वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 52. यशोदा संकष्ट चतुर्थी व्रत

यशोदा संकष्ट चतुर्थी

🙏 4. संत नामदेव · ABH-082938 · अभंग क्र. ८२

82.
यशोदा संकष्ट चतुर्थीव्रत

गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु ॥१॥
यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥
गणेश देइल यासी उत्तम गुन । वचन प्रमाण मानावे हे ॥३॥
गजवदनासी तेव्ह म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देई ॥४॥
ऐसे हे वचन ऐकुन कृष्णनाथे । सत्य गणेशाते केले तेह ॥५॥
एक मास खोडी देवे नाही केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥६॥
धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवासी ॥७॥
इंदिराबंधूचा उदय होऊ पाहात । यशोदा करीत पूज-नासी ॥८॥
शर्करमिश्रित लाडू येकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥९॥
ऐसा नैवेद्याचा हारा तो भरुनी । दे-व्हारा नेऊनि ठेवी माता ॥१०॥
मातेसी म्हणत तेव्हा ह्लषिकेशी । लाडू केव्हा देसी मजलागी ॥११॥
यशोदा म्हणत पूजीन गजवदना । नैवेद्य दाऊन देईन तुज ॥१२॥
ऐसे म्हणूनिया माता बाहेर गेली । देव्हार्‍याजवळी हरि होता ॥१३॥
एकांत देखोनी हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥१४॥
घेऊनिया ग्रास उगाची बैसला । भक्तांलागी लीला दावीतसे ॥१५॥
धूप घेवोनिया आली सदनाते । रिता हारा तेथे देखियेला ॥१६॥
विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरीला पुसतसे ॥१७॥
कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते । एक सहस्र उंदीर आले येथे ॥१८॥
त्यांत एक थोर होता तो मूषक । वरी विनायक बैसलासे ॥१९॥
सकळीक लाडू सोंडेने उच-लीले । सर्व आकर्षिले एकदांची ॥२०॥
सर्वांगासी त्याणे चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥२१॥
उंदीर भ्यासुर भ्यालो मी देखून । वळली वदनी बोबडी ते ॥२२॥
न बोलवे कांही माझेनी जननी । क्षुधा मजलायोगी लागलीसे ॥२३॥
लाडू मज देई ह्मणे जनार्दन । माता क्रोधे करून बोलतसे ॥२४॥
माता ह्मणे कृष्णा पाहू तुझे वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥२५॥
हरि ह्मणे माते लाडू ते बहुत । मातील मुखांत कैसे माझ्या ॥२६॥
गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आले विहरण मजवरी ॥२७॥
हरी ह्मणे मज मारू नको माते । तुज वदनाते दावीतो मी ॥२८॥
कृष्ण-नाथे तेव्हा मुख पसरिले । ब्रह्मांडे देखिली मुखामाजी ॥२९॥
असंख्य गणपती दिसती वदनी । पाहातसे नयनी यशोदा ते ॥३०॥
मुखांत गणपति मातेसी बोलत । पूजावे त्वरित हरिलागी ॥३१॥
ऐसे देखोनिया समाधिस्थ होत । चहूंकडे पाहात तटस्थ ते ॥३२॥
योगमाया तेव्हा हरीने घालून । मातेपुढे जाण उभा असे ॥३३॥
यशोदा हरी कडेवरी घेत । मुखाते चुंबित आवडीने ॥३४॥
हरि घेऊनिया घरासी ती गेली । भोजना बैसली नामा ह्मणे ॥३५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग