वेदावेगळे कर्म करी |
1839.
वेदावेगळे कर्म करी | मनी पाखंड धरी |तो पविजे अघोरी | चिरकाल वरी ॥१॥
तो न आणावा पे दृष्टी | तोचि दोषी एक या सृष्टी |तो होईल महा कष्टी | हरिसी न भजता ॥२॥
संध्या स्नान नेणे दान | नेणे हरिकथा श्रवण |तोहि पतित जाण | महापातकी चांडाळ ॥३॥
सांडुनि ब्राह्मणपण | शूद्ररीती आचरण |तो कष्टी पडलिया जाण | महादोष घडेल ॥४॥
निंदा करी जो संतांची | पूजा नेणे जो देवाची |तोचि राशि पापाचि | प्रत्यक्ष जाणावी ॥५॥
तीर्थ न करी हिंडता | व्रत न करी बोलता |पुराण नायके पाहता | तो तंव राक्षस जाणावा ॥६॥
सदा अमंगल अशुची | गुरु आज्ञा भंगी साची |अखंड निंदा करी संताची | तो स्वामिद्रोही जाणावा ॥७॥
कपट शिके नानाविध | गोत्रजाशी करी विरोध |तो जाणावा हे प्रसिद्ध | महा पातकी चांडाळ ॥८॥
गृहदारावरी नाही चित्त | परस्त्रियेसी करी स्तुत |तो प्रत्यक्ष महादैत्य | त्याचे मुख पाहो नये |॥९॥
नाठवी जो उपकार | स्वामिसी न करी जो नमस्कार |तो जन्मांतरिचा होय नर | पतित चांडाळ बोलिजे ॥१०॥
पाखंड रचि कवित्व | मातापितयाचे न करी महत्व |पंच पातकी जिवित्व | तो पूर्वीचा बोका होता ॥११॥
नामा म्हणे तैसे दोषी | न आणावे पंढरियेसी |काय करावे ते पाषाण जन्मासी | जे विठ्ठलनामासी मिळतीना ॥१२॥
