वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

परियेसी गव्हारा सादर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074807 · अभंग क्र. २५०

250.
परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वंश झाले सगर ।
भिल्ले विंधिले शारंगधर । जाला पुरंदर सहस्त्रनयन ॥
कर्मे मन्मथ जालासे राख । कर्मे चंद्रासी घडला दोष ।
कर्मे भार वाहती कूर्मशेष । कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥
कर्मे वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरी कासोटा ।
कर्मे शुकदेव गर्भी कष्टा । पाताळवाटा बळी गेला ॥
कर्मे दशरथ वियोगे मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला ।
कर्मे रावण क्षयो पावला । वियोग घडला सीता देवी ॥
कर्मे दुर्योधनादि रणी नासले । कर्मे पांडव महापंथे गेले ।
कर्मे सिंधुजळ शोषिले । नहूष जाला सर्प देखा ॥
कर्माते शंभु मानी आपण । किती पळसिल कर्माभेण ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठल शरण । केली कर्मे निवारी नारायण ॥

अर्थ :
हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल. कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. कर्मामुळेच भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला. कर्मामुळे इंद्रला गुरुपत्नीगमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले. कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला, चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्माना पृथ्वीचा भार वाहवा लागला तसेच ब्रह्म्याला गाढवाचे मुख प्राप्त झाले. कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले, मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली, शुकदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले. कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला, रामाला वनवासात जावे लागले, रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सितेला रामाचा वियोग प्राप्त झाला. दुर्योधनप्रभुतीना रणात मरावे लागले, पांडवांना महापंथ चालावा लागला, अगस्तीला समुद्र प्यावा लागला व इंद्रपदावर पोहचलेल्या नहुशराजाला सर्प योनीत जावे लागले. त्या कर्माला महादेव भितात, अशा त्या कर्मापासुन तु कुठे पळुन जाऊ शकतोस? या वर उपाय म्हणजे, माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग