॥ श्रीएकनाथमहाराजकृत
92.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय ब्याण्णवावा ॥
श्रीरामचरित्र -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामसभेचे वर्णन :
यानंतरें दुसरे दिवशी । करोनिया प्रातःस्नानासी ।
वंदोनियां महर्षींसी । भद्रपीठासीं श्रीराम आला ॥१॥
सभा बैसली घनदाट । दुजे उपमेसी वैकुंठ ।
तेथींचा महिमा उत्कट । अति श्रेष्ठ रामसभा ॥२॥
अंकी घेवोनि जनकनंदिनी । श्रीराम बैसला सिंहासनी ।
येवोनि भरतादि प्रधानीं । लोटांगणी वंदिला ॥३॥
छत्र धरिले सुमंतें । अकोपन घरी चामरातें ।
राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें । आतपत्रातें धर्मपाळ ॥४॥
रामचरणांनिकट भरत । उभा राहे जोडोनि हात ।
तो युवराजा अति विख्यात । नम्र विनीत भावार्थी ॥५॥
हाती धरोनि धनुष्यबाण । सव्य भागीं लक्ष्मण ।
उभा राहोनि विचक्षण । श्रीरामचरण लक्षित ॥६॥
शत्रुघ्न आणि सेनानी । वेत्र निजहस्ते धरोनि ।
उभे राहिले रघुनंदनी । लक्ष ठेवोनी निजचित्तें ॥७॥
सुग्रीवादि बिभीषण । उभे राहिले कर जोडून ।
सन्मुख तिष्ठे वायुनंदन । जिवलग पूर्ण श्रीरामाचा ॥८॥
वेद होवोनियां भाट । वर्णित श्रीरामप्रताप श्रेष्ठ ।
साही शास्त्रे घडघडाट । स्तुति उद्भट वानिती ॥९॥
श्रीराम सगुण की निर्गुण :
एक म्हणती राम सगुण । एक म्हणती राम निर्गुण ।
दुजा म्हणे न कळे खूण । राम चिद्घन एकला ॥१०॥
तिजा म्हणे राम एकला । तरी का बहुरूपें भासला ।
चौथा म्हणे न कळे तुला । तोचि झाला निजांगे ॥११॥
ऐसे ऐकोनिया वचन । एक म्हणे हे बहुभाषण ।
राम अविकारी निर्गुण । त्यासी आन न म्हणावें ॥१२॥
रामे विश्वाभास केला । आम्ही मानूं या बोला ।
परी रामचि विश्व झाला । वय। बोला न मानूं ॥१३॥
गारुडी युक्ति मंत्रकळा । करोनि वादीचा सर्प केला ।
की गारुडी सर्प झाला । म्हणता जनाला मानेल ॥१४॥
घट कुलालें निर्मिला । की कुलालचि घट झाला ।
तैसा रामे प्रपंच रचिला । की रामचि झाला प्रपंच ॥१५॥
माळिये देवोनि जीवन । स्वये वाढविलें उपवन ।
की तो जाहला आपण । ऐसे सांगोन मज द्यावे ॥१६॥
तुम्हांसी नाही पूर्ण ज्ञान । वृथा बोलाचे वल्गन ।
निर्गुणातें म्हणा सगुण । राम बहुभूषण राहों द्या ॥१७॥
राम अविकारी निर्मळ । राम निरंजन निश्चळ ।
राम निर्धर्म निष्फळ । न लगे मळ तयासी ॥१८॥
राम परंज्योती अमळ । राम परंधाम सोल्यळ ।
राम अद्वयानंद केवळ । न लगे मळ तयासी ॥१९॥
राम अरूप आद्य अखिल । राम परमानंद बहळ ।
राम अनाम अगोत्र अचळ । नलगे मळ तयासी ॥२०॥
राम अद्वयानंद गहन । तोचि अंगें झाला जन ।
ऐसे म्हणता अवघे जण । मज हे ज्ञान मानेना ॥२१॥
ऐसी ऐकोनि वदंती । गर्जोनि उठिला वेदांती ।
म्हणे एकडोळा जगतीं । डोळस त्याप्रति न म्हणावे ॥२२॥
निर्गुण म्हणसी श्रीरामाते । साधूनि नाना दृष्टांतांतें ।
त्या दृष्टांतांचे कारण येथे । न दिसे माते जाण पा ॥२३॥
अणोरणीयान् आदिश्रुति । ऐक्य संपादूं वर्तती ।
तुझ्या दृष्टांतांची गणती । कोण निश्चिती धरील ॥२४॥
म्हणसी कुलाल नव्हे घट । परी हे बोलचि वटवट ।
व्यर्थ युक्तीची खटपट । अंतर्निष्ठ न मानिती ॥२५॥
मृत्तिका विजाती कुलाला । म्हणोनि घट तियेचा केला ।
तैसा श्रीरामवेगळा । प्रपंच झाला काशाचा ॥२६॥
म्हणसी राम निर्विकार । तै काय होत आकार ।
त्याचा केला विश्राकार । हे साचार सांगावे ॥२७॥
आकाश पृथ्वी आप जीवन । तेज आदि पांचै जाण ।
केलीं काशाचीं घडून । मजलागून सांगावे ॥२८॥
रामावेगळें काय होते । मा त्याचीं केली पंचभूतें ।
ऐसे ज्ञान न कळे तूतें । काय दृष्टातें सांगसी ॥२९॥
तुझे पूर्वोक्त दृष्टांत । ते न होती समयोचित ।
रामस्वरूप इत्यंभूत । तुज साद्यंत सांगतो ॥३०॥
बीजामाजी वृक्षाकार । सुवर्णी जेंवी अलंकार ।
तेंवी श्रीरामी संसार । मज साचार भासत ॥३१॥
जेंवी बीजचि झाला तरुवर । सुवर्ण झाला अलंकार ।
तेवी श्रीरामचि निर्विकार । स्वये साकार जाहला ॥३२॥
राम म्हणावा निर्विकार । तंव तो भासतो साकार ।
साकार ना निराकार । परात्यर श्रीराम ॥३३॥
राम म्हणावा जरी निर्गुण । तरी तो प्रत्यक्ष भासे सगुण ।
एवं सगुण ना निर्गुण । आनंदघन श्रीराम ॥३४॥
ऐसी ऐकोनिया मात । वेद राहिले निवांत ।
अवघे वेदांतयासी नमित । धन्य म्हणत तत्वज्ञ ॥३५॥
हमुमंतकृत रामस्वरूपवर्णन :
हे ऐकोनि हनुमंत । अवघियांसी नमस्कारित ।
म्हणे माझेही हृद्गत । तुम्ही समस्त परिसावे ॥३६॥
तुम्ही बोलिलां जो अर्थ । तो तंव शुद्धत्वें परमार्थ ।
श्रीरामाचे इत्थंभूत । स्वरूप निश्चित सांगितले ॥३७॥
परंतु ऐका वेडें प्रेम । सुंदर सावळा श्रीराम ।
हेंचि माझे अद्वय ब्रह्म । न कळे वर्म आणिक ॥३८॥
हाती घेवोनि धनुष्यबाण । जेणे मर्दिला रावण ।
ते हे सावळे ब्रह्म पूर्ण । पाहता नयन निवती ॥३९॥
दासांसाठी अवतार धरित । वनरांचा तरी अंकित ।
तो हा माझा श्रीरघुनाथ । ब्रह्म निश्चित मज वाटे ॥४०॥
राम ज्ञानाचें निजज्ञान । राम ध्यानाचे निजध्यान ।
राम समाधी समाधान । चैतन्यघन श्रीराम ॥४१॥
राम भक्तांचें माहेर । राम ज्ञानाचें जिव्हार ।
राम साराचे निजसार । हा निर्धार पै माझा ॥४२॥
रामांवाचूनि ब्रह्मज्ञान । आम्हांसी नलगे नलगे जाण ।
आमुचे ब्रह्म रघुनंदन । बोले गर्जोन हनुमंत ॥४३॥
राम सर्वदा मुखी गाऊ । राम सर्वदा नित्य ध्याऊं ।
राम सर्वदा नेत्री पाहू । तरोनि जाऊ भवसिंधु ॥४४॥
राजाधिराज श्रीरामांचा सर्वांकडून एकमुखाने जयजयकार :
ऐसिया हनुमंताचे वचनी । गर्जो लागल्या संतश्रेणी ।
भला भला रे इहीं वचनी । झाली गगनी पुष्पवृष्टि ॥४५॥
ऋषिवरांचा जयजयकार । वानरांचा भुभुःकार ।
मगळवाद्यांचा गजर । नादे अंबर कोंदलें ॥४६॥
परमानंदं रघुनाथ । हनुमंतासी आलिंगित ।
स्वये उचलोनि आनंदभरित । बैसवित निजासनी ॥४७॥
राम वोळला परमानंद । झाला त्रैलोक्यां आनंद ।
एका जनार्दनी स्वानंद । नित्यानंद रामायणीं ॥४८॥
युद्धकांडात आलेली रामकथा :
येथून संपले युद्धकांड । पुढे ऐका उत्तरकांड ।
जनार्दनकृपा अखंड । कांडे कांड अर्थवी ॥४९॥
श्रीरामे जावोनि सुवेळेसी । दुर्गी देखोनि रावणासी ।
बाणे छेदोनि छत्रासी । युद्धकांडासी संपविले ॥५०॥
शिष्ट धाडोनि अंगदासी । सभे गांजून दशमुखासी ।
प्रथम करोनि महारणासी । युद्धकांडासी संपविले ॥५१॥
प्रहस्तादि प्रधानासीं । अतिकायादि कुमारासीं ।
मारोनियां रणभिवेषीं । युद्धकांडासी संपविले ॥५२॥
उठवोनि कुंभकर्णासी । रावण धाडी रणभूमीसी ।
रामे निवटोनियां त्यासी । युद्धकांडासी संपविले ॥५३॥
होम करिता निकुंभिळेसीं । तेथे धाडोनि लक्ष्मणासी ।
रणी मारोनि इंद्रजितासी । युद्धकांडासी संपविले ॥५४॥
द्विवार आणोनि द्रोणाद्रीसी । उठविलें लक्ष्मणा वानरांसी ।
यश देवोनि हनुमंतासी । युद्धकांडासी संपविले ॥५५॥
अहिमहि वीर प्रचंड । होते पाताळी वितंड ।
त्यांते करोनि खंडविखंड । युद्धकांड संपविले ॥५६॥
होम करिता अति वितंड । वानर पाठवोनि प्रचंड ।
युद्धा आणोनि दशमुंड । युद्धकांड संपविले ॥५७॥
रावण योद्धा अति प्रचंड । शिरें प्रसवला उदंड ।
रामे ठेंचोनि त्याचे तोंड । युद्धकांड संपविले ॥५८॥
बाण सोडोनि प्रचंड । रावणाचे गर्वबंड ।
क्षणे करोनि खंडविखंड । युद्धकांड संपविले ॥५९॥
रावणासी करोनि दंड । देव सोडविले उदंड ।
बिभीषण स्थापोनि अखंड । युद्धकांड संपविले ॥६०॥
मुक्ति देवोनि रावणासी । भेटोनि दशरथासी ।
दिव्य घेवोनि सीतेसी । युद्धकांडासी संपविले ॥६१॥
विमानी बैसोनि त्वरेंसीं । केले रामेश्वरनमनासी ।
भेटोनियां अगस्तीसी । युद्धकांडासी संपविले ॥६२॥
भेटोनि भरद्वाजासी । सवेंचि भेटोनि गुहकासी ।
देवोनियां समाधानासी । युद्धकांडासी संपविले ॥६३॥
चौदा वर्षे निराहारेंसी । भरत राहिला नंदिग्रामासीं ।
भेटोनियां स्वबंधूसी । युद्धकांडासी संपविले ॥६४॥
रामे भेटोनि निजमातांसी । केले व्रतविसर्जनासी ।
अंगीकरोनि निजराज्यासी । युद्धकांडासीं संपविले ॥६५॥
यौवराज्य देवोनि भरतासी । सेनानीपण शत्रुघ्नासी ।
सुखी केले कैकयीसी । युद्धकांडासी संपविले ॥६६॥
सुखी केले दासदासींसी । सुखी केले निजप्रजेसी ।
आनंदवोनि निजवाक्येंसीं । युद्धकांडासी संपविले ॥६७॥
संपलें युद्धकांड-निरूपण । पुढे उत्तरकांडकथा गहन ।
एका विनवी जनार्दन । श्रोते सज्ञान परिसोत ॥६८॥
माझी मिरासी मूर्खपण । नेणे पदबंधव्याख्यान ।
माथा हात ठेवोनि जनार्दन । वदवी रामायण निजसत्ता ॥६९॥
जनार्दनाची कृपा ऐशी । मूर्खाहातीं रामायणासीं ।
वदविलें रामकथेसी । कृपा ऐशी संतांची ॥७०॥
सद्गुरूची कृपा घडे । तै पागुळा पर्वत चढे ।
एकनाथें तेणे पाडे । केले रोकडे मज सरतें ॥७१॥
एका जनार्दना शरण । झाले युद्धकांडनिरूपण ।
श्रीरामकथा अति गहन । करी पावन महापापी ॥७२॥
कथा शतकोटिविस्तार । त्यांतील एकैक अक्षर ।
पडता कानी शुद्ध पापी नर । श्रीरामकथाक्षर पुण्यपावन ॥७३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामचरितकथनं नाम द्विनवतितमोऽथ्याय: ॥९२॥
॥ ओंव्या ॥७३॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
युद्धकांडं समाप्तम्
