पुण्य परउपकार पाप ते
2283.
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणीक हे वर्म नाही दुजे ॥धृपद॥
गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ॥४॥
अर्थ :
पुण्य म्हणजे पर उपकार आणि पाप म्हणजे परपीडा आणि पाप व पुण्य यांना दुसरा कोणताही जोडा नाही. सत्य वागणे म्हणजेच धर्म आणि असत्या प्रमाणे वागणे म्हणजे अधर्म व अकर्म आहे आणि धर्म व अधर्म यांचे खरे वर्म सत्य आणि असत्य वागणे हेच आहे दुसरे कोणतेही नाही. नामाचे स्मरण जो करतो त्याला गती मिळते व जो नामाला विन्मुख असतो त्याची अधोगती होते. संतांचा संग करणे म्हणजेच स्वर्ग वासाची प्राप्ती करून घेणे आणि संतांच्या संगती विषयी उदास राहणे व अनात्म पदार्थांशी तादात्म्य ठेवणे म्हणजेच नरक वासाची प्राप्ती करून घेणे होय. तुकाराम महाराज म्हणतात आता मी सर्वांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत त्यामुळे आता ज्याला जसे वागायचे असेल त्याने तसे वागावे.
