वदन निमासुरे कटांवरी
209.
वदन निमासुरे कटांवरी कर ।
उभा विटेवरी पुंडलिका समोर ।
चरणी ब्रीदावळी रुळती असूर ।
वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥
तेणे नवलचि केले वो साजणी ।
सहज अवलोकिता संचारला नयनी ।
त्याविण न दिसेचि दुजे जनी वनी ।
जे जे दिसे ते ते हाचि भासे मनी वो ॥२॥
कासे कसिला वो मिरवे सोनसळा ।
कटी कटिसूत्र जडित मेखळा ।
उदरी त्रिवळी वो तुळसी वनमाळा ।
कौस्तुभ पदके व्दिजचरणांकुश सोज्ज्वळा ॥३॥
मुखमयंक पूर्णाशें उगवला ।
भक्त चकोरासी अमृते वंरुषला ।
दंत हिरयाचा प्रकाश फांकला ।
अधर सोज्जवळ वो नासाग्र सरळा वो ॥४॥
निडळी रेखिले वो केशर झळके ।
श्रवणी कुंडलाचे तेज फाके ।
नयनी सुतेज विदयुल्लता चमके ।
माथा मुगुटावरी मयूरपिच्छा स्तवके वो ॥५॥
सुंदर साजिरे वो स्वरुप ठाणमाण ।
तेणे आकर्षिले माझे पंचप्राण ।
नावडे आणिक वो त्याचीच मज आण ।
निळा म्हणे मी माझे याची झाली बोळवण वो ॥६॥
