संसारा आलिया एक सुख
3065.
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥
येणे होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश काही ॥धृपद॥
घेतील तयासी सोपे आहे सुख । बोलियेले मुखे नारायण ॥२॥
सांगितली सोय करुणासागरे । तुम्हा काहो बरे न वाटते ॥३॥
तुका म्हणे तेणे उपकार केला । भोळया भाविकाला तरावया ॥४॥
अर्थ :
संसारामध्ये आल्यानंतर एक सुख मात्र आहे ते म्हणजे विठोबाचे पायाचे चिंतन सतत करत राहाणे. असे जर केले तर संसार सुखाचा होईल आणि दु:खाचा कोणत्याही प्रकारचा लेश राहाणार नाही. जे भक्त आपल्या मुखाने नारायणाचे नाम घेतील त्यांना सुख अतिशय सोप्या रितीने प्राप्त होईल हे वचन भगवंतानेच भगवद्गीतेत सांगितलेले आहे. अहो करुणासागर नारायणाने एवढा सोपा मार्ग तुम्हाला सांगितला आहे मग तुम्हाला तो का बरे बरा वाटत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, भोळया भाविकांना तारण्याकरता नारायणाने फार सोपा उपाय सांगितला आहे व भक्तांवर फार मोठा उपकार त्याने केला आहे.
