अनुष्थान ।
रामा केली सुप्रसन्न । माझे कन्यारत्न् तू होईं ॥७४॥
येरी म्हणे गा नृपनाथा । मज न घडे जन्मकथा ।
भगवंती अन्वयो न लाभतां । जाण तत्त्वता नरवर्या ॥७५॥
ऐसे ऐकोनिया वचन । राये धरूनि दृढ ध्यान ।
भगवंत केला सुप्रसन्न । मागे वरदान कन्यार्थी रमा ॥७६॥
विषयांचिये विषयपुष्टी । रमा गोड प्रथमदृष्टीं ।
लक्ष्मी विमुख जालिया पाथी । दुःखकोटी श्रीमंता ॥७७॥
लक्ष्मी आलिया जे सुख । सुख नव्हे ते केवळ दुःख ।
सुख मानिती ते केवळ मूर्ख । जाण निष्टंक नृपनाथा ॥७८॥
राजा म्हणे श्रीहरी । रमा खेळे मांडीवरी ।
ऐसीच मज कृपा करी । म्हणोनि निर्धारी धरिले पाय ॥७९॥
विष्णुकडून वरप्राप्ती :
ऐसे रायाचे मनोगत जाण । जाणोनिया विष्णू आपण ।
देता जाला मातुलिंग पूर्ण । येंएं कन्या जाण पावसी रमा ॥८०॥
ते मातुलिंग द्विधा करिता । कन्या देखिली अतिरूपता ।
रायासी उपजली ममता । माझी दुहिता म्हणोनी ॥८१॥
पद्माक्षाचें घरी जन्म । यालागी पद्मावती हे नाम ।
तिचे रूप देखोनि उत्तम । उल्लास परम रायासी ॥८२॥
जन्मली मातुलिंगाप्रती । ती दोनीं शकले एक होती ।
तेंचि मातुलिंग शक्तीच्या हाती । स्वये सप्तशती बोलत ॥८३॥
पद्मावतीविवाह, भयंकर रणकंदनातून सर्वनाश :
कन्या स्वयंवरायोग्य । राये विवाह आरंभिला सांग ।
भाळोनि आले ऋषिवर्ग । योग्य ता योग्य मिरविती ॥८५॥
आले देव दानव मानव । नर किन्नर गंधर्व ।
राजे पावले सर्व । दैत्यसमुदाव बळेंसी ॥८६॥
कन्या देखोनि रूपस । सवेग पावले राक्शस ।
स्वरूप देखोनि बहुवस । अति कर्कश संग्रामा ॥८७॥
राये पण केला क्षोभदृष्टीं । आकाशाची सुनीळ उटी ।
ज्याचे आंगी शोभे गोमटी । त्यासी हे गोरटी वरील ॥८८॥
पण ऐकोनि दुर्धर । क्षोभले अवघे सुरासुर ।
कन्याहरणार्थ तत्पर । जाले नरवीर सन्नद्ध ॥८९॥
धरू धांवलें यक्ष राक्षस । देओहिनि क्षोभला पद्माक्ष ।
बाणी साधोनियां लक्श । विपक्षपक्ष त्रासिला ॥९०॥
घायीं त्रासिले निशाचर । राये पळविले संभार ।
आकाश लंघिती सुरवर । दैत्यीं दुर्धर युद्ध केले ॥९१॥
तेही पळविले दैत्यगण । रायासी खडतरले बाण ।
तेणेम् रणांगनीं प्रण । सांडिला आपण क्षात्रवृत्तीं ॥९२॥
पद्मावतीची अग्नीत उडी आणि बाहेर आगमन :
जाली रणाची निरवडी । कन्या धरिता तांतडी ।
तिणे उठोनि लवडसवडी । अग्निमाजी उडी घातली ॥९३॥
नोवरी नव्हेचि प्राप्त । राक्षस क्षोभले अत्यद्भुत ।
घरे पाडोनिया समस्त । नगर उपहत तिही केले ॥९४॥
सुरनरा असुरां कंदन । करोनि राये दिधला प्राण ।
राणियां केलेम् सहगमन । लक्ष्मी ते विघ्न श्रीमंतांसी ॥९५॥
प्रतिपाळिते प्राणा मुकले । अभिलाषिते रणी पडिले ।
उरले ते रडत गेले । लक्ष्मीचें केले असे आहे ॥९६॥
ते आदिशक्ति नोवरी । निघाली अग्निकुंडाबाहेरी ।
तंव बाहेर भोंवलीं बोहरी । मग कुंडाच्या तीरीं एकाएकी बैसे ॥९७॥
तिला नेण्याचा रावणाचा प्रयत्न, पुन्हा अग्निप्रवेश :
विमानी विचरता रावण । त्यासी प्रधान सांगे सारण ।
जियेलागीं जाले रणकंदन । ते हे जाण नोवरी ॥९८॥
इसी धरूं जाता सुरासुरी । उडी घातली अग्निमाझारी ।
ती हे निघोनि बाहेरी ।कुंडाच्या तीरी बैसलीसे ॥९९॥
तिचे देखोनि बरवेपण । रावण अभिलाषी संपूर्ण ।
धरूं जाता आपण । अग्निप्रवेशन नोवरीये केले ॥१००॥
तंव रावण बोले हासोनि । अग्निमाजी तुझी लपणी ।
ते सुरवर नेणती कोणी । तरी मी शोधूनी धरीन आता ॥१॥
कुंडात पंचरत्नाप्राप्ती :
तेथे अति क्षोभे रावण । कुंड विझवी आपण ।
शोधिता नोवरी न लभे जाण । तेथे पंचारत्नेंण जाण सांपडली ॥२॥
त्या रत्नांवची पाहता शोभा । लपोनि जाय सूर्यप्रभा ।
महातेजाच्या निजगाभा । रावण उभा विस्मित ॥३॥
सावध करोनिया निजमना । मग तया दिव्यरत्नांन ।
करोनिया अतियत्ना । चढोनि विमाना लंकेसी आला ॥४॥
ती रत्नेंि अति गोमटी । मंदोदरीस द्यावया भेटी ।
ते देव्हारां ठेवोनि पेटी । आपण उठाउठी सेजारां आला ॥५॥
स्त्रियेसी सांगे गुह्य गोष्टी । रत्नेंद अत्यंत गोमटीं ।
तुज शोभती कंथीं मुकुटी । ते देव्हारां पेटी ठेविलीसे ॥६॥
ते पेटी तिसी उचलितां । नुचलेचि पै सर्वथा ।
रावने उपहासोनि कांता । आपण तत्वता उचलू आला ॥७॥
त्यासी उचलितां विसां हाती । नुचलेचि पै सर्वशक्तीं ।
बलाची मावळती गती । रावण चित्ती चळकांपे ॥८॥
तेथे मिनले प्रधान । वेगे आले सुहृज्जन ।
पेतीमाजी कोण निधान । काढोनि पाहू आपण गेला ॥९॥
रत्नमपेटी उघडतांच तेजस्वी कन्यादर्शन :
ते उघडतांचि पेटी । तेजे झांकल्या त्यांच्या दृष्टी ।
अनर्घ्यरत्नग कन्या गोमटी । देखोनि गोरटी साशंकित ॥११०॥
सावध होवोनि लंकानाथ । कन्येचा सांगे पुर्ववृत्तांत ।
मंदोदरी म्हणे हे कृत्या निशित । करावया कुळघात का आणिली ॥११॥
पाळिता निर्दाळिली पिता जननी । सुरासुरी भुलोनि निमाले रणी ।
दानवमानवांच्या श्रेणी । पदिल्या रणांगनीं इचेनि ॥१२॥
रत्नमपेटी भूमीत पुरण्याविषयी मंदोदरीचा सल्ला :
भविष्य बोले मंदोदरी । हे प्रतिपाळित्यातें संहारी ।
उद्यां भोवंडील बोहरी । हे राष्ट्राबाहेरी सांडावी ॥१३॥
इचा करिता बाळघात । आतांचि उपजेल अनर्थ ।
हे न ठेवावी राज्यांत । त्यागावी निश्चित राष्ट्रांतरी ॥१४॥
आतांचि हे इची पेटी । रावण नुचलवे संकटीं ।
इसी मारिता कडकडाटीं अनर्थ कोटी होईल ॥१५॥
अचेतन खांब हाणिता लाथा । हरिण्यकशिपु पावला घाता ।
येथेंही होईल तेचि कथा । इसी तत्त्वता त्यागावें ॥१६॥
वचन मानले लंकानाथा । युक्ती मानली समस्ता ।
पेटी त्यागावया सर्वथा । सवेग दूतां बोलावी ॥१७॥
कन्यात्यागा शीघ्रवंत । विमान आणिले त्वरित ।
मंदोदरी दूतांसी सांगत । हे पेटी भूमिगत करावी ॥१८॥
प्रकट पेटी ठेवाल जेथे । तत्काळ अनर्थ उपजेल तेथे ।
यालागी करावी भूमिगत । अति गुप्त निक्षेप ॥१९॥
जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । हे वाढेल त्याचे घरी ।
जो आत्मत्वें वर्तेल चराचरी । त्याच्या घरी नांदेल ॥१२०॥
पेटीतून प्रकटलेली भविष्यवाणी :
पेटी घालितांचि विमानी । तियेमाजी उठली ध्वनी ।
मी मागुतीं येईन लंकाभुवनीं ।राक्शसदहनीण् दहनार्थ ॥२१॥
माझे करिताची अभिलाषण । रावनासी येईल मरण ।
माझे निमित्त संपूर्ण । निर्दळन राक्षसा ॥२२॥
ऐसा ऐकतांचि शब्द । रावण झाला अतिस्तब्ध ।
राक्शस धाकती सुबद्ध । भविष्य विरुद्ध ऐकोनि ॥२३॥
दूतीं पेटी घालोनि विमानी । पाहत पाहत आले या वनी ।
विदेहाची सीमा लक्षूनी । पेटी निक्षेपूनी ते गेले ॥२४॥
जमीन नांगरताना ब्राह्मणाला पेटीची प्राप्ती, त्यावरील मालकीसंबंधी चर्चा :
ते भूमि जनकें धर्मार्थीं ।द्विजासी दिधली क्षेत्रवृत्ती ।
तोही नांगर धरावया शेतीं । अति निगुतीं मुहूर्त पाहे ॥२५॥
वेळ साधोनि सुमुहूर्ती । नांगर धरिताचि शेतीं ।
प्रथम तासाचे उपहती । फाळाच्या दांती पेटी लागली ॥२६॥
द्विजासी सांग क्षेत्रदूत । धन्य धन्य तुझा सुमुहूर्त ।
पीक पिकलें अद्भु्त । निधि निश्चित पहा स्वामी ॥२७॥
द्विजें पेटी देखतांचि जाण । म्हणे गुप्त ठेवा ते राजधन ।
मज क्षेत्र दिधले दान । ठेवा आपण घेऊ नये ॥२८॥
ते पेटी घेवोनि हाती । द्विज आला राजसभेप्रती ।
हा गुप्त ठेवा होता तुमचे शेती । तो त्वाम् भूपति घेईजे स्वये ॥२९॥
राजा बोले धर्मवचन । तुम्हांसी दिधले भूमिदान ।
तेथील जे धनधान्य । ते ब्रह्मार्पण द्विजवर्या ॥१३०॥
द्विज धर्मार्थीं अति प्रवीण । मज समर्पिले क्षेत्र दान ।
नाही दिधले गुप्तधन । हे मी आपण स्पर्शेना ॥३१॥
धनलोभ नाही द्विजा । धनलोभ नाही भूभुजा ।
परम संकटीं पडिला राजा । हे साधुसमाजा कळो आले ॥३२॥
तेथे साधु बोले वचन । यामाजी कोण आहे धन ।
ते काढोनि पहावे आपण । मग शास्त्र विधान विचारूं ॥३३॥
ते उघदितांचि पेटी । सौंदर्याची दीप्ती दृष्टी ।
कन्या देखिली गोरटी । आश्चर्य पोटी सर्वांच्या ॥३४॥
कन्या दृष्टी देखतांची देख । डोळियां लागली टकमक ।
विस्मये दाटले सकळिक । अलोलिक सौंदर्य ॥३५॥
पेटीतील कन्येचा जनकाकडून स्वीकार :
देखोनि लावण्यनिधान । जनकें उचलिली आपण ।
म्हणे हे माझे कन्यारत्न् । भेरी निशाण त्राहाटिले ॥३६॥
गगन गर्जें मंगळतुरीं । सभा गर्जे जयजयकारीं ।
शांतिपाथ पढिजे ऋषीश्वरी । वेदोक्तमंत्री अभिव्यक्त ॥३७॥
जनके पाळिली म्हणोनि जनकात्मजा । धरेनें राखिली अति ओजा ।
यालागी म्हणति धरणिजा । परी ते अयोनिजा जगदंबा ॥३८॥
नांगर वाहता लागली दांती । सीता जन्म पावली शेतीं ।
ते सांगितली पूर्वस्थिती । हे नारदोक्ती यथार्थ ॥३९॥
सीतेचे जन्मलक्षण । यासी मूळ स्कंदपुराण ।
कालिकाखंडीं हे निरूपण । समूळ संपूर्ण लिहिलेंसे ॥१४०॥
अहल्येचा ज्येष्ठ सुत । जनकाचा जो पुरोहित ।
शतानंदस्वामी समर्थ । तेणे हा वृत्तांत सांगितला ॥४१॥
सांगितली सीतेची उत्पत्ती । आता सीतास्वयंवरार्थीं ।
जनकासी हरचापप्राप्ती । झाली कैशा रीती ते ऐका ॥४२॥
एकाजनार्दना शरन । जाले सीताजन्मकथन ।
पुढे हरचापप्रकरण । सज्जनीं सावधान परिसावे ॥१४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
जानकीजन्मकथा नाम पंचदशोऽध्याय ॥१५॥
॥ श्लोक २ ॥ ओव्या १४३ ॥ एवं १४५ ॥
