॥ श्रीएकनाथमहाराजकृत
24.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय चोविसावा ॥
नारद रावण संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मंदोदरीच्या भवनात धर्मऋषींचे आगमन :
श्रीरामपदांबुजी नित्य न्हातां । श्रीरामकीर्ती अखंड गाता ।
श्रीरामरुपीं मन वसतां । श्रीरामता उन्मनेंसीं ॥१॥
मंदोदरीचिया भवानासी । स्वभावे आला धर्मऋषी ।
तिणे पुजोनियां त्यासी । अत्यादरेंसी पूसिलें ॥२॥
नारदमुनींच्या वचनासी । परम विश्वास रावणासी ।
हे पूर्व कथा जाली कैसी । विदित तुम्हांसी तरी सांगा ॥३॥
मंदोदरीच्या प्रश्नाला धर्मऋषींचे उत्तर :
ऋषि म्हणे मी स्वधर्मता । जाणे भूतभविष्यार्था ।
तुझ्या पश्नाची निजकथा । सावधानता अवधारी ॥४॥
पूर्वी भेटी सनत्कुमारांसी । त्यांच्या वचनार्था श्रद्धेसीं ।
तेंचि पुसतां नारदापासीं । आला विश्वासी परमार्थी ॥५॥
परी विरोधे घ्यावी मुक्ती । हेचि आवडी रावणाचे चित्ती ।
विरोध करावयाची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥६॥
पुरा कृतयुगे नाम प्रजापतिसुत प्रभुम् ।
सनत्कुमारमासीनं रावणो राक्षसाधिपः॥१॥
सद्दशं सूर्यसंकाशं ज्वलंतमिव तेजता ।
विनयावनतो भूत्वा ह्यभिवाद्य कृतांजलिः॥२॥
उक्तवान्रावणो राजा तमृर्षि सत्यवादिनम् ।
को ह्यस्मिन्प्रवरे लोके देवानां बलवत्तरः॥३॥
यं समाश्रित्य विबुधा जयंति समरे रिपून ।
कं जयंति द्विजा नित्यं कं ध्यायंति च योगिनः ॥४॥
एतन्मे शंस भगवन्विस्तरेण तपोधन ॥५॥
सनत्कुमार व रावणाची भेट रावणाचा प्रश्न :
रावण बैसोनि विमानी । स्वभावे जाता गगनी ।
सनत्कुमार देखिले नयनी । देदीप्यमान तजस्वी ॥७॥
जयांचिया अंगप्रभा । रविसोमांची हरिली आभा ।
रात्रिदिवसांची लोपली शोभा । सच्चिद्गाभा तेजस्वी ॥८॥
ऐसे ते तेजस्वी सदोदित । ब्रह्मयाचे मानससुत ।
रावणे देखिले अकस्मात । जाला विस्मित मानसी ॥९॥
कृतयुगाचे परम प्रांतीं । सनत्कुमार तेजोमूर्ती ।
ते भेटले लंकापती । ऐक उपपत्ती तयांची ॥१०॥
श्रद्धायुक्त स्वये रावण । घालोनिया लोटांगण ।
मस्तकी वंदोनियां चरण । विनीत प्रश्न पूसत ॥११॥
ब्रह्मयाचा नातू आपण । माझे नांव पै रावण ।
कृपा करोनि संपूर्ण । पुसतों प्रश्न सांगावा ॥१२॥
द्विज कोणाचे करिती यजन । योगी कोणाचे धरिती ध्यान ।
भक्त कोणाचे करिती भजन । तुम्हांसी चिंतन कोणाचे ॥१३॥
कोणाचे बळे देवगण । रणी करिती रिपुदळन ।
ऐसा बलवत्तर कोण । कृपा करुन सांगावे ॥१४॥
तुमचे गांठी तपोधन । भगवद्भाव सनातन ।
त्याचे श्रेष्ठ महिमान । चरणा शरण सुरश्रेष्ठ ॥१५॥
शिव विष्णु शक्र ब्रह्मा । त्रिपदा गायत्री उमा रमा ।
चरणा शरण येती तुम्हा । तपाचा महिमा अगाध ॥१६॥
तपोधना भीती सुरासुर । तपोधना भीती यक्ष किन्नर ।
तपोधना देखोनि समोर । स्वये हरिहर वंदिती ॥१७॥
विदित्वा हृद्गतं तस्य ध्यानदृष्टिर्महायशाः ।
उवाच रावणं प्रेक्ष्य श्रुयतामिति पुत्रक ॥६॥
यो वै भर्ता जकत्कृत्स्नं यस्योत्पत्तिं न विद्महे ।
सुरासुरैर्नतो नित्यं हरिर्नारायणः प्रभुः ॥७॥
येन सर्वमिदं सृष्टं विश्वं स्थावरजंगमम् ।
समाश्रित्यं विबुधा विधिना हरिमध्वरे ॥८॥
पिबंति ह्यमृतं चैव मानवाश्च यजन्ति तम् ।
ध्यायंति योगिनी नित्यं क्रतुमिश्च यजन्ति तम् ॥९॥
दैत्यदानवरक्षांसि ये चान्ये वामरद्विषः ।
सर्वाञ्जयति संग्रामे सदा सर्वैः सुपूज्यते॥१०॥
श्री विष्णुंच्या भक्तांना अपयश येत नाही असे धर्मऋषींचे उत्तर :
रावणाचे मनोगत । ध्यानदृष्टीं समस्त ।
जाणोनिया ते संत । मग सांगत प्रश्नातें ॥१८॥
आदि मध्य निधन । जो सदोदित सनातन ।
तो स्वामी श्रीनारायण । ज्यासी त्रिभुवन सदा वश्य ॥१९॥
ज्यासी वंदिती सुरासुरगण । ज्याचे योगी करिती ध्यान ।
यज्ञी यजिती ज्या ब्राह्मण । तो स्वामी नारायण सर्वांचा ॥२०॥
जो विश्व स्रजी संपूर्ण । जो अंगें विश्व आपण ।
ज्याचेनि बळे सुरगण । अमृतपान करिताती ॥२१॥
ज्याचिया गा निजस्थितीं । तिळभरी वाट नाही रिती ।
जो कोंदलासे त्रिजगती । जो सर्वा भूतीं सबाह्य ॥२२॥
ऐसा जो का जगत्स्वामीं । जो का वद्य आगमनिगमीं ।
ज्याचेनि बळे सुरोत्तमीं । रिपु संग्रामी निर्दळिले ॥२३॥
ज्याचेनि आश्रयें नर । यक्ष राक्षस किन्नर ।
रणी जिंकिती सुरासुर । तो स्वामी साचार स्वये विष्णु ॥२४॥
नामी रत जे पुरुष । ते स्वप्नी न देखती अपेश ।
त्रिभुवनी न माये यश । हृषीकेश निजस्वामी ॥२५॥
इंद्रियां प्रेरिता वारिता । ऐसी ज्याची निजसत्ता ।
हृषीकेश तो तत्वता । साह्य निजभक्ता सर्वार्थी ॥२६॥
जनी जनार्दन निजीं निज । जनी जनार्दन सहजीं सहज ।
जनी जनार्दन भजनीं भज्य । सर्वांर्थीं पूज्य जनार्दन ॥२७॥
ऐकोनि ऋषीचे वचन । विनीत अति प्रीती प्रश्न ।
स्वये पुसत रावण । वंदून चरण ऋषीचे ॥२८॥
श्रुत्वा महेर्षेस्तद्वाक्यं रावणो राक्षसाधिपः ।
उवाच प्रणतो भूत्वा पुनरेव महामुनिम् ॥११॥
दैत्यदानवरक्षांसि ये हताः समरे सुराः ।
का गतिं प्रतिपद्यंते किंवा ते हरिणा हताः ॥१२॥
रावणस्य वचः श्रुत्वा प्रत्युवाच महामुनिः ।
दैवतैर्निहता नित्यं प्राप्नुवंति नभस्तलम् ॥१३॥
पुनस्तस्मात्परिभ्रष्टा जायंते वसुधातले ।
पूर्वार्जितैश्च सुकृतैर्जायंते च म्रियंति च ॥१४॥
ये ये हताश्चक्रधरेण राजन्त्रैलोक्यनाथेन जनार्दनेन ।
ते ते गतास्तन्नियं नरेंद्र क्रोधापि देवस्थ वरेण तुल्यः ॥१५॥
सायुज्यमुक्ती मिळेल असा देव कोणता ? असा रावणाचा प्रश्न :
परम श्रद्धा अति प्रीती । रावण पुसे मुनीप्रती ।
सुरसुरांते मारिती । त्यांसी कोण गती मज सांगा ॥२९॥
जे का श्रीविष्णूच्या हाती । निधडे वीर रणी पडती ।
त्यांसी होय कोण गती । तेंही मजप्रती सांगावे ॥३०॥
रावणाच्या पश्नाला सनत्कुमारांचे उत्तर :
ऐकोनि रावणाचा प्रश्न । सनत्कुमार स्वये आपण ।
सांगे ते गतींचे लक्षण । सावधान अवधारा ॥३१॥
सुरवरहस्तें जे मरती । त्यांसी स्वर्गपंथ उर्ध्वगती ।
क्षीणपुण्यें तेथोनि रिचवती । माघारे येती गर्भवासा ॥३२॥
गर्भवासाचे सांकडें । अतिशयेंसीं दुःख गाढे ।
रावणा ते मी सांगेन तुजपुढे । निजनिवाडे अवधारी ॥३३॥
केवळ रजस्वलेचें रुधिर । माजी पित्याचे रेत मात्र ।
ते हे विटाळाचें शरीर । अपवित्र निंद्यत्वें ॥३४॥
मातेचिया उदरकुहरी । विष्ठामूत्रांचे दाथरावरी ।
जठराग्नीमाझारीं । नवमासवरी उकाडा ॥३५॥
गर्भवासाचें दुःख गाढे । विष्ठालेप चहूंकडे ।
नाकीं तोंडीं रिघती किडे । कोणापुढें सांगेल ॥३६॥
देखोनि गर्भींची आटक । जीव अनुतापे करी शंख ।
विषयसुखगर्भींचें दुःख । आक्रंदे हाक स्वये मारी ॥३७॥
विषयांपासीं जन्ममरण । विषयें गर्भदुःख दारुण ।
विषयसुख ते नागवण । विषय ते जाण महामैंद ॥३८॥
विषय देहदरीचा वाघ । विषय विश्वासी मारक मांग ।
विषय तोचि सर्वांगदाघ । विषय सांग महावैरी ॥३९॥
गर्भवासापुढें देख । अंधतामिस्र महानरक ।
ते तंव बापुडे मशक । परमदुःख गर्भवासीं ॥४०॥
जे देवांचेनि हाते मरती । ते ते मरती ।
ते ते पडती दुःखावर्ती । स्वर्गसंसारआवर्ती । जन्म भोगिती अविश्रम ॥४१॥
विष्णूचे हातें जे जे मरती । तया सद्यः ब्रह्मप्राप्ती ।
सायुज्यादि चारी मुक्ती । शरण येती तयांतें ॥४२॥
चक्रधर जो जनार्दन । त्याचेनि हातें सभाग्य मरण ।
अभाग्या नाठवे नामस्मरण । मग दर्शन ते कैंचें ॥४३॥
क्रोध आणि सुप्रसन्न । विष्णूच्या ठायी दोनी समान ।
भक्ता आणि वैरिया जाण । समान दान ब्रह्मसायुज्य ॥४४॥
ऐकोनि ऐसे रावण । अतिशये विस्मयापन्न ।
अति श्रद्धें उल्लासोन । पुढती प्रश्न पुसत ॥४५॥
श्रुत्वा ततस्तद्वचनं निशाचरः ।
सनत्कुमारस्य मुखाद्विनिर्गतम् ।
तथा प्रहष्टः स बभूव विस्मितः ।
कथं नु यास्यामि हरिं महाहवे ॥१६॥
एवं चिंतयतस्तस्य रावणस्य दुरात्मनः ।
पुनरेवापरं वाक्यं व्याजहार महामुनिः ॥१७॥
मनश्चोत्कंठितं यत्ते भविष्यति तदाहवे ।
सुखी भव महाबाहो कंचित्कालमुदिक्षय ॥१८॥
श्री विष्णूंच्या हातून मुक्ती मिळते हे ऐकून रावणास संतोष :
विष्णूचेनि हाते मरण । ते ब्रह्मसायुज्य कृतकल्याण ।
मुनिमुखें ऐकोनि रावण । सुखसंपन्न स्वये जाला ॥४६॥
ऐसा सभाग्य काळ कोण । मज विष्णूसीं घडे रण ।
विष्णुहस्तें जाय माझा प्राण । स्वये रावण हेंचि वांच्छी ॥४७॥
श्री विष्णुसीं करिता रण । केव्हा जाईल माझा प्राण ।
हेंचि वांच्छी स्वये रावण । आवडी गहन युद्धाची ॥४८॥
श्रीविष्णूसी महारण । स्वये पावेल रावण ।
ऐसे बोलिले मुनिगण । तेथे विलंबन काळाचे ॥४९॥
यथाकाळे पावे रण । तंव प्रतीक्षा करावी आपण ।
पुढे युद्ध अति दारुण । अलोट जाण होईल ॥५०॥
जैसे तुझे मनोगत । तैसे युद्ध करील रघुनाथ ।
हे ऐकोनि लंकानाथ । उल्लसित स्वये जाला ॥५१॥
करोनिया प्रदक्षिणा । लागोनि मुनीच्या चरणा ।
रावण निघे ब्रह्मसदना । मुनी अनुष्ठाना स्वये गेले ॥५२॥
श्री विष्णुसीं महारण । कैं मी देखेन आपण ।
ऐसे अहोरात्र जाण । करी ध्यान युद्धार्थीं ॥५३॥
ब्रह्मलोकान्निवर्तंतं समासाद्य ममुनिम् ।
उवाच हृष्टमनसा नारदं रावणस्तदा ॥१९॥
आब्रह्यभुवनाल्लोकास्त्वया दृष्टा ह्यनेकशः ।
कस्मिंल्लोके महाभाग मानवा बलवत्तराः ॥२०॥
तान्ममाख्याहि धर्मज्ञ पितामे त्वंहि धर्मतः ।
चिंतायित्वा मुहूर्त तु नारदः प्रत्युवाच तम् ॥२१॥
श्रूयतां सर्वमाख्यास्ये तव राक्षसपुंगव॥२२॥
नारद ब्रह्मभवनाकडून येत असता रावणाची भेट :
ब्रह्मभवनाहूनि रावण । परतोनि येता आपण ।
झाले नारदाचे दर्शन । तेणे दशानन आल्हादी ॥५४॥
रावण म्हणे मी सफळितार्थ । नारदमुनि भेटला येथ ।
याचेनि माझे मनोरथ । कृतकृत्यार्थ मुनिवाक्ये ॥५५॥
ऐसे बोलोनि आपण । रावण घाली लोटांगण ।
वंदोनि नारदाचे चरण । आदरे प्रश्न पूसत ॥५६॥
ब्रह्मभुवनलोकात युद्ध करण्यास समर्थ कोण ? असा नारदाला रावणाचा प्रश्न :
आब्रह्मभुवन लोक । स्वामींनीं देखिले अशेख ।
मजसी युद्ध करावया देख । बळी पुरुष आहे कोणी ॥५७॥
माझिया भुजांचे त्राण । पुरे ऐसे करावया रण ।
सृष्टीमाजी बळिया कोण । त्याचे लक्षण मज सांगा ॥५८॥
त्याची कैसी कैसी स्थिती । त्याची कैसी कैसी गती ।
त्याची अवयव आकृती । यथानिगुती मज सांगा ॥५९॥
ऐसा रावणे पुसतां प्रश्न । नारद अंतर्यामी आपण ।
जाणोनि हृदयस्थ संपूर्ण । त्याचेंचि लक्षण अनुवादे ॥६०॥
रावणा आवडी तुझी पूर्ण । मुख्य देवासीं करावे रण ।
त्याचे द्विविध लक्षण । सगुणनिर्गुण-विभागें ॥६१॥
सगुण निर्गुण विभागोन । ते मी सांगेन विवंचून ।
रावणा ऐक सावधान । कृतकल्याण पावावया ॥६२॥
स हि सर्वगतो देवः सूक्ष्मोऽव्यक्तः सनातनः ।
तेन सर्वमिदं व्याप्तं त्रैलोक्यं सचराचरम् ॥२३॥
अहश्च रात्रिश्च उभे च संध्ये दिवाकरश्चैव यमश्च सोमः।
स एव कालो ह्यानिलोऽनलश्च स एव सर्व ॥२४॥
ॐकारश्चैव सत्यं च सावित्री पृथिवी च सः।
धराधरधरो देवो ह्यनंत इति विश्रुतः॥२५॥
नारदाचे उत्तर :
जेथोनि नाना अवतार । सबळ बळे उठती साचर ।
ते मुख्य स्वरुप निराकार । निर्विकार ते ऐका ॥६३॥
भूतां सबाह्य भगवंत । कोंदला आहे सदोदित ।
अति सूक्ष्मत्वे नव्हे व्यक्त । जेंवी गुळांत निजगोडी ॥६४॥
गुळा सबाह्य निखळ गोडी । तेथे गूळ हे वार्ता कुडीं ।
तेंवी मिथ्या भूतपरवडी । चित्सत्ता रोकडी सबाह्य नांदे ॥६५॥
जेंवी सूक्ष्म लक्षितां तंत । वस्त्रमात्र मिथ्या मात ।
तेंवी लक्षितां भगवंत । प्रपंच व्यर्थ मिथ्यात्वे ॥६६॥
दोराअंगीं सर्पत्व नसे । नसताचि सर्प भ्रातांसी भासे ।
तेंवी भगवंती प्रपंच नसे । मिथ्या आभासे मूर्खासी ॥६७॥
स्वरुप लक्षितां साचार । मिथ्या ब्रह्मा विष्णु शिव शक्र ।
तेथे कैंचे गा चराचर । वस्तु चिन्मात्र सदोदित ॥६८॥
नाही आकारविकारविलास । नाही आयुष्य मग कैंचा नाश ।
यालागी अव्यय अविनाश । म्हणती परेश परमात्मा ॥६९॥
तेथे नाही अहोरात्र । नाही नक्षत्रे रवि चंद्र ।
नाही वरुणादि यम कुबेर । काळ दुर्धर तेथे मिथ्या ॥७०॥
ऐसी वस्तु जे अविनाशी । तेचि कोंदलीसे जगासी ।
तिचेनि गति इन्द्रियांसी । तिचेनि प्राणांसी प्राणत्व ॥७१॥
तिचेनि प्रकाशें अहोरात्र । तिचेनि तपती रवि चंद्र ।
तिचेनि पंचभूतें साचार । चराचर तिणें अति व्याप्त ॥७२॥
तिचेनि ओंकार आपण । तिचेनि सत्या सत्यपण ।
तिचेनि गायत्री पावन । वंद्य ब्राह्मण तेणे तेजे ॥७३॥
ब्रह्मा विष्णु शंकर । हेही वस्तुचे गुणावतार ।
वस्तु निर्गुण निर्विकार । चराचर व्यापूनि ॥७४॥
उभे आडवें विणून सूत । त्या नांव पै वस्त्र म्हणत ।
तेंवी व्यापक भगवंत । त्यासीच म्हणत प्रपंच ॥७५॥
तोचि धरा तोचि धराधर । तोचि विश्व तोचि विश्वाधार ।
तोचि भूत भूतात्मा साचार । त्यासी संसार मानिती मूर्ख ॥७६॥
नारदाच्या उत्तराने रावणाला उद्विग्नता :
ऐकोनि नारदांचें वचन । रावण झाला अति उद्विग्न ।
पुढती करोनिया नमन । काय आपण पूरत ॥७७॥
रुप सांगितले निर्गुण । त्यासी करिता नये रण ।
माझ्या भुजांचे पुरे त्राण । तैसा संपूर्ण बळी सांग ॥७८॥
नारद म्हणे दशानन । तुजसी करावया रण ।
देव दानव मानव जाण । नाही आंगवण ये समयी ॥७९॥
मज पाहता लोक तीन्हीं । युद्ध करावया तुझे ठायी ।
बळिया न दिसे ये समयी । सत्य पाही लंकेशा ॥८०॥
रावण अनुवादे आपण । दिग्विजयो करिता जाण ।
नाही योद्धा मजसमान । हेंही संपूर्ण मी जाणे ॥८१॥
मजसी करावया रण । थोरल्या देवासी आंगवण ।
इतर योद्धे मजपढें तृण । त्यांचे लक्षण मज सांग ॥८२॥
थोरल्या देवासी आंगवण । तो का न ये करावया रण ।
तोही लपतो मज भेण । त्याचे भेडपण दिसताहे ॥८३॥
नारदाचा रावणाला प्रश्न :
ऐसे बोलता दशानन । नारद विस्मये हास्यवदन ।
मुख्य देवासीं करावया रण । काय कारण ते सांग ॥८४॥
देवांशी करीतां रण । निमाल्या न सोडी जन्ममरण ।
मुख्य देवे वधिल्या जाण । ब्रह्मत्व परिपूर्ण अवाप्त ॥८५॥
हेही मजलागी निजखूण । सनकादिकीं सांगितली जाण ।
यालागी मुख्य देवासीं रण । करावया मन उद्यत ॥८६॥
ऐकोनि रावणाची उक्ती । नारद संतोषला चित्ती ।
जेणे पावे ब्रह्मप्राप्ती । ते श्रीराम मूर्ती स्वये सांगे ॥८७॥
नीलोत्पलदलश्यामः किंजल्कारुणवाससः ।
प्रावृट्काले यथा व्योम्नि सतडित्तोय-दस्तथा ॥२६॥
श्रीमान्मेघवपुश्यामः शुभपंकजलोचनः ।
श्रीवत्सेनोरसा युक्तः शशांककृतलक्षणः ॥२७॥
योग्यकाली योद्धा येईलच असे नारद रावणाला सांगतात :
नीलोत्पलदलश्याम । राजीवलोचन श्रीराम ।
ज्याचिया श्यामता लोपलें व्योम । घनश्याम श्रीराममूर्ति ॥८८॥
श्रीरामश्यामता संपूर्ण । मेघश्यामता त्यापुढे तृण ।
ज्याची श्यामता देखिल्या जाण । सुखसंपन्न सबाह्य ॥८९॥
नेत्रोपम कमळदळें । ती तंव नश्वर तत्काळे ।
श्रीरामाचे देखणे डोळे । सर्वकाळ सद्रूप ॥९०॥
विजू घालोनिया पुटीं । सबाह्य शोधिली गोमटी ।
तैसा पीतांबर माळगाठी । शोभे परवंटी श्रीरामा ॥९१॥
श्रीरामकांसे लागोनि जाण । विज विसरली अस्तमान ।
दिव्य तेजे विराजमान । सर्वदा जाण लखलखीत ॥९२॥
मुकुट कुंडले मेखळा । कांसे कसिला सोनसळा ।
कंठी मनोहर माळा । तुळसीदळासमयुक्त ॥९३॥
बाहुअंगदे रत्नभूषणें । करमुद्रिका करकंकणे ।
श्रीराम लेणियांचे लेणें । कैसा कवणें वानावा ॥९४॥
लक्ष्मी डावलोनि संपूर्ण । दक्षिणांगीं विप्रचरण ।
शोभे श्रीवत्सलांछन । शशांकचिन्ह जेंवी नभीं ॥९५॥
श्रीरामपदसामुद्रिका । चतुर्मुखा पंचमुखा ।
न वर्णवे षण्मुखा । सहस्रमुखा निजमौन ॥९६॥
वांकीअंदुवांचा गरज । चरणी गर्जती तोडर ।
बळियां बळी श्रीरामचंद्र । सुरासुर कांपती ॥९७॥
मांडून माहेश्वरी ठाण । सज्जूनियां धनुष्यबाण ।
श्रीरामासी करावया रण । संमुख कोण राहिला ॥९८॥
श्रीरामासी करावया रण । बापुडे कायसे रावण ।
ऐके बाणे घेईल प्राण । सत्य जाण लंकेशा ॥९९॥
ऐकोनिया नारदाची मात । रावण आल्हादे नाचत ।
श्रीरामासी युद्धकंदनार्थ । कोण्या काळी होईल ॥१००॥
युद्धी तगटे श्रीरामचंद्र । ते युद्ध व्हावे अति शीघ्र ।
ऐसे पुसतां निशाचर । मुनिश्वर सांगत ॥१॥
भूत भविष्य वर्तमान । नारदासी नित्यज्ञान ।
श्रीरामाचे समूळ कथन । स्वये आपण सांगत ॥२॥
श्रीरामाचे निजलक्षण । नारद सांगे संतोषोन ।
सावध ऐके दशानन । युद्धकारण लक्षूनी ॥३॥
कृते युगे व्यतीते तु मुखे त्रेतायुअगस्य च ।
हितार्थं देवमर्त्यानां भविता नृपविग्रहः ॥२८॥
इक्ष्वाकूणां कुले राजा भाव्यो दशरथो भुव ।
तस्य सूनुर्महातेजा रामो नाम भविष्यति ॥२९॥
महातेजा महाबुद्धिर्महाबलपराक्रमः ।
महाबाहुर्महासत्वः क्षमया पृथिवीसमः ॥३०॥
आदित्य इव दुष्प्रेक्ष्यः समरे शत्रुभिः सदा ।
भविता हि तदा रामो नरो नरायाणः प्रभुः ॥३१॥
श्रीरामांचे निजलक्षण नारदाकडून रावण ऐकतो :
कृतयुगाचा होता प्रांत । त्रेतायुगाचे प्रारंभांत ।
होईल राजा दशरथ । त्याचा सूत श्रीराम ॥४॥
देव स्थापावया निजपदीं । भक्ता द्यावया मोक्षसिद्धी ।
मनुष्य लावावया सुबुद्धी । श्रीराम त्रिशुद्धी अवतार ॥५॥
सूर्यवंशी वंशभूषण । ककुत्स्थकुळीं उत्पन्न ।
अवतार श्रीरघुनंदन । चैतन्यघनविग्रही ॥६॥
जे आदिकारणा कारण । ज्यासी श्रुती म्हणती नारायण ।
तेंचि श्रीरामस्वरुप जाण । स्वामी संपूर्ण सर्वांचा ॥७॥
ज्याचेनि तेजःप्रतापें । चंद्रसूर्यांची प्रभा लोपे ।
आकाश शून्यत्वे हरपे । श्रीरामदीपें निजतेजें ॥८॥
धन्य श्रीरामाची निजबुद्धी । वैरिया दे सायुज्यसिद्धी ।
वोखटे करु नेणे त्रिशुद्धी । बुद्धीची सुबुद्धी श्रीराम ॥९॥
श्रीराम बळाचिये सिद्धी । समूळ छेदी देहबुद्धी ।
मीतूंपणाचिये विधी । स्वये त्रिशुद्धी निर्दळी ॥११०॥
आजानुबाहु श्रीरघुनाथ । द्वैतदळणीं निजपुरुषार्थ ।
भवभीता अभयहस्त । रक्षी निजभक्त वरदहस्तें ॥११॥
अगाध श्रीरामाचे सत्व । जग जन्ममरण विकाररहित ।
सकळ विश्व प्रतिपाळीत । न करिता घात निर्दळी ॥१२॥
श्रीरामशांतीची नवलपरी । अपकार साहोनि अंगावरी ।
अपकारिया होय उपकारी । अगाध थोरी शांतीची ॥१३॥
ऐसिया श्रीरामशांतस्थितीं । साहोनि भूतांची उद्धती ।
पृथिवीस आली परम शांती । सहजस्थिती निजशांती ॥१४॥
मध्यान्हकाळींच्या सूर्यापुढें । पाहता दृष्टी अंधार पडे ।
तेंवी संग्रामी श्रीरामापुढें । कोण बापुडे राहील ॥१५॥
देखता श्रीरामाचे बाण । धाकेचि विरांचे जाती प्राण ।
त्यासी संमुख करावया रण । राहे कोण संग्रामी ॥१६॥
श्रीरामस्वरुपदर्शन । सहसा पावो शके कोण ।
तेही विषयींचे निरुपण । सावधान अवधारी ॥१७॥
न शक्यते सुरैर्द्रष्टुं नासुरैर्न च पन्नगैः ।
यस्य प्रसादं कुरुते स वै तं द्रष्टमर्हति॥३२॥
न हि यज्ञफलैस्तात न तपोभिश्च संचितैः ।
शक्यते भगवान्द्रष्टुं न दानेन न चेज्यया॥३३॥
श्रीरामांच्या दर्शनप्राप्तीचे मार्ग नारद रावणाला सांगतात :
ज्यासी श्रीराम सुप्रसन्न । त्यासीच भेटे रघुनंदन ।
इतरांचें ज्ञान ध्यान । तृणासमान श्रेष्ठत्व ॥१८॥
हृदयी वैराग्य संपूर्ण । त्यांना राम सुप्रसन्न ।
वैराग्यवीण ज्ञान ध्यान । तृणासमान श्रेष्ठत्व ॥१९॥
देखावया श्रीराममूर्तीं । सुरवरांची न चले शक्ती ।
असुरपन्नगादि सिद्धपंक्ती । त्यांसीही रघुपति दुष्प्रेक्ष्य ॥२०॥
तपस्वई तपोयुक्तीं । संचिती देहे तपःसंषत्ती ।
तपाची स्वर्गावरी गती । त्यांसी रघुपती भेटेना ॥२१॥
करुनियां पशुहनन । यज्ञीं करिती यजन ।
तेथे हिंसेचें आयतन । रघुनंदन न भेटे ॥२२॥
देता नानाविध दान । दातेपणाचा अभिमान ।
दानफळही वांच्छित मन । तेथे रघुनंदन न भेटे ॥२३॥
यज्ञ दानतपःसंपत्ती । याची योगा सामर्थ्यशक्ती ।
श्रीरामाची नव्हे प्राप्ती । जाण निश्चिती लंकेशा ॥२४॥
पावावया श्रीरामप्राप्ती । दृढ वैर का अनन्य भक्ती ।
येणे पाविजे रघुपती । जाण निश्चिती लंकेशा ॥२५॥
अनन्य भक्तीचें लक्षण । पाहिले सांगेन परिपूर्ण ।
पाठी वैराचे कारण । केल्या निर्वाण ते साधे ॥२६॥
तद्भक्तैस्तद्वतप्राणैस्तच्चितैस्तत्पराणैः ।
शक्यते भगवान्द्रष्टुं ज्ञाननिर्दग्धकिल्बिषैः ॥३४॥
अथवा पृच्छ राजेंद्र यदि तं द्रष्टुमिच्छसि ।
कथयिष्यामि ते सर्वं श्रुयतां यदि रोचते ॥३५॥
स्त्रीहरण केल्याने वैर उत्पन्न होते :
सांडोनिया प्रपंचसाधन । देह केला रामार्पण ।
श्वासोच्छवासी श्रीरामसेवन । तद्गतप्राण या नांव ॥२७॥
सोहंहंसाच्या अनुवृत्ती । ज्याच्या प्राणवृत्ती विचरती ।
तद्गतप्राण त्याते म्हणती । हे योगस्थिति अति गुह्य ॥२८॥
सांडोनि प्रपंचचिंता । नित्य चिंतितां निजात्मता ।
चित्त रातलें भगवंता । मच्चित्तता या नांव ॥२९॥
नाना चिंतेचे प्रबळ अर्थ । पुढे येवोनि झाल्या प्राप्त ।
चित्त विसरेना भगवंत । जाण मच्चित्त अहर्निशी ॥३०॥
उत्तममध्यमाधमा भूतीं । भगवद्भाव अहोराती ।
या नांवे मुख्य भगावद्भक्ती । स्वप्नसुषुप्ती भगवंत ॥३१॥
जागृति स्वप्नसुषुप्ती । ज्यांसी स्फुरेना देहस्फुर्ती ।
ऐशा चालीं वेदोक्ती । जाण तो निश्चिती मत्पर ॥३२॥
सद्गुरुवाक्य अति निपुण । जाणोनि देहाचे मिथ्यापण ।
मी आत्मा परिपूर्ण । मत्परायण या नांव ॥३३॥
देही देहाचें नाही स्फुरण । वेदोक्त चालवी कर्माचरण ।
ज्यासी नुठे आत्माभिमान । मत्परायण तो भक्त ॥३४॥
नित्य करिता भगवद्भजन । संकल्प विकल्प गेले विरोन ।
त्यासींच भेटे रघुनंदन । अनन्यभजन या नांव ॥३५॥
वैर करावया आवडी पूर्ण । अंगी असेल आंगवण ।
तरीच वैराचें पूर्ण कारण । सांग संपूर्ण सांगेन ॥३६॥
मुख्य वैरांचे कारण । करावे गादारहरण ।
तेचि विषयींचे निरुपण । नारद आपण सांगत ॥३७॥
तस्य पत्नी महाभागा लक्ष्मी सीतेति विश्रुताः ।
दुहिता जनकस्यैषा प्रोत्थिता वसुधातलात्॥३६॥
रुपेणाप्रतिमा लोके सर्वलक्षणलक्षिता ।
छायेवानुगता रामं निशाकरमिव प्रभा ॥३७॥
शीलाचारगुणोपेता साध्वी धैर्यसमन्विता ॥३८॥
नारद सीतेचे स्वरुपलक्षण सांगतात :
त्या श्रीरामाची निजकांता । परम सुंदर पतिव्रता सीता ।
तिच्या स्वरुपासीं समता । नाही सर्वथा तिही लोकी ॥३८॥
रंभा उर्वशी तिलोत्तमा । तृणप्राय़ यांची उपमा ।
खद्योतप्राय उमा रमा । सीतेंसीं समा त्या नव्हती ॥३९॥
रुपावेगळी नव्हे छाया । तेंवी सीता श्रीरामराया ।
वेगळी नव्हे कांही केलिया । अनुगत तया अहर्निशी ॥१४०॥
जेंवी चंद्राची द्योतकता । वेगळी न करवे सर्वथा ।
तेंवी श्रीरामावेगळी सीता । नव्हे तत्वता निश्चित ॥४१॥
ते जनकाची निजदुहिता । नित्यानुकूल श्रीरघुनाथा ।
शिलसाध्वी पतिव्रता । सती सीता निजसत्वें ॥४२॥
एवं ते सर्वमाख्यातं मया रावण विस्तरात् ।
महते देवदेवस्य शाश्वतस्याव्ययस्य च ॥३९॥
एवं श्रुत्वा महाबाहो राक्षसेन्द्र प्रतापवान् ।
त्वया सह विरोधेच्छुश्चिंतयामास राघवः ॥४०॥
सावध करोनि रावण । नारद अनुवादे पै आपण ।
श्रीरामाचे स्वरुपलक्षण । तुज म्या संपूर्ण सांगितले ॥४३॥
सगुण आणि निर्गुण । दोही स्वरुपी राम पूर्ण ।
हे म्या सांगितले विवंचून । स्वरुपलक्षण सीतेचे ॥४४॥
देवाधिदेव श्रीरघुनाथ । अजन्मा अव्यय अच्युत ।
त्याचा सांगितला वृत्तांत । समूळ साद्यंत लंकेशा ॥४५॥
यावरी तुजला उचित । जो देखसी निजहितार्थ ।
तो तो करावा निश्चित । हे नारदोक्त ऐकोनी ॥४६॥
सीताहरण कसे करावे, असे रावण नारदाला विचारतो :
स्वये बोलतो रावण । युद्धी माझा जाय प्राण ।
ऐसे श्रीरामे करणे रण । ते वैरकारण मज सांगे ॥४७॥
भूत भविष्य वर्तमान । स्वामीसीं आहे निजज्ञान ।
श्रीरामासी वैरकारण । कृपा करुन मज सांगा ॥४८॥
श्रीरामासी झोंटधरणी । दुर्धर युद्ध करणे रणी ।
ऐसी आवडी माझे मनी । ते स्वामींनी पुरवावी ॥४९॥
श्रीरामहस्तें निमाल्या जाण । मी पावेन ब्रह्म पूर्ण ।
यालागी करावया रण । उद्यत मन पै माझे ॥१५०॥
ऐसे पुसत दशानन । नारद वदे हास्यवदन ।
मुख्य वैरासीं कारण । वनप्रयाण श्रीराम ॥५१॥
पितुर्नियोगात्स विभुर्दंडके विविधे वने ।
विचरिष्यति धर्मात्मा सह भ्राता सपत्निकः ॥४१॥
श्रीराम सीतेसह वनवासाला येतील, त्यावेळी
सीताहरण कर, असे नारद रावणाला सांगतात :
दशरथाज्ञा श्रीरघुनाथ । वनी वनवासी दंडकारण्यांत ।
लक्ष्मणसीतासमवेत । येईल निश्चित जनस्थाना ॥५२॥
तेथे करोनिया छळण । करावे त्याचे दारहरण ।
हे वैराचें कारण । रणी रावण मारावया ॥५३॥
श्रीरामबाणांच्या आघाती । निमोनि देह पडे क्षिती ।
तंव न सोडावी सीता सती । सायुज्यमुक्ती पावावया ॥५४॥
नारदस्य तु तद्वाक्यं चिंतयित्वा मुहुर्मुहः ।
रावणो मुमुदे श्रीमान्युद्धार्थी विचचार ह ॥४२॥
नारदाचा सल्ला ऐकून रावण सीतेला मुक्त न करिता
श्रीरामांच्या हातून मुक्ती मिळविण्याचा निर्धार करतो :
ऐकोनि नारदाचे वचन । आल्हादे नाचे दशानन ।
श्रीरामासी करावया रण । हर्ष पूर्ण युद्धाचा ॥५५॥
साक्षेपे सांगितले बहुती । रावण न सोडी सीता सती ।
श्रीरामहस्तें पावावया मुक्ती । मुनिवचनोक्तीं विश्वासे ॥५६॥
हा इतिहास पुरातन । धर्मऋषीनें आपण ।
मंदोदरीप्रति सांगोन । केले गमन स्वाश्रमा ॥५७॥
एका जनार्दना शरण । जाहले पूर्व निरुपण ।
पुढील कथा अति गहन । श्रोती अवधान मज द्यावे ॥५८॥
स्वस्ति श्री भावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
नारदरावणसंवादो नाम चतुर्विशतितमोऽध्यायः ॥२४॥
ओंव्या ॥१५८॥ श्लोक ॥४२॥ एवं ॥२००॥
