नामसंकीर्तन साधन पै
378.
नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरे ॥१॥
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृ॥
ठायींच बैसोनि करा एक चित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥
याहूनि आणीक नाही पै साधन ।
वाहातसे आण विठोबाची ॥४॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनि ।
शाहाणा तो धणी घेतो येथे ॥५॥
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥धृ॥
