वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

चौ तेरा आम्ही चौसष्ट

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074262 · अभंग क्र. ७८६

786.
चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले ।
ते एका ऋणाईते घेतले वोळखीवीण ॥१॥
आपुले अकरांचे एक सोईरे जाणा ।
तेंही पै तयासी मिळोनी ठेले ॥२॥
आता मी चौघापासी जाईन तिहींचि नागविले पाही ।
तेथे काही नाही ऐसे म्हणितले ॥३॥
ऐसा देहाचा दिवाळखोर दुसऱ्यासी घेऊनि गेला ।
तेणे मज दाखविला अद्वैत पारू ॥४॥
सहस्रापरी काही धरियेली जरी ।
ज्ञानमूढे तरी कायी जाणती ॥५॥
ऐसा बापरखुमादेविवरू विठ्ठलु मध्यवर्ती भला ।
तेणे उगाणा होऊनिया ॥६॥

अर्थ :
चार आणि तेरा मिळून सतरा संख्या होते. या सतरा तत्त्वाचे लिंग शरीर आहे. त्या लिंग शरीराच्या ठिकाणीच चौसष्ठ कला असतात. त्या लिंग शरीराने चौसष्ट कलांच्या सहाय्याने जे देहात्मभावाचे धन साचविले त्याला परमात्म्याची बिलकुल ओळख नव्हती परंतु त्याच्या प्राप्तीची इच्छा होती. त्या ऋणाईताने आमचे ते सर्व धन घेतले. व देहात्मभावामध्ये आमचे सगे सोयरे असलेले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय व एक मन हे अकरा आहेत. हेही त्यालाच मिळून गेले. म्हणजे त्यांनाही त्याचाच वेध लागून गेला. आता मी चार वेदापाशी जाईन आणि असे का झाले म्हणून विचारेन. म्हणावे तर त्यानीच मला कसे नागवून टाकले आहे पाहा. ते केला परावृत्त
म्हणतात त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी देहादिअनात्मपदार्थ काही एक नाहीत. याप्रमाणे देहाचा दिवाळखोर म्हणजे देहसंबंध ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही (असा परमात्मा) इतकेच नाही तर दुसऱ्याच्या देहसंबंधालाही तो घेऊन गेला. अशा रितीने अद्वैत स्वरूपरुपी पलीकडचा तीर मला दाखविला. ज्ञानशून्य पुरूषानी असल्या परमात्म्याला जाणण्याचे हजारो प्रकार केले तरी त्यांना तो कळेल काय. त्या परमात्म्याची आणि जीवाची गाठ घालून देण्याला म्हणजे जीवाला परमात्म्याचे ज्ञान करून देण्याला माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मध्यस्थ पाहिजे. त्याच्याच कृपेने मी संसारापासून परावृत्त होऊन परमात्मस्वरूपाचा लाभ करून घेतला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग