देवा तू आमचा कृपाळ ।
4036.
देवा तू आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सल । माय तू माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणे लागे वाकडे जाता । पुढती निरविसी संता । नव्हे विसंबता धीर तुज ॥२॥
आम्हा भय चिंता नाही धाक । जन्म मरण काही एक । जाला इहलोकी परलोक । आले सकळैकवैकुंठ ॥३॥
न कळे दिवस की राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू मी किती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाची भूषणे । तो ये मज लेवविली लेणे । तुका म्हणे तुझिया गुणे । काय ते उणे एक आम्हा ॥५॥
अर्थ :
देवा तू आमच्या विषयी कृपाळू आहेस भक्तांचे प्रतिपालन करणारा आहेस आणि दीनवत्सल आहे. तू आमची माय आणि प्रेमळ माऊली आहेस तूच आमचे सर्व योगक्षेमाचे भार चालवितेस. तुला आमची सर्व चिंता लागलेली असते आणि आम्ही वाकड्या मार्गाने चालू लागलो की, आमचे रक्षणही तुलाच करावे लागते. देवा तू पुढे आम्हाला संतांच्या स्वाधीन करतोस आणि आम्हाला विसरण्याचे धैर्य देखील तुला होत नाही. देवा आम्हाला कोणत्याही प्रकारचे भय, धाक चिंता तर नाहीच आणि जन्ममरणाविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंताच नाही. आम्ही इहलोकात राहून देखील आम्हाला इहलोक परलोकासारखा झाला आहे सगळे वैकुंठच आमच्यासाठी जमिनीवर आले आहे. माझी अखंड आत्मज्योत प्रकट झाली आहे त्यामुळे मला दिवस आहे की रात्र आहे हे काहीही कळत नाही आनंदलहरींची गती आणि त्या सुखाचे वर्णन मी किती म्हणून करु ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू तुझ्या नामाचेच अलंकार माझ्या अंगावर घातलेली आहेत. तुझ्या गुणामुळे तुझ्या कार्यामुळे आम्हाला काय एक कमी आहे ?
