कासया करावे तपाचे डो
2364.
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी ॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढे लाभ ॥धृपद॥
कासया पुजावी अनेक दैवते । पोटभरे तेथे लाभ नाही ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साठी ॥३॥
तुका म्हणे करी कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥
अर्थ :
हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी तपाचे डोंगर व इतर कष्ट करण्याची काय गरज आहे? कशासाठी अनेक प्रकारचे तीर्थ, क्षेत्र असलेल्या देशांमध्ये फिरावे की, जे आपल्याला पुढे लाभ होण्याची आशा दाखवितात. का म्हणून इतर देवतांची पूजा करावी कारण त्यांची पूजा केल्याने केवळ पोट भरेल परंतु ब्रम्हज्ञाना सारखा लाभ होणार नाही. मोक्ष प्राप्तीसाठी कष्ट का करावेत कारण तो तर पंढरीत फुकट मिळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे इतर कोणताही पसारा घालण्यापेक्षा तु हरिकीर्तन कर याने तुला खरा लाभ प्राप्त होईल.
