पापिष्टाचे जिणे काय
599.
पापिष्टाचे जिणे काय ते जियाले| गळा स्तन जाले शेळियेचे ॥१॥
येथेचि जो खोटा तेथे तो करंटा| व्यर्थ आला पोटा माउलीच्या ॥२॥
तप्त ताम्र भूमि लोळविती नरा| लोटिती अघोरा नरकामाजी ॥३॥
लोहोचंचुकाग टोचिती येवोनी| मारिताती घणी माया घाव ॥४॥
बांधोनिया गळा टांगिती उफराटे| हाणताती सोटे वरिच्यावरी ॥५॥
आसीपत्रावरी वोढिती धरोनी| लोटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥
जळतिया खांबा भेटविती बळे| खैराच्या इंगळे नाहाविता ॥७॥
प्रळय क्रूर सर्प झोंबविती कंठासी| ओढोनि जिव्हेसी खंडे करिती ॥८॥
नामा म्हणे ऐसी पापिष्टाची गती| जन्म लक्ष शती हेंचि फळ ॥९॥
