वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 226. हरिश्चंद्रराजाचें चरित्र

हरीश्चंद्रराजाचे चरि

🙏 4. संत नामदेव · ABH-083986 · अभंग क्र. २१७१

2171.
हरीश्चंद्रराजाचे चरित्र

सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नी हे समग्र दिले राज्य ॥१॥
ब्राह्मणासी सुवर्ण औटभार । संकल्प हा त्वरे सोडियेला ॥२॥
जागृतीमाजी येऊनि ब्राह्मण । मागती सुवर्ण राजयासी ॥३॥
वंदूनि चरण राजा बोले त्यासी । चला आश्रमासि स्वामि आता ॥४॥
समारंभे रूपे घेऊनि ब्राह्मण । अयोध्येकारणे आले तेव्हा ॥५॥
राजद्वारापाशी येऊनि ब्राह्मण । मागत सुवर्ण राजयासी ॥६॥
भांडारियासी आज्ञा करी हरिश्चंद्र । आणा वेगी त्वरे सुवर्ण हे ॥७॥
ऐकूनिया शब्द क्रोधे तो ब्राह्मण । करीत ताडण राजियासी ॥८॥
माझे मज देसी काय समजोनि । विचार हा मनी कैसा केला ॥९॥
वंदूनि चरण बोले हरिश्चंद्र । कृपेचे सागर स्वामी तुम्ही ॥१०॥
कृपा करुनिया केले हे सावध । करा अपराध क्षमा माझे ॥११॥
तारामती त्यासी करी विनवणी । धरूनिया वेणी मारी तिसी ॥१२॥
रोहिदास बोले वंदूनि चरण । ऐकी विज्ञापना एक माझी ॥१३॥
स्वामीपाशी मी तो रहातो गहाण । देऊनि सुवर्ण जाऊ आम्ही ॥१४॥
राजा बोले स्वामी द्यावी जी अवधि । तुम्ही कृपानिधि महाराजा ॥१५॥
नवखंडा वेगळी असे वाराणसी । विकूनि देहासी देऊ आम्ही ॥१६॥
बोलावूनि मंत्री सांगे हरिश्चंद्र । करा कारभार स्वामीपाशी ॥१७॥
स्वामी सांगतील तेंच करा मान्य । कार्य विचारूनि करीत जावे ॥१८॥
आह्मी जातो आला कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंति माझी ॥१९॥
ठेवूनिया सर्व अलंकार भूषण । झाली तिघेजण मार्गस्थही ॥२०॥
राजा हरिश्चंद्र मागे तारामती । चिमणीही मूर्ति रोहिदास ॥२१॥
पाहूनिया लोक करिताती शोक । पशुपक्षादिक सर्व तेही ॥२२॥
कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । का आम्हा सर्वत्रा मोकलीसी ॥२३॥
लेंकुराचेपरी केलासे सांभाळ । मातेविण बाळ राहे कैसे ॥२४॥
लागेल ते द्रव्य घेई आह्मापाशी । देई या विप्रासी महाराजा ॥२५॥
येती काकुळती करिती नमस्कार । नको तू अंतर देऊ आम्हा ॥२६॥
विप्रासी लोक येती काकुळती । देई हा नृपति आम्हापासी ॥२७॥
द्विगुणी सुवर्ण देतो तुज आता । सोडी कृपावंता हरिश्चंद्रा ॥२८॥
स्वामी तुम्ही करा राज्यकारभार । ठेवा हरिश्चंद्र आम्हापाशी ॥२९॥
नका करू गाईवत्सा ताडातोडी । येती घडोघडी काकुळती ॥३०॥
ऐकोनिया बोले क्रोधे तो ब्राम्हण । जा राजा त्वरेने येथूनिया ॥३१॥
राजियाने केली सर्वा विनवणी । निघाला तेथूनि हरिश्चंद्र ॥३२॥
आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र । तपा तुम्ही तीव्र सोळा कळा ॥३३॥
वरूणासी सांगे आटवावे पाणी । जळशोष मेदिनी पाडियेला ॥३४॥
वायुलागी सांगे नका येऊ येथे । जात तया पंथे हरिश्चंद्र ॥३५॥
वृक्ष हे जळाले पाषाण उलले । त्या पंथे चालिली तिघेजण ॥३६॥
शरीरे तिघांची करपोनिया गेली । तृषा ते लागली रोहिदासा ॥३७॥
रोहिदास बोले माते दे जीवन । कासावीस प्राण होतो माझा ॥३८॥
तशामध्ये वृद्ध ब्राम्हण होऊनि । आला तया वनी विश्वामित्र ॥३९॥
येऊमि राजास आशिर्वाद केला । सत्त्वधीर मला राजया तू ॥४०॥
आम्ही तिघेजण पुत्न आणि दारा । जात हरिश्चंदा भिक्षेलागी ॥४१॥
उष्णकाळदीन पाया आले फोड । देई चर्मजोडे तिघांजणा ॥४२॥
ऐकतांचि ऐसे केले त्या अर्पण । झाली तिघेजण मार्गस्थही ॥४३॥
पांया आले फोड वाहती रुधिर । राजा हरिश्चंद्र चालतांना ॥४४॥
रोहिदास बोले ताता पाजी पाणी । बोलता वदनी शब्द नये ॥४५॥
कडे घेऊनिया रोहिदास बाळ । धुंडितसे जळ वनामाजी ॥४६॥
विश्वामित्रे वनी लाविला वणवा । चुकली हे तेव्हा तारामती ॥४७॥
घाबरी ते झाली पाहे वेडयावाणी । न दिसे नयनी हरिश्चंद्र ॥४८॥
कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । का मज उदारा मोकलीले ॥४९॥
रोहिदास बाळ घेऊनि सांगाते । गेला कोण्या पंथे महाराजा ॥५०॥
तृषाक्रांत झाले होते माझे ताम्हे । पाजिले जिवन कोठे त्यासी ॥५१॥
तारामती शोक करी त्या वनांत । आले अकस्मात्‌ । विश्वामित्र ॥५२॥
कोणीची तू कांता फिरसी या वनी । बोले त्यालागुनी तारामती ॥५३॥
भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । चुकले भूपाळ बनामाजी ॥५४॥
येरु बोले दोघे नेले आहाळोनी । प्रेते तिसी दोन्ही दाखविली ॥५५॥
पाहूनिया प्रेते पिटीले वदन । आक्रोशे रुदन करी तेव्ही ॥५६॥
का हो स्वामी मज सांडियेले येथे । धरीयला पंथ वैकुंठींचा ॥५७॥
रोहिदास बाळ सांगाते घेउनी । मजला का वगी सांडियेले ॥५८॥
सकुमार शरीर पंथी झाले क्लेश । ह्मणोनी उदास झाला तुम्ही ॥५९॥
तशामध्ये तुम्हा साह्य झजला अग्नि । माझे काम स्मरण विसरला ॥६०॥
सवे असे बाळ हळू चाला पंथ । येते मी धांवत मागे आता ॥६१॥
रोहिदास बाळ घेतला ओसंगा । कांहो पांडुरंगा ऐसे केले ॥६२॥
कांहो चुकविले माझिया पाडसा । पाहू राजहंसा कोठे आता ॥६३॥
तृषाक्रांत झाले होते माझे तान्हे । मिळाले जीवन नाही त्यासी ॥६४॥
पतिपुत्र दोघे गेले निजधामा । भेट मेघ:शामा करी माझी ॥६५॥
वनी ऐसा शोक करी तारामती । गेला तो गभस्ती अस्तमाना ॥६६॥
विश्वामित्न म्हणे ऐक आता बाई । होणार ते कांही न चुकेची ॥६७॥
देई यांसी अग्नी झालीसे यामिनी । भय या काननी श्वापदाचे ॥६८॥
बोले तारामती ऐका तुम्ही ताता । पतिसवे आता अग्नि द्यावा ॥६९॥
येरु म्हणे तुझा पति आहे ऋणी । ऐकिले श्रवणी आम्ही ऐसे ॥७०॥
पतीचे जे ऋण फेडी प्रतिव्रता । गोष्ट हे अनंता मानता हे ॥७१॥
बोले तारामती ऋणी तिघेजण । मागुती हे येणे जन्मालागी ॥७२॥
ताता तुम्ही आता अग्नि द्यावा त्वरे । करुनी अव्हेर गेला तेव्हा ॥७३॥
दोन प्रहर रात्र झालीसे यामिनी । व्याघ्र हा होउनी आला तेथे ॥७४॥
ओढी रोहिदासा करुनी गर्जना । आली ते मूर्च्छना सतीलागी ॥७५॥
गेली ती यामिनी अरुणोदय झाला । अकस्मात्‌ आला हरिश्चंद्र ॥७६॥
सवे असे त्याच्या रोहिदास बाळ । भेटला वेल्हाळ मातेलागी ॥७७॥
तिघांसही तेव्हा झाले समाधान । वसिष्ठ चरण आठविती ॥७८॥
एकामागे एक चालताती पंथ । देखियले तेथे अन्नछत्न ॥७९॥
रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । सुंगध तरुवर डोलताती ॥८०॥
विश्वामित्ने तेथे केलेंसे निर्माण । होताती भोजन ब्राह्मणाचे ॥८१॥
त्याची पंथे जाण राजा हरिश्चंद्र । येऊनिया विप्र बोले त्यासी ॥८२॥
चला महाराजा माझ्या आश्रमासी । करी भोजनासी आवडीने ॥८३॥
राजा म्हणे नव्हे आमुचा हा धर्म । नका करु श्रम तुम्ही आता ॥८४॥
वंदुनी चरण पुढे चाले पंथ । आली अकस्मात्‌ तारामती ॥८५॥
विश्वामित्रे तेथे केलेंसे विचित्र । मायेचा हरिश्चंद्र निर्मियेला ॥८६॥
आणिक प्रकारे विलास भोगीत । असे हर्षयुक्त आनंदाने ॥८७॥
येऊनिया विप्र बोले सतीलागी । चला बाई वेगी आश्रमासी ॥८८॥
अन्नोदक सेवी रुचेल हे तूते । असे तुझा कांत तेथे बाई ॥८९॥
बोलावितो तुज पाहे विलोकुनी । देखे त्या नयनी तारामती ॥९०॥
स्मरूनिया तेव्हा वसिष्ठ चरणा । का गा नारायणा ऐसे केले ॥९१॥
पूर्वेचा हा सूर्य पश्चिमे उगवेल । समुद्र सांडील मर्यादेसी ॥९२॥
ऐसेंही घडेल कळे कोणकाळे । परी सत्वासी न ढळे हरिश्चंद्र ॥९३॥
दीपक हा कैसा अंधारी पडला । वायुसुत भ्याला भुतालागी ॥९४॥
ऐसे सांगा कोठे झाले विपरीत । तैसा नव्हे सुत शिबीचा हा ॥९५॥
तैसा हरिश्चंद्र नोहे हा निश्चित । चाले पुढे पंथ तारामती ॥९६॥
ताता तुम्ही आता नका करू श्रम । नोहे ऐसा धर्म आमुचा हा ॥९७॥
रोहिदास बाळ आला तयेवेळी । ऋषि त्या जवळी पातलासे ॥९८॥
हाती घेऊनिया उदकाची झारी । प्राशन तू करी बाळा आता ॥९९॥
तुझी मातापिता असे अन्नछत्री । बोलाविती नेत्नी पाहे आता ॥१००॥
पाहूनिया त्याने विस्मय तो केला । अगस्ती ग्रासिला समुद्राने ॥१०१॥
ऐसे कोठे नाही झाले विपरीत । दोघेंहिनिश्चित नोहेती हे ॥१०२॥
आमुचा हा धर्म नोहे ऐसा स्वामी । कृपा आता तुम्ही असो द्यावी ॥१०३॥
विस्मय तो ऋषि करितो मनांत । नाही सिद्धि जात पण माझा ॥१०४॥
मार्ग हा क्रमिता तिघा भेट झाली । वार्ता सांगितली एकमेका ॥१०५॥
हरिश्चंद्र बोले नेणे मी हे कांही । लक्ष असे पायी वसिष्ठाच्या ॥१०६॥
पुढे देखियले वोस ते नगर । असे भयंकर पिशाच्य ते ॥१०७॥
तेथे स्मरूनिया वसिष्ठ चरण । ध्यानी नारायण आठविती ॥१०८॥
पुढे देखियली नगर वाराणसी । वंद्य सर्वासी ते देवादिका ॥१०९॥
भूमीवरी शिवे आणिले कैलास । करिताती वास पूण्यप्राणी ॥११०॥
काळबहिरवाची तेथे कोतवाली । भय नाही बोली यमाची ते ॥१११॥
पवित्र हे वाहे भागिरथीचे जल । हरती सकळ दोष सर्व ॥११२॥
देखोनि हरिश्चंद्रे केला नमस्कार । पोहोंचले ते तीर भागिरथीचे ॥११३॥
तिघांजणी तेव्हा केले तेथे स्नान । आला तो ब्राम्हाण तेचि वेळा ॥११४॥
धुंडितांना तुम्हा मोठा झाला श्रम । कासयासी धर्म केला ऐसा ॥११५॥
हरिश्चंद्रे केले त्यासी दंडवत । असावे सांगात स्वामी आता ॥११६॥
तिघांजणी माथा बांधोनिया तृण । बैसली जाऊन हाटवली ॥११७॥
पाहती सकळ नगरीचे लोक । अयोध्येचा नृप हरिश्चंद्र ॥११८॥
सकुमार त्याची कांता तारामती । सगुणही मूर्ति रोहिदास ॥११९॥
ब्राम्हीणासी याने राज्य दिले दान । राहिले सुवर्ण याचे याचे कांही ॥१२०॥
म्हणोनिया उभी केली ही बाजारी । प्रारब्धाची दोरी पाहे कैसी ॥१२१॥
विकावया आणिली लावण्य वनिता । समजली वार्ता वेश्येलागी ॥१२२॥
येऊनि ब्राम्हाणा पुसे तिचे मोल । सुवर्ण एक तुळ घेऊ इचे ॥१२३॥
मानली हे गोष्टी वेश्येचिया चित्ता । घेतली हे आता तारामती ॥१२४॥
चाल बाई आता माझिये सदनी । होशील स्वामिनी सर्वस्वी तू ॥१२५॥
आवडे तितुके लेई अलंकार । विलास समग्र भोगी आता ॥१२६॥
देखूनि लावण्य आता तुझे रूप । वश्य होईल भूप नगरीचा ॥१२७॥
हरले हे दैन्य आता तुझे बाई । नाही तुज कांही भय चिंता ॥१२८॥
ऐकोनिया शब्द तेव्हा तारामती । येती काकुळती विप्रालागी ॥१२९॥
नका इसी देऊ मज महाराजा । नोहे धर्म माझा ऐसा ताता ॥१३०॥
तथापिही तुम्ही दिले इचे हाती । प्राण हा निगुती देईन मी ॥१३१॥
करा उपकार विकावे आणिका । तुम्ही मायबापा कृपावंता ॥१३२॥
वेश्येचे हे द्रव्य दिले ते माघारे । आला एक विप्र घ्यावयासी ॥१३३॥
दशग्रंथी निपुण षडशास्त्री प्रवीण । धर्म परायण महाराज ॥१३४॥
काळ हे कौशिक नाम तयाप्रती । त्याने तारामती घेतली हे ॥१३५॥
पाकशाळेमाजी करावया अन्न । घेतली अन्नपूर्णा ब्राम्हाणाने ॥१३६॥
धर्माची तू कन्या माझिये तू बाई । सुखे आता राही अन्नछत्री ॥१३७॥
तारामती करी दोघा नमस्कार । कृपा दिनावर असो द्यावी ॥१३८॥
विलोकिले तेव्हा नृपाचे वदन । कधी हे चरण पाहीन आता ॥१३९॥
मुक्ताफळ झाले समुद्राचे पोटी । परी झाली तुटी प्राक्तनाने ॥१४०॥
विचित्र हा असे प्रारब्धाचा खेळ । काय तळमळ करूनिया ॥१४१॥
येते स्वामी आता कृपा असो द्यावी । सांड न करावी पुन्हा माझी ॥१४२॥
दीपक प्रकाश नोहे हा वेगळा । तैसी मी दयाळा जडले अंगी ॥१४३॥
हेंचि जन्मोजन्मी देगा चक्रपाणी । चालिली तेथूनि तारामती ॥१४४॥
रोहिदास बाळ धांवे तिचे मागे । आवरीत अंगे राजा त्यासी ॥१४५॥
घेऊनिया येतो मातेचे दरुशन । विलोकी वदन तारामती ॥१४६॥
प्रेमपान्हा तेव्हा आला तिचे स्तनी । पाजी त्यालागुर्नी बैसूनिया ॥१४७॥
पाहुनी सर्वांचे सद्नद अंतर । बोलता उत्तर नये वाचे ॥१४८॥
नको करू देवा मायबाळा तुटी । पाहावेना द्दष्टी कोणासी हे ॥१४९॥
काळ कौशिकासी बोले तारामती । ऐकावी विनंति एक ताता ॥१०५॥
घ्यावा रोहिदस करील हा सेवा । तुम्ही कृपार्णवा महाराजा ॥१५१॥
ऐकोनिया ऐसे विप्रासी तो बोले । काय याचे मोल सांगा स्वामी ॥१५२॥
अर्ध तुक हे घेऊ येचि क्षणी । दिले त्यालागुनी कौशिकाने ॥१५३॥
तारामती आणि रोहिदास बाळा । घेउनी दयाळ गेला तेव्हा ॥१५४॥
हाटवती उभा असे हरिश्चंद्र । आला तो महार वीरबाहू ॥१५५॥
ब्राह्मणासी पुसे काय याचे मोल । हेम दोन मोल घेऊ याचे ॥१५६॥
मानली हे गोष्टी डोंबाचिया चित्ता । घेतला हा आता हरिश्चंद्र ॥१५७॥
विप्राचे चरणी नृप ठेवी माथा । कृपा दयावंता असो द्यावी ॥१५८॥
घेउनी हरिश्चंद्र गेला आश्रमासी । सांगतो कांतेसी वीरवाहू ॥१५९॥
सांगा यासी काम आणिला चाकर । पाहुनी उत्तर करी कांता ॥१६०॥
कृश सकुमार आणिला कासया । काय द्रव्य वाया जात होते ॥१६१॥
सांगती त्या काम डोंबाच्या कामिनी । जाय आणी पाणी हरिश्चंद्रा ॥१६२॥
त्वरे करूनिया भरी हे रांजण । दिला उचलुनी कुंभ हाती ॥१६३॥
जळ आणावया गेला हरिश्चंद्र । मागे विश्वामित्रे काय केले ॥१६४॥
छिद्र पाडियेले रांजणाचे तळी । कुंभ तयेवेळी फुटिन्नला ॥१६५॥
ताडण करिती डोंबाच्या कामिनी । दिला उचलोनी दुजा कुंभ ॥१६६॥
दोन प्रहर त्याने वाहिले उदका । नसे थेंब एक रांजणांत ॥१६७॥
वीरबाहुने त्या केलेंसे ताडण । दिले तेव्हा धान्य कोरडे ते ॥१६८॥
दळू कांडू लागे करी सर्व धंदा । ध्यानी त्या गोविंदा आठवीत ॥१६९॥
भागिरथीचे तीरी करीत स्वयंपाक । आला तेव्हा एक विप्र तेथे ॥१७०॥
घाली महाराजा मजा आता अन्न । बैसला येऊन त्याजपाशी ॥१७१॥
हरोश्चंद्रे त्यासी केला नमस्कार । बैसा क्षणभर स्वामी येथे ॥१७२॥
हरिश्चंद्रे केले दोन भाग अन्न । ब्राह्मणाकारणे दिला एक ॥१७३॥
खाऊनिया अन्न पाहे दुजाकडे । ठेवी तयापुढे हरिश्चंद्र ॥१७४॥
नित्यानित्य तेथे जेवीतसे विप्र । घडे निराहार हरिश्चंद्रा ॥१७५॥
शरीर झाले कृश अंगी नसे शक्ति । तयासि बोलती वीरबाहू ॥१७६॥
स्मशानी रक्षण करी तू हे आता । अवश्य म्हणे ताता हरिश्चंद्र ॥१७७॥
म्हणसणखांबा नाम ठेविले तयासी । राहे दिवसनिशी स्मशानी तो ॥१७८॥
द्रव्यावांचोनिया जाळो न देई प्रेत । अहोरात्र ध्यात देवाजीशी ॥१७९॥
काळकौशिकाचे घरी तरामती । वाढीतसे पंक्ति ब्राम्हाणींच्या ॥१८०॥
उत्तम स्वादिष्ट पवित्र ते अन्न । जेविती ब्राम्हाण आवडी प्रेमे ॥१८१॥
रोहिदास करी कौशिकाची सेवा । तुळसी पुष्पे दुर्वा आणितसे ॥१८२॥
फुले तोडितसे रोहिदास बाळ । दंश केला व्याळे त्याजलागी ॥१८३॥
सांगातीयांस तेव्हा बोले रोहिदास । सांगावा मातेस नमस्कार ॥१८४॥
नाशिवंत देह गेलासे विलया । नको शोक वांया करू याचा ॥१८५॥
वारंवार तिच्या संबोखावे मना । तुम्हांसी प्रार्थना हेचि माझी ॥१८६॥
ऐकोनि सांगाती करिती रुदन । सोडियेला प्राण रोहिदासे ॥१८७॥
पाकशाळेमाजी होती त्याची माता । श्रुत केली वार्ता सांगात्यांनी ॥१८८॥
ऐकोनिया ऐसे चिंतावली मनी । कांहो चक्रपाणी ऐसे केले ॥१८९॥
आटोपोनि सर्व तेथील हा धंदा । निघाली हे शोधा बाळकाच्या ॥१९०॥
झालीसे यामिनी कांही न दिसे वाट । मोडताती कांटे पायांलागी ॥१९१॥
नाही त्याची शुद्ध चालली धांवता । लागले ते प्रेत पाया तिच्या ॥१९२॥
ओळखूनि तिने पिटिले कपाळ । आलंगिला बाळ ह्रदयी तिने ॥१९३॥
दर्दरुनी तिचे स्तनी आला पान्हा पाजू आता कोणा रोहिदासा ॥१९४॥
सखया रोहिदासा का बा रुसलासी । टाकूनि गेलासि मजलागी ॥१९५॥
पाहात मी होते नित्य तुझे मुख । विसरले दु:ख भ्रताराचे ॥१९६॥
घडी घडी माझा हरिसी तू श्रम । फुटके हे कर्म माझे देवा ॥१९७॥
काय घडले दोष की दैवाची मी हीन । हरपली रत्ने दोन माझी ॥१९८॥
कंठू आता काळ कवणाचिये बळे । जाहले हे निर्मूळ वंशाचे की ॥१९९॥
आकोशे करून ह्रदय पिटित । आले अकस्मात्‌ विश्वामित्र ॥२००॥
सांगा बाई कैसे झाले वर्तमान । केले हे श्रवण त्याजलागी ॥२०१॥
नको करू बाई शोक कांही आता । ही समजेल वार्ता आता डोंबा ॥२०२॥
द्रव्याविण तो हा जाळो नेदी प्रेत । नको करू मात प्रगट ही ॥२०३॥
आणितो साहित्य अग्नि दे झडकरी । आली तेव्हा तिरी भागिरथीच्या ॥२०४॥
पेटवूनि अग्नि करी ते रुदन । आला तो धांवून म्हाअणखांबा ॥२०५॥
न देतांना द्रव्य जाळिसी तू प्रेत । मारीतसे हाते तिजलागी ॥२०६॥
विखरूनि त्याने दिला तेव्हा अग्नि । घालुनी जीवन विझविला ॥२०७॥
प्रेत घेऊनिया रडे तारामती । प्रारब्धाची गती कैसी देवा ॥२०८॥
सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । त्याचा की हा पुत्र रोहिदास ॥२०९॥
अंतकाळी यास ठाव अग्नि नेदी । स्पर्शला येऊन अनामिक ॥२१०॥
काय ऐसे कर्मी लिहिले विधीने । झाल्या तिघा तीन वाटा देवा ॥२११॥
भ्रतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे । दु:ख कोणापुढे सांगू आता ॥२१२॥
ऐकोनी हरिश्चंद्र खोंचला तो मनी । आला तो धांवुनी तिजपाशी ॥२१३॥
सांगे वर्तमान बोले गहिंवरून । करी निवेदन तारामती ॥२१४॥
सांगितला त्यासी सकळ वृत्तांत । ह्रदय पिटीत हरिश्चंद्र ॥२१५॥
येरी म्हाणे कोण सांग तू हे आता । श्रुत केली वार्ता मुळींहुनी ॥२१६॥
तुम्हा दोघा दिल्हे कौशिकाचे घरी । दास्यत्व मी करी डोंबाचे हे ॥२१७॥
म्हासणखांबा नांव ठेविले हे त्याने । करितो रक्षण म्हासणामाजी ॥२१८॥
अद्याप सेविले नाही म्या हे अन्न । शरीर कृश तेणे झाले माझे ॥२१९॥
ऐकोनिया दु:ख पडली विकळ । घेतला तो बाळ हरिश्चंद्र ॥२२०॥
सख्या रोहिदसा क बा रुसलासी । टाकूनि गेलासी मजलागी ॥२२१॥
मजपाशी तुझे गुंतलेंसे मन । म्हाणुनी धांवून आलासी तू ॥२२२॥
अंतकाळी केल्या तिघांसही भेटी । दैवाची करंटी आम्ही दोघे ॥२२३॥
कैसे झाले माझे ह्रदय पाषाण । दिले म्या लोटून तुजलागी ॥२२४॥
जळोत हे हात जावो माझा प्राण । व्यर्थ हा वांचून काय आंता ॥२२५॥
आक्रोशे करुनी ह्रदय पिटीत । त्यासी संबोखीत तारामती ॥२२६॥
नका स्वामी शोक करू कांही आता । होते जे संचिता झाले माझे ॥२२७॥
धन्यापाशी आता आज्ञा घ्या मागून । द्यावयासी अग्नि महाराजा ॥२२८॥
आज्ञा मागावया गेला हरिश्चंद्र । मागे विश्वामित्न काय करी ॥२२९॥
एकली तू येथे लावीचे हे भय । देउळांत राहे क्षणभरी ॥२३०॥
ऐकोनि देउळी गेली तारामती । निद्रा तयेप्रती लागलीसे ॥२३१॥
विश्वामित्र तेव्हा आले देउळांत । काढोनिया आर्त बाळकाची ॥२३२॥
रक्त मांस तिच्या लाविले मुखासी । सांगत लोका सि लाव आली ॥२३३॥
बाळ भक्षितसे देउळाभीतरी । देखोनिय दुरी पळालो मी ॥२३४॥
धीट धीट लोक आंत प्रवेशोनि । बांधिली ते क्षणी तारामती ॥२३५॥
श्रुत केली वार्ता गांवींच्या राजाला । तो म्हणे लावेला जीवे मारा ॥२३६॥
बोलाविला त्यानेम वीरबाहू डोंब । सांगतसे अंगे राजा त्यासी ॥२३७॥
चालविली तेव्हा भागिरथीचे तीरी । प्राहती नरनारी द्दष्टी तेव्हा ॥२३८॥
काळकौशिकाचे घरी हे देखियेली । नाही समजली तेव्हा कोणा ॥२३९॥
एकमेका ऐसे करिती उत्तर । आला तो महार वीरबाहु ॥२४०॥
,म्हसणखांबा त्याने बोलाविला त्वरे । छेदी इचे शिर आज्ञा केली ॥२४१॥
ओळखिली त्याने तेव्हा तारामती । प्रारब्धाची गति कैसी देवा ॥२४२॥
घालियेले तिसी भागिरथीचे स्नान । करी तु स्मरण देवाजीचे ॥२४३॥
काय इच्छा असेल माग तुझे मनी । पुरवील चक्रपाणी तुझी आशा ॥२४४॥
स्वर्गी सुरव्र बैसोनी विमानी । पाहती नयनी कवतुक ॥२४५॥
भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । मागता स्नेहाळ विश्वामित्न ॥२४६॥
श्रीगुरु वसिष्ठ कृपेचा सागर । असो त्याचा कर मस्तकी हा ॥२४७॥
होंचि जन्मोजन्मी दे गा नारायणा । नाही हे वास्ना आणिकांची ॥२४८॥
तारामती ह्मणे एक्या घाये हाणी । लक्ष हे चरणी वसिष्ठांच्या ॥२४९॥
उचलिता कर आले नारायण । धरी आलिंगून हरिश्चंद्रा ॥२५०॥
पितांबरधारि सगुण मेघ:शाम । योग्याचा विश्राम तोचि बाप ॥२५१॥
त्याने कृपाद्दष्ठि विलोकिले तिघा । पुढे असे उभा रोहिदास ॥२५२॥
विश्वामित्न तेव्हा संतोपले चित्ती । आलिंगिले प्रीति तिघांजणा ॥२५३॥
पुष्पवृष्टी केली स्वर्गी सुरवरांनी । धन्य त्रिभुवनी कीर्ति ज्याची ॥२५४॥
श्रीगुरु वसिष्ठ आले तयेवेळा । सवे असे मेळा ऋषींचा तो ॥२५५॥
त्याने आइलंगिले तिघा कृपाद्दष्टि । धेनुवत्सा भेटी झाली जैसी ॥२५६॥
तिघांजणी केला तेव्हा नमस्कार । प्रेम अश्रु नीर वाहे डोळा ॥२५७॥
ह्रदयी धरुनी आलिंगिली त्याने । मायबाळ तान्हे न विसंबे ॥२५८॥
काळ तो कौशिक वीरबाहु डोंब । विमानी श्रीरंगे बैसविले ॥२५९॥
कोटी वरुषे तप विश्वामित्रे केले । ते समग्र अर्पिले हरिश्चंद्रा ॥२६०॥
समारंभे नेली अयोध्येसी तिघे । बैसविली अंगे राज्यास्थानी ॥२६१॥
साठसह्स्र वरुषे राज्य करा सुखे । दिला हा स्वमुखे आशिर्वाद ॥२६२॥
सत्त्वधीर राजा सत्त्वाच्या ह्या कीर्ति । ऐकतांचि जाती दोष भंगा ॥२६३॥
नामदेव यासी लागली ती गोडी । वर्णितो आवडी गुण त्यांचे ॥२६४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग