वृत्तीवरी आम्हा येणे
2756.
वृत्तीवरी आम्हा येणे काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥
जाणतसा परी नेणते जी देवा । भ्रमचि बरवा राखावा तो ॥धृपद॥
मोडूनि क्षरलो अभेदाची मूस । तुम्हा का अळस वोढवला ॥२॥
तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचे फार काम नाही ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही वृत्तीशून्य म्हणजे ब्राम्ही अवस्थेत असून देखील पुन्हा वृत्तीवर का आलो आणि एवढी आटाआटी का करावी लागत आहे ? देवा तुम्हाला याविषयी सर्व माहित आहे तरी देखील तुम्ही नेणतेपणाचे ढोंग दाखवित आहात तुमचा हा भ्रम तुम्ही चांगला राखून ठेवावा. देवा धर्माचे रक्षण करण्याकरता मी अभेदाचे मूस मोडून व्दैत स्थितीत आलो तेवढयात तुम्हालाच धर्मरक्षण करण्याचा आळस का आला आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्यामुळे तुम्हीही आमच्यासारखे धर्मरक्षणाकरता लवकर उदार व्हा आणि अवतार घ्या या कार्यासाठी फार लांबणीला जाण्याचे काम नाही.
