॥ श्रीएकनाथमहाराजकृत
62.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बासष्टावा ॥
रावणाचा शिरच्छेद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणाची स्थिती व श्रीरामस्वरुपावलोकन :
सोहंभावाचा मेढा सुलक्षण । अनुसंधानाचा तीक्ष्ण बाण ।
लक्षूनियां रघुनंदन । स्वये रावण विंधो पाहे ॥१॥
तंव अवघा ब्रह्मांडगोळ । रामे व्यापिला दिसे सकळ ।
तेथे कायसे जगतीतळ । रामे प्रबळ वाढिन्नला ॥२॥
सत्पपाताळातळीं चरण । श्रीरामाचे देखे रावण ।
ऐका तयाचे लक्षण । सुलक्षण सुचिन्हीं ॥३॥
निजधैर्यशेषफडीवरी । श्रीरामचरण निर्धारी ।
सुचिन्हें शोभती कवणेपरी । नवलपरी तेथींची ॥४॥
अनुपम चरणपंकज । शोभे सायुज्याचा ध्वज ।
उर्ध्वरेखा ते सहज । दावी वोज उर्ध्वगतीची ॥५॥
वज्र आणि अंकुश दोन्ही । भक्तसाह्यालागोनी ।
विपक्षीं अंकुश ओढोनी । भक्तरक्षणीं छेदी वज्रें ॥६॥
अनंतसूर्यांची किरणें । जैसी मिरवती बाळपणे ।
त्याते आणोनियां उणें । अधिकगुणे चरणतळा ॥७॥
जैशा नभाचिया कळिका । तैसी शोभा अंगुळिका ।
शोभताती अलोकिका । रसातळलोकापर्यंत ॥८॥
नखचंद्री चंद्ररेखा । रमा रातली चरणपीयुखा ।
गंगेचें ते माहेर देखा । सकळ लोका उद्धरी ॥९॥
कैशी घोंटियांची बरव । हे तंव निर्गुणाचे अवयव ।
वरी कळावियांची ठेव । सागरी अपूर्व श्यामलहरी ॥१०॥
तळातळ लोक जाण । तेणे वसविले संपूर्ण ।
वांकीतोडरांचें महिमान । वर्णावया वदन मज कैंचें ॥११॥
यमनियमांच्या कुसरी । मने मुरडिली माघारीं ।
जे सोहंभावाच्या गजरीं । वांकी निर्धारी गर्जत ॥१२॥
भवस्वर्गा प्रळयकाळ । नामे प्रळयघंघाळ ।
तोडर गर्जोन केवळ । सांगे प्रबळ सायुज्यदान ॥१३॥
सूर्यबिंबामाजी प्रभा । तैसी जानुचक्रीं शोभा ।
महातळींचा तो गाभा । दिसे उभा शोभत ॥१४॥
ऊरुंची शोभा अद्भुत । सुतळलोक जेथे नांदत ।
बळिराजा नित्यांकित । राज्य करित पै तेथे ॥१५॥
बळि चरणाचा अनुरक्त । केंवी राहिला सुतळांत ।
त्या बळीचा निश्चितार्थ । ऐका सुनिश्चित सांगेन ॥१६॥
उर्ध्वलोका देवोनि लात । अधोवदनें नित्यव्रत ।
सुतळीं राहोनि निवांत । चरण चिंतित रामाचे ॥१७॥
राहोनिया मध्यालोकीं । श्रीरामतें अवलोकी ।
सांडोनिया अधऊर्ध्वाची उखी । मेळवित एकी श्रीरामी ॥१८॥
कटिप्रदेशीं वितळलोक । विस्तारला एकाएक ।
पाहता तेथींचा आलोक । लोकालोक हारपे ॥१९॥
सर्वांमाजी तोचि मध्य । शोभा शोभे विद्गद ।
अतळलोक प्रसिद्ध । तये स्थानी नांदत ॥२०॥
विजु देखोनि श्रीरामासी । विसरली उदयास्तांसी ।
झाली पीतांबर कासेसीं । माळ कंठींसीं मिरवत ॥२१॥
श्रीराम आकळे सगळा । तेच भक्त भावार्थमेखळा ।
उपनिषदांचा पाळा । येवोनि रिघाला किंकिणींमाजी ॥२२॥
चिद्ररत्ने कटिसूत्रकटीं । उपरी मिरवे माळगांठी ।
अनुहताच्या निजनेटीं । ध्वनि गोमटी क्षुद्रघंटा ॥२३॥
झालिया स्वस्वरुपी भेटी । जेंवी वृत्ति होय उफराटी ।
सांडोनिया मत्तचावटी । अधोदृष्टी । सलज्ज ॥२४॥
तेंवी अधोमुख घंटिका । पालवीं मुक्तलग नेटका ।
कांसे लागलिया देखा । मुक्ति सकळिका देत राम ॥२५॥
उदर म्हणती दामोदर । परी ते जगदुदर साचार ।
त्रिलोकत्रिवळी सुंदर । वरी मनोहर रोमरेखा ॥२६॥
अनंतब्रह्मांडसाटोवा । की विश्रांति सकळ जीवां ।
म्हणोनि दामोदर या नांवा । मिरवावया ख्याति झाली ॥२७॥
नाभि सखोल निर्मळ । रजोरागे रातोत्पळ ।
सृष्टिकर्त्याचें केवळ । जन्म प्रबळ तये स्थानी ॥२८॥
भूलोकांचें अधिष्ठान । उदर श्रीरामाचे पूर्ण ।
तळी सप्तपाताळें संपूर्ण । ऊर्ध्वलोकाचे रचन त्यावरी ॥२९॥
हृदय शुद्ध अव्यंग । संकल्पविकल्पातीत सांग ।
तेथे रंगले अंतरंग । अति सभाग्य साधुजन ॥३०॥
दक्षिणांगीं विप्रपादेंकरीं । आपुल्या महिम्याची थोरी ।
वाढविली प्रीतीकरीं । लात उरावरी साहोनि ॥३१॥
केवळ सुखाचेंही सुख । गुणग्रंथिरहित देख ।
साधूनि रत्नजडित पदक । अलौलिक शोभत ॥३२॥
सोलींव सुखाचे निजसार । श्रीरामहृदयावरी पदकहार ।
सत्वगुणीं अति सुंदर । श्रीरघुवीर शोभत ॥३३॥
भक्तिवैराग्यशुद्धिसंपुटीं । मुक्तमोतियें जन्मलीं गोमटीं ।
तेंवी श्रीरामाचिये कंठी । वैजयंती गोमटी सुरेखा ॥३४॥
चिंतात्यागें निर्म्ळ् वृत्ती । तेचि अम्लान माळा शोभती ।
भूर्लोकाची तेथे वसती । लंकापति देखत ॥३५॥
अष्टपत्री निर्मळ । अंतरी विकसित कमळ ।
अनन्यगतीच्या दृष्टि बहळ । तुळसीदळमंडित ॥३६॥
सप्तावरणांहून उदंड । अति दिर्घ बाहुदंड ।
तन्मयाचे मिरवे कोदंड । अति प्रचंड साजिरे ॥३७॥
दुजे करी निर्वाण । चहू पुरुषार्थांचे बाण ।
देहअहंकृति रावण । वधावया जाण धरियेले ॥३८॥
दोही हाती परिकर । दोन्ही आयुधे विचित्र ।
दिशेंद्रियें दशवक्त्र । निवटावया सत्वर धरिलींसे ॥३९॥
ओंकार तोचि कंबुकुंठ । मात्रात्रयाचें मूळपीठ ।
वेद तेथोनि प्रकट । झाला उद्भट त्रिकांडी ॥४०॥
ते महर्लोकरचन । रविता झाला रघुनंदन ।
त्यांचे श्रवणाचें महिमान । दशानन विवंची ॥४१॥
समूळ चैतन्याचें आळें । तैसे रामाचे विशाळ डोळे ।
मनोगतें पै सकळे । एके काळी देखणे सदा ॥४२॥
पूर्वोत्तरमीमांसा दोन्ही । अहर्निशी भजती भजनीं ।
म्हणोनिया श्रीरामश्रवणीं । कुंडालालागूनि अधिकारु ॥४३॥
श्रीराम लेणियांचे लेणे । विश्व मुक्त त्याचेनि श्रवणें ।
श्रवणेंचि देखिला रावणे । नारदवचनेंकरोनी ॥४४॥
आनंदविश्रांतीस आले । की निवोनि सुख मुसावलें ।
तेंचि साचार शोभले । वदनबिंब निमासुर ॥४५॥
त्या आनंदसागराचे तरंग । तेचि दशन सुरंग ।
अधरीं उभय दिसे योग । जीवशिवभाग एकत्र ॥४६॥
श्रीरामाचे प्रसन्न वदन । तेथे जनांसी विश्रांति गहन ।
म्हणोनि स्वर्गादिकस्थ जन । करिती ध्यान रामाचे ॥४७॥
निजनैराश्यपरिकर । एकनिष्ठता मुनिवर ।
का अविच्छिन्न तैलधार । तैसे नासिक सुंदर श्रीराममुखीं ॥४८॥
समूळ चैतन्याचें आळें । तैसे रामाचे विशाळ डोळे ।
श्रवणांत पै सकळे । एके काळे देखणे सदा ॥४९॥
रवि शशी निरंतर । तेजे झाले प्रकाशकर ।
तेचि सेविती स्वतंत्र । श्रीरामनेत्र होउनी ॥५०॥
निजात्मबुद्धिउल्लासें । तपें केली खरपुसें ।
म्हणोनि नेत्राचेनि प्रकाशे । वसे सावकाशे तपोलोक ॥५१॥
श्रवणांत अति दीर्घता । द्वैतदृष्टी पै होता ।
न ये पाहता सर्वथा । अतर्क्यता स्वभाव ज्याचा ॥५२॥
नवल तेथींचे निरीक्षण । करीत कामासीं कामन ।
डोळ्या डोळेमोहन । आवडी जाण पडतसे ॥५३॥
जेंवी गगनोदरी धनुष्यरेखा । तैशा भोंवया सुरेखा ।
की वदनेंदुचिया पीयूखा । सेविती आर्त चकोर ॥५४॥
जैसे अधिष्ठान निर्मळ । तैसे विस्तीर्ण कपाळ ।
अखंड न खंडे त्रिकाळ । त्रिवळी प्रबळ तेचि निढळीं ॥५५॥
संकल्पमृग वधिला लोभी । काढिला सोहंमृगनाभी ।
तोही अर्पिला पद्मनाभीं । निरालंबी मळवट ॥५६॥
स्वस्वरुपें प्रबळ । सबाह्याभ्यंतर निर्मळ ।
पावोनिया श्रीरामभाळ । वसती सकळ सत्यलोकी ॥५७॥
नभ शून्यत्वा उबगले । ते श्रीरामा शरण आले ।
येवोनि मस्तकी राहिले । नीळालकीं शोभत ॥५८॥
गजेंद्रदंताची भक्तिफणी । स्वभावे मस्तकी धरोनी ।
तिये कुरळ केश विंचरोनी । वीरगुंठी दाटिली ॥५९॥
वरी शुद्ध मनाची सुमनें । गुंफोनि अनुसंधानें ।
सुवासितें चैतन्यपणें । बांधिता ठेंगणें नभरामा ॥६०॥
वानू मुकुटाचा महिमा । कैंची उपमा निरुपमा ।
तेणे रचना मनोरमा । वैकुंठा आणि कैलासा ॥६१॥
ऐसे चतुदर्शभुवन । वैकुंठकैलासादिकरुन ।
प्रकाशिता रघुनंद । देखोनि रावण तटस्थ ॥६२॥
अपरिमित चौपासी । देखोनिया श्रीरामासी ।
रावण चढला आवशीं । बाण सीतासीं लाविला ॥६३॥
समरांगणीं निजकडाडीं । बाण ओढोनि कानाडी ।
निजभिमानें हाक फोडी । लक्ष निर्वडी भेदावया ॥६४॥
अनंब्रह्मांडांचिया पंक्ती । ज्याचे कडवसां भासती ।
तो विंधावया रघुपती । लंकापति लक्ष्य पाहे ॥६५॥
तंव पिरीत झाले तेथे । स्थुळ सूक्ष्म जितुकीं भूते ।
वेगळालीं पै समस्ते । राम निश्चित देखतसे ॥६६॥
वानरसैन्याभीतरी । राम विंधावया बाणेकरी ।
पाहता झाळा दशशिरी । तंव प्रतिशरीरीं श्रीराम ॥६७॥
गजाकडे जंव पाहत । तंव् महावता सहित ।
गज देखिला रघुनाथ । सवेंचि पाहत रथाकडे ॥६८॥
रावणाला सर्वत्र रामसाक्षात्कार :
तंव रथवारुंसहित । सारथिशस्त्रास्त्रांसमवेत ।
ध्वजापताका मंडित । देखे लंकानाथ श्रीराम ॥६९॥
सपर्वत वानरभार । द्रुम पाषाण परिकर ।
पृथक पृथक रघुवीर । दशवक्त्र देखत ॥७०॥
सौमित्र बिभीषण तेथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।
तार तरळादि समस्त । हनुम्यासहित श्रीराम ॥७१॥
निजसेनेचे राक्षस । रणयोद्धे रणकर्कश ।
त्यांचा लोपोनि राक्षसभास । सावकाश राम झाले ॥७२॥
फिरोनि पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे ।
गुप्तद्वारें जी अवघडें । गूढें निगूढें राम झाला ॥७३॥
घरे चौबारें समस्त । महा सोपानें अद्भुत ।
दुर्गाची सामग्री समस्त । राम निश्चित होवोनि ठेला ॥७४॥
पाहता यंत्रगोळांकडे । यंत्रद्रव्य जे अवघडें ।
दुर्धर शस्त्रे जी अति प्रचंडें । निजनिवाडे राम झाला ॥७५॥
आपला जो का निजरथ । वारुसारथिध्वजांसहित ।
स्वये झाला रघुनाथ । अति विस्मित रावण ॥७६॥
नेहटून पाहे जंव आपण । तंव निजहस्तींचे धनष्यबाण ।
तेंही झाला रघुनंदन । स्वये रावण विस्मित ॥७७॥
तळी पृथ्वीकडे पाहे । तंव ती राम झाली आहे ।
जीवनाचीं रससोये । राम स्वये होवोनि ठेला॥७८॥
तेजाचे जे निजतेज । ते रामचि स्वये सहज ।
वायुचें जे चळणवोज । चाळक सहज श्रीराम ॥७९॥
श्रीराम न दिसे जेथे । नभ शून्यपणें भासे तेथे ।
देखिलिया श्रीरामाते । चिद्गगन तेथे राम झाले ॥८०॥
पवनी दहनीं अवनी गगनी । रामावीण न दिसे नयनी ।
ठेला त्रैलोक्य व्यापूनी । दशाननीं अति विस्मयो ॥८१॥
सप्तपाताळांचें अंतर । ऊर्ध्व सप्तलोकांचे पदर ।
दिशांच्या पोकळी समग्र । स्वये रघुवीर कोंदला ॥८२॥
निजदेह पाहे रावण । हस्तपादादि अवयव पूर्ण ।
तोही झाला रघुनंदन । रावणपण खचों पाहे ॥८३॥
अस्थि चर्म मज्जा मांस । रामे भेदिले सप्तकोश ।
अंतरी करोनि प्रवेश । निजहृदयास शोधित ॥८४॥
मनाचे संकल्प सर्व । स्वये झाले पै राघव ।
विसरोनि निजस्वभाव । उन्मनभाव बाणला ॥८५॥
बुद्धि बोधेंसीं अवचितीं । राम झाली निश्चिती ।
विसरोनि निजस्फुर्ती । समाधिस्थिती बाणली ॥८६॥
चित्ते चिंतितां रघुनंदन । स्वये झाला चैतन्यघन ।
तेणे भयें अभिमान । निजचिन्हही विसरला ॥८७॥
अहंकार कांपिन्नला । तो श्रीरामा शरण आला ।
तद्रूपतेचा कौल घेतला । सोहं झाला श्रीराम ॥८८॥
अंतःकरणी व्यापक धर्म । धरुन होते प्रपंचधाम ।
तेणे देहे देखितां रघूत्तम । सर्वगत राम स्वये झाले ॥८९॥
कायसी सुवेळा निकुंभिळा । राम झाला बोरीबाभळा ।
दशकंठ भ्रमित झाला । पाहू लागला दशदिशा ॥९०॥
जिकडे पाहे तिकडे हरी । रावण पडला भ्रमचक्री ।
भ्रमतसे चक्राकारीं । राम निर्धारी लक्षेना ॥९१॥
येरीकडे रघुनंदन । तन्मयाचे कोदंड जाण ।
घेऊनि सायुज्यतेचा बाण । सीतीं पूर्ण सज्जिला ॥९२॥
श्रीरामांच्या दोन हातांची स्थिती :
पूर्ण कानाडी ओढोनि पाही । बाण सोडितां लवलाही ।
श्रीरामाच्या हस्तीं दोही । अपूर्व कांही वर्तले ॥९३॥
आकृष्टे युधि कार्मुके रघुपतेर्वामोऽब्रवीद्दक्षिणम् ।
पुण्ये कर्माणि भोजनेच भवतः प्रागल्भ्यमस्मिन्न किम् ॥
वामान्यः पुरब्रवीत्तमपि रे पृच्छाम्यहं स्वामिनम् ।
छिंद्यां रावणमस्तकानि युगपच्चेकैकमादिश्यताम् ॥१॥
श्रीरामाचे दोनी हस्त । परस्परें अनुवादत ।
तेणेंचि स्वामीचा पुरुषार्थ । हर्षे सांगत जगासी ॥९४॥
श्रीराम अति आवेशी । बाण लावोनि सीतासीं ।
ओढिता दक्षिणहस्तासीं । गेला कानापासीं कानाडी ॥९५॥
तंव वाम बोले दक्षिणाप्रती । युद्धी भिडतां रघुपती ।
मागे सरलासि युद्धख्याती । वीरवृत्ती हे नोव्हे ॥९६॥
पुण्यकाळ देखोनिया पुढे । धांवोनि येसी लवडसवडे ।
दान करिसी वाडेंकोडें । श्रेय निवाडे घ्यावया ॥९७॥
तैसाच सत्यकर्माच्या ठायी । पुढे धांवसी लवलाही ।
भोजनाच्याही समयी । कवळ पाही घ्यावया ॥९८॥
जैसा तेथे पुढे होसी । तैसा आजि रणभूमींसीं ।
पुढे होवोनि वेगेंसीं । पुरुषार्थासी दाखवीं ॥९९॥
जेणे बळे सत्कर्मासीं । पुढे होसी आवेशी ।
तेणे बळे रणभूमीसी । पुरुषार्थासी दाखवीं ॥१००॥
आजिवरी समग्र वित्त । स्वामींचें भोगिलें समस्त ।
युद्धसमयी मागे सरत । हे अनुचित सर्वथा ॥१॥
ऐकोनि वामाचें बोलणे । दक्षिण हांसिन्नला सत्राणे ।
निर्बळासी पुढे करणे । लाजिरवाणे आपणासी ॥२॥
धनुष्य देवोनि तुजप्रती । पुढे करितांचि काकुळती ।
येवोनि बोलिलासि छळणोक्ती । युद्धख्याती न करवे ॥३॥
पुढे जावोनि काय केले । रणी थोटावलें राहिले ।
संधान न करवे वाहिलें । वल्गैजलें वृथाचि ॥४॥
रणीम् पाठी नाही दिधली । जे तू बोलसी छळणबोलीं ।
वीरवृत्तीची तुवा भली । नाही देखिली युद्धरचना ॥५॥
मागे सरोनि कानासी । पुसतसें गुज स्वामीसीं ।
कैसे निवटूं रावणासी । हे मजपासीं सांगावे ॥६॥
दहाही शिरे एकवट । की निवटूं वेगळाले कंठ ।
स्वामी सांगावे हे स्पष्ट । रावण दुष्ट वधावया ॥७॥
तव नीचाचा ऐसाचि स्वभावो । की फाटकियांत शिरवावा पावो ।
तुवा पुढे जावोनि पहा हो । कोण आवो साधिला ॥८॥
ऐसे निजहस्ताचें लाघव । ऐकोनि सुखावे रघुराव ।
तंव येरीकडे पहा हो । रावणे अपूर्व मांडिलें ॥९॥
त्या दोघांचिया रणासी । कैचे सामर्थ्य उपमेसीं ।
त्याची उपमा साजे त्यासी । पैस वैखरीसीं असेना ॥११०॥
गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः ।
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥२॥
श्रीराम – रावणाचे युद्ध अनुपम :
सगळे सांठवे गगन । ऐसे दुसरे कैचें आन ।
तैसे रामरावणांचें रण । उपमा समान त्याची त्यासी ॥११॥
सागरासारिखा आन । दुजा सागर कैंचा भिन्न ।
म्हणोनि त्याचे उपमे समान । न दिसे चिन्ह आणिक ॥१२॥
तैसे रामरावणांचे रण । त्यासी उपमा रामरावण ।
म्हणोनि उपमेसी पूर्ण । उपमावक्तेपण मज नाही ॥१३॥
श्रीरामपूजनाबद्दल रावणाचा उल्लास :
कोदंडपाणि रघुनाथ । गगनभरी लखलखित ।
देखोनिया लंकानाथ । हर्षितचित्त पै झाला ॥१४॥
जन्मजन्मांतरीं बहुता । नाना साधनी कष्टतां ।
भेटी झाली श्रीरघुनाथा । म्हणोनि तत्वता पूजित ॥१५॥
उभा रणांगणामाझारी । नाही पूजेची सामग्री ।
म्हणोनि रामातें बाणधारी । रावण गजरीं पूजित ॥१६॥
करोनि बाणांच्या अक्षता । त्यांही श्रीरामाते पूजिता ।
उल्लास रावणाच्या चित्ता । अति सादरता पूजेची ॥१७॥
सर्व भूतांत सर्वत्र रावणाला श्रीरामांचा भास :
पूजावया राघवेशा । रावण पाहे जंव आकाशा ।
तंव राम कोंदला दशदिशा । निजमानसा उल्लास ॥१८॥
लक्षोनिया रघुनंदन । भलतेकडे टाकी बाण ।
नेणे स्वसैन्य परसैन्य । करी संधान अद्भुत ॥१९॥
पुढे लक्षोनि रघुनंदन । जंव आवेशी विंधी रावण ।
तंव पाठीसी धनुष्यबाण । घेवोनि जाण उभा असे ॥१२०॥
मागे विंधो जाय रावण । तंव वामांगी रघुनंदन ।
तिकडे करी जंव संधान । तंव दिसे दक्षिणांगीं ॥२१॥
अधऊर्ध्वदिशा समस्त । कोंदला देखोनि रघुनाथ ।
बाणी सर्वत्र पूजित । तेणे हांसत सुरसिद्ध ॥२२॥
राक्षस म्हणती रावण । भ्रमला अतिशये दारुण ।
आम्हांसीच विंधितो बाण । रणकंदन मांडिलें ॥२३॥
राम राहिला एकिकडे । रावणेंचि निजनिवाडे ।
आमुचे काढियेलें मेढे । कोणीकडे पळों आता ॥२४॥
स्वर्गी हांसती सुरगण । सिद्ध हांसती संपूर्ण ।
गणगंधर्वादि चारण । खदखदून हांसती ॥२५॥
वानर हांसती वाडेंकोडें । रावण रामे केले वेडें ।
आपुलें पारिखें न दिसे पुढे । जिकडे तिकडे शरटाकी ॥२६॥
न कळे कोणासी मात । रावणाचे अनुचरित ।
राम देखोनि सर्वगत । बाणी पूजित अति प्रीती ॥२७॥
देखोनिया सर्वगत । भजे जो का अनुरक्त ।
जन त्यासी म्हणती भ्रांत । अंतवृत्त कळेना ॥२८॥
विपरीत ठसा जनाचा । अतिशये गुंता प्रपंचाचा ।
त्यासी म्हणताती दैवाचा । ऐसा लोकांचा निजबोध ॥२९॥
जो उदास प्रपंचासीं । निर्दैवी करंटा म्हणती त्यासी ।
अंतर न कळे कोणासी । सांगता त्यांसी पै नये ॥१३०॥
गूळ गोड स्वभावतां । परी तो न माने सर्पग्रस्तां ।
अंतरी ज्वरें व्यापिले असता । दुग्ध सर्वथा म्हणे कडू ॥३१॥
ऐसीच लौकिकाची स्थिती । न कळे हरिभक्तांची वृत्ती ।
सर्वत्र पूजितां रघुपती । भ्रम मानिती सकळिक ॥३२॥
रावणाची सर्वगतता । जाणोनिया रघुनाथा ।
कृपा उपजली चित्ता । होय सोडिता बाणातें ॥३३॥
बाह्य क्रोधाचें विंदान । अंतरी कृपेचे आयतन ।
जेंवी मातेचा कोप दारुण । करीत ताडन दोषत्यागा ॥३४॥
देहदोषें अहंरावण । बहुसाल पीडिला देखोन ।
निजकृपा कळवळोन । स्वस्वरुप जाण देऊं पाहे ॥३५॥
ततः क्रुद्धो महाबाहू रघूणां कीर्तिवर्धनः ।
संधान धनुषा रामो बाणमाशीविषोपमम् ॥३॥
तेन तस्य शिरश्छिन्नं श्रीमज्ज्वलितकुंडलम् ।
तच्छिरःपतितः भूमौ दृष्टं लोकैस्त्रिभिस्तदा ॥४॥
तस्यैव सदृशं चान्यद्रावणस्योच्छ्रितं शिरः ।
तत्क्षिप्रं क्षिप्रहस्तेन रामेणाक्लिष्टकर्मणा ॥५॥
द्वितीयं रावणशिरश्छिन्नं संयति सायकैः ।
छिन्नमात्रं ततः शीघ्रं पुनरन्यत्प्रदृश्यते ॥६॥
तदेप्यशनिसंकाशैश्चिन्नं रामेण सायकैः ।
एवमेव शतं छिन्नं शिरसां तुल्यवर्चसाम् ॥७॥
न चैव रावणस्यांतो दृश्यते जीवितक्षये ॥८॥
त्यामुळे रावणाचे कंठावर प्रहार होऊन त्याची दहाही शिरे पडली :
सायुज्याचा निर्वाणबाण । निज कृपेचे संधान पूर्ण ।
करोनिया रघुनंदन । कंठनाळ जाण छेदिलें ॥३६॥
दिव्यतेजे अद्भुत । मुकुटकुंडलें समवेत ।
कंठ छेदिता रघुनाथ । आश्चर्य तेथ वर्तले ॥३७॥
परंतु पुनः तशीच अगणित शिरे वर आली व गेली :
दहाही शिरे भूमी पडता । आणीक तैसींच तत्वता ।
निगती झाली लंकानाथा । सुरा समस्ता विस्मयो ॥३८॥
तंव श्रीरामाचा अमोघ बाण । संपूर्ण कार्य साधिल्यावीण ।
मागे सरों नेणे आपण । तेणे मागुतें निवटिलीं ॥३९॥
दहाही शिरे लंकानाथीं । पुनःपुनः प्रसवती ।
बाण सवेंचि निवटिती । अत्यद्भुत लाघव ॥१४०॥
शिरे पुनः पुनः निघती । बाण तितुकींही निवटिती ।
वानर जयजयकार गर्जती । विमानी हांसती सुरसिद्ध ॥४१॥
अनंत शिरांचिया राशी । रावण प्रसवे आवेशी ।
तितुकीं निवटिता बाणासीं । निजमानसीं आनंद ॥४२॥
बाण छेदित क्षणक्षणा । तरी अति उल्लास रावणा ।
पूजावया रघुनंदना । शिरे जाणा प्रसवत ॥४३॥
रावणाचार भाव पूर्ण । सर्वगत श्रीरघुनंदन ।
देखोनिया आपण । करी निंबलोण निजशिरीं ॥४४॥
कंठी लागता श्रीरामबाण । अति आल्हादे रावण ।
पूजिता झाला रघुनंदन । सावधान अवधारा ॥४५॥
सर्वगत श्रीरामासी । देखोनि रावण उल्लासीं ।
निजशिरे अति प्रीतीसी । राघवासी ओंवाळी ॥४६॥
अति उल्लासीं लंकानाथ । दहाही शिरे ओंवाळित ।
तेणे धणी न माने चित्त । मग प्रसवत आणिक ॥४७॥
अल्प अर्पिता श्रीरामचरणीं । न पुरे रावणाची धणी ।
छेदोनि श्रीरामबाणीं । अर्पित चरणी अति प्रितीं ॥४८॥
अल्प अर्पिता श्रीरामचरणीं । अनंत विस्तार त्रिभुवनी ।
ऐसा निश्चय कळावया जनी । शिरे रामचरणी अर्पित ॥४९॥
निजशिरांची लक्षपूजा । रावणे केली रघुराजा ।
देह धरिला जया काजा । ते अति वोजा साधिले ॥१५०॥
अनंत शिरांचिया राशी । अर्पिता श्रीरामचरणांसी ।
अति उल्लास रावणासी । निजहरिखेंसी बोलत ॥५१॥
श्रीरामाचे निजसामर्थ्य । स्तविता झाला लंकानाथ ।
श्रोती अवधान द्यावे तेथ । अति विख्यात चरित्र ॥५२॥
श्रीरामरावणांचें श्रवण । श्रोता वक्ता अतिपावन ।
एका जनार्दना शरण । श्रीरामकथन अवधारा ॥५३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणशिरच्छेदनं नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥६२॥
ओंव्या ॥१५३॥ श्लोक ॥८॥ एवं ॥१६१॥
