वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १३, मदालसा अभंग ८४२ ते ८४७

मदालसा म्हणे पुत्रा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074211 · अभंग क्र. ८४७

847.
मदालसा म्हणे पुत्रा तू मुक्त होतासी ।
संसारमायामोहे का रे बद्ध जालासी ।
सिद्ध ते विचारी पा जेणे सुखीया होसी ॥१॥
चेई तू रे तानुलिया जाई श्रीगुरूशरण ।
देहभावी व्यापिलासी मग तुज शिकवील कवण ।
अज्ञानपण सांडूनिया तू चुकवी जन्ममरण ।
गर्भवास वोखटा रे गर्मी दुःख दारूण ॥२॥
जागृती आणि निद्रा तुज स्वप्नी भरू ।
सुषुप्ती वेळोवेळा तुज पडिला विसरु ।
ते जव नेणसी रे तव तुज नाही निर्धारू ॥३॥
देह तव नाशिवंत तू का रे भुललासी ।
अखंड ते विचारी पा जेणे सुखिया होसी ।
दुःख ते आठवी रे गर्मी काय भोगिसी ।
जठराग्नी कृमीकुंडी वेळोवेळा पडसी ॥४॥
कोसलियाने घर रे सुदृढ पै केले ।
रिगुनिगु न विचारिता तेणे सुख मानिले ।
जाहाले बाळा तुज तैसे यातायाती भोगविले ।
मोक्षद्वार चुकलासी सकळही कर्म संचिले ॥५॥
सर्प दर्दुर धरियेला रे मुखी ।
तव तेणे माशी तोंडी धरियेली शेखी ।
तैसा हा मायामोहो तुज का रे नुपेक्षी ।
इंद्रिय व्यापूनिया संसारी सुखी दुःखी ॥६॥
मृग रे जळ जैसे हेलावत पै दिसे ।
तैसी हे भ्रांती माया तुज नाथिली आभासे ।
उत्पत्ती प्रळय दोन्ही ये तरी तुज सरीसे ।
स्थिर होउनी विचारी पा आणिक नाही बा तैसे ॥७॥
मृग पक्षी किटकु पतंगु होसी ।
आक्षेपी संचर रे नाना योनी पावसी ।
पूर्ण ज्ञानसुख जेणे ते तू का रे नेणसी ।
अविनाश तेचि तू रे वाया सबळ का करिसी ॥८॥
परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी ।
अंश रे तू तयाचा सबळ का रे बुद्धि तुझी ।
अज्ञान तुज व्याली ते नव्हे का रे वांझी ।
तेणे तू भुललासी ऐक शिकवण माझी ॥९॥
परतत्त्वा आणी तुज बाळा नाही रे भिन्न ।
अनादि तू आहेसी रे परी हे न देखे मन ।
अकर्म कर्म केले तेणे जाले अज्ञान ।
निष्कर्म होय जेणे ते तू करी का रे ज्ञान ॥१०॥
पुत्र म्हणे वो माते मी अनादि कैसा ।
मी माझे जाणता वो मी अज्ञान कैसा ।
उकलु केवी होय तुज कैसा भरवंसा ।
जीवन्मुक्त होय दृष्टि दाखवी तैसा ॥११॥
पापपुण्य दोन्ही मजसवेंची असती ।
करणी माते थोर त्याची ते आहे चालती ।
उकलु केंवी होय होय ते सांग मजप्रती ।
बुझावी वो माझे माते ऐसी करी विनंति ॥१२॥
केली कर्मे जरी तुवा न सांडिवो पाठी ।
कवण ते प्रकाशील हे विपरीत गोष्टी ।
उकलु केवी होय ते सांग मजप्रती ।
जेणे मी दृढ होय ते बुद्धी देई वो लाठी ॥१३॥
अनंत कर्मे माते घडली वो मज ।
ती तव न संडिती ऐसे ज्ञान पै तुज ।
तरी म्या काय किजे केवी पावणे सहज ।
दुर्घट वाट आहे कैशानी निफजेल काज ॥१४॥
उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड ।
साधु आणि संत जेथे असती बा उदंड ।
तयामाजी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड ।
तो तू गुरू करी तो तुज बुझवील प्रचंड ॥१५॥
ज्ञानविज्ञान रे गुरूमुखे बुझसी ।
विचारूनी अनभऊ आपेआप जाणसी ।
जेणे जाले अनंत सिद्ध ते तू का रे नेणसी ।
हरिहर ब्रह्मादिक तेही ध्याती तयासी ॥१६॥
नव्हता बाळा नादबिंद तै तू रे सहज ।
तेथेंची तू होतासी ऐसे ज्ञान पै तुज ।
तेथे तू लीन होई करी आपुले काज ।
संसार साभिमाने घेई तेथीचे व्याज ॥१७॥
उपजता गर्भ अंधु जया नाही प्रकाशु ।
पूर्वी तो योगभ्रष्ट चुकवी गर्भवासु ।
गुरुवचनी भजे पुत्रा परब्रह्मी करी वासु ।
अमृत सेवी पारे झणी होसी उदासु ॥१८॥
तुज ऐसे रत्न बाळा कवणे रे केले ।
आणिक अनंत जीव चराचर भुतले ।
तेणे रे इच्छामात्रे क्षणामाजी रचिले ।
ते तू रे नेणसीच येवढे कैसे चुकविले ॥१९॥
सांडी बाळा कामक्रोधु हा दुर्जन विचारू ।
जिही तुज अंतरविले त्याचा करी का संहारु ।
गुरुचरणी भजे पुत्रा तो तुज देईल विचारू ।
अविनाशपद पावशी मग तुज होईल निर्धारू ॥२०॥
सहज यम नेम गुरूकृपा रे करी ।
आसने प्राणायामु प्रत्याहार उदरी ।
धारणा होईल तुज मग ध्यान विचारी ।
समाधी होई पुत्रा तू जाण निरंतरी ॥२१॥
षड्चक्रा वेगळे रे ते जाणिजे कैसे ।
अनुभवे जाणसी रे तुज सहजे प्रकाशे ।
तैसा हा ज्ञानयोगु गुरूकृपा रे दिसे ।
अज्ञान निरसूनीया ज्ञान पै समरसे ॥२२॥
अव्यक्त तिही लोकींचे तुजमाजी रे असे ।
त्रैलोक्य जयामाजी तै तुज पै दिसे ।
अविनाशपद होसी मग अज्ञान नासे ।
तुजमाजी अमूर्त रे आपेंआप प्रकाशे ॥२३॥
अव्यक्त अगोचर तुज होईल निरंतर ।
इंद्रिये स्थिर होती हे तुझे अंकुर ।
अविनाशपद होसी मग नाही येरझार ।
अष्टमहासिद्धी जया वोगळती तुझे द्वार ॥२४॥
ऋद्धिसिद्धी मायासिद्धी यासी दिधली ।
तुर्याचिया उपरी रे ज्ञान उन्मनी देखिली ।
आशापाश सबळ माया जीवबुद्धि निमाली ।
गर्भवास चुकला रे कैसी बुद्धी स्फुरली ॥२५॥
संतोषोनी कृपादृष्टी ज्ञान पै लाधविला ।
आत्मतत्त्व बोधु तुज प्रकाशु रे जाला ।
समरसी सोहंसिद्धि प्रबोधु निमाला ।
निवृत्तिप्रसादे रे ज्ञानदेवो बोलिला ॥२६॥

अर्थ :
मदालसा म्हणते हे पुत्रा तू मूळचा ब्रह्मरूप आहेस पण या अनिर्वचनीय संसारमोहाने तुला बद्धतेची भ्रांती झाली आहे. म्हणून नित्यशुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करशील तर दुःखसंबंधरहित आनंदरूप होशील. गर्भात फार दुःख आहे. गर्भवास वाईट आहे. म्हणून श्रीगुरूला शरण हो व अज्ञानाचा नाश करून जन्ममरण चुकव. जर देहच मी आहे. असा तुझा दृढ निश्चय झाला तर तुला उपदेश कोण करील. जागृति स्वप्न व सुषुप्ती यांतच तुझा सर्वकाळ जात असल्याने तुला आत्मस्वरूपाचा विसर पडला व जोपर्यंत ते आत्मस्वरूप तू जाणत नाही. तोपर्यंत तुझा निश्चय होणार नाही. ज्या देहाला तू एवढा भुलला आहेस तो तर नाशवंत आहे. गर्भवासांत किती दुःख भोगलेस त्याची आठवण कर व अखंड म्हणजे सजातीय विजातीय स्वगतभेदशून्य जे ब्रह्म त्याचा निश्चय कर म्हणजे सुखी होशील. नाही तर मलमूत्र जंतूचा ज्यांत साठा आहे अशा गर्भवासात वारंवार जावे लागेल. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्या अंगाभोवती आपणास बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यात सुख मानतो. तसेच तुला ही संचित कर्माचे योगाने मोक्षद्वार चुकवून जन्ममरण भोगविले. बेडूकांला सर्पाने तोंडात धरले असता सुद्धा शेवटपर्यंत तो बेडूक माशी गिळतो व शेवटी सर्पाच्या तोंडांत जातो. तसे संसारांत इंद्रियांनी विषय संपादून सुखदुःख भोगित असता हा मायारूपी मोह तुला ग्रासून टाकील. वस्तुतः नसलेल्या मृगजळांतील पाणी हलल्यासारखे दिसते. तसेच भ्रमाने नसलेली माया तुला दिसते. अंतर्मुखाने विचार केला तर उत्पत्ति प्रलय ही आत्मरूप असून, आत्म्या प्रमाणे परमार्थ सत्य दुसरी वस्तु नाही. मृग, पक्षी, कीटक, पतंग इत्यादी नानायोनीत या योनीतून त्या योनीत हिंडण्यापेक्षा ज्याच्या योगाने संपूर्ण सुख मिळते असे ज्ञान तू का प्राप्त करून घेत नाहीस. असले अविनाश ज्ञानस्वरूप ब्रह्म तूंच आहेस उगीच हेकडपणा का करतोस. परब्रह्म हे तुझे अधिष्ठान असून कल्पनारूपी आईपासून तुझी उत्पत्ती म्हणून तू परमात्म्याचा अंश आहेस नसता जीवपणाचा छंद का घेतोस? ज्या अज्ञानरूपी कल्पनेपासून तुझी उत्पत्ती झाली व जिच्या योगाने तू एवढा मोहून गेला आहेस तो वास्तव विचार केला तर वांझ आहे. हा उपदेश विसरू नको. परमात्म्याहून तू मुळीच भिन्न नाही. पण अकर्म असा जो तू त्याने अज्ञानामुळे कर्म केले असा जो निक्षय होतो. त्यामुळे मी अनादि बह्मरूप आहे असे पटत नाही. पुत्र म्हणतो माते मदालसे, मी अनादि बह्मरूप कसा? मी कोण आहे ? माझे काय आहे? अज्ञानरूपी कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी? जीवन्मुक्त कसा असतो हे मला स्पष्ट, ज्या तऱ्हेने समजेल, असे तुला वाटते, त्या तऱ्हेने मला सांग. तसेच पापपुण्यही मला आहेत व त्यापासून मिळणारा सुखदुःखाचा भोग मला होतो काय? याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांग. अशी आईला विनंती करतो. काही लोक असे म्हणतात की कर्म स्वतः आपले फल देते म्हणून ईश्वराची आवश्यकता नाही परंतु कर्म जड आहे, म्हणून ते स्वतः फल देणे शक्य नाही. हे विपरीत वाटते तेव्हा यावरील शंकेचे पूर्ण समाधान होऊन मी निःशंक होईन अशा तऱ्हेची निक्षयात्मक बुद्धी मला दे. तसेच आई माझे हातून अनंत जन्मांत अनंत कमे झालेली असून जोपर्यंत शरीर संबंध आहे. तोपर्यंत अनंत कमे ही होणारच. म्हणून निष्कर्म होण्याचा मार्ग अत्यंत अवघड झाला आहे. तेव्हा मी काय करावे व माझे हे कार्य सहज कसे होईल याचे ज्ञान तुला आहे. ते मला सांग. मदालसा म्हणाली बाळा, ज्या ठिकाणी साधुसंत राहतात. अशा तीर्थयात्रा कराव्या व त्या संतांत उगीच शब्दपांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्रीगुरूला शरण हो. तो तुझ्या सर्व शंकेचे समाधान करील. मग शब्दज्ञान काय किंवा अनुभवाचे ज्ञान काय हे तुला गुरूकडून यथार्थ समजेल तू विचाराने त्याचा अनुभव घेतलास तर स्वतःलाच ब्रह्मरूपाने जाणशील हरिहर बह्मदेवादि ज्या ज्ञानाची स्तुति करितात, व ज्या ज्ञानाने पुष्कळ लोक उद्धरून गेले ते तुला समजणार नाही काय? ज्यावेळी आकाशादि प्रपंच नव्हता त्यावेळी तू म्हणजे ब्रह्म आपल्या महिम्यामध्ये होतेच. संसाराचा अभिमान धरशील तर तू अशा परमात्म्याला शरण होऊन आपले कार्य करण्याकरिता धर. पूर्वजन्मांत योगभ्रष्ट असल्याने जन्मल्याबरोबर त्याला परमात्म्याचे ज्ञान नसते. एवढ्याकरिता बाळा गुरूवचनावर विश्वास ठेऊन हे ज्ञानामृत पान करून ब्रह्मरूप हो. यांत आळस करू नको. तुझ्यासारखा बुद्धिमान मुलगा अनंत चेतन जीव, अचेतन सृष्टि ज्या परमात्म्याने एका क्षणांत केवळ इच्छेने उत्पन्न केली त्या परमात्म्याला जाणणे एवढी महत्वाची गोष्ट कशी चुकली. ज्यांनी तुला आत्मस्वरूप ज्ञानापासून दूर केले त्या कामक्रोधरूपी दुर्जनांचा विचार सोडून त्यांना ठार कर आणि गुरूचरणसेवेने नाशरहित ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. म्हणजे तुझा आत्मस्वरूपाविषयी निश्चय होईल. गुरूकृपा झाल्यावर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा ही सहज साधून निरंतर समाधी होईल. षट्चक्रावेगळे असणारे परमतत्त्व कसे जाणावे असे वाटेल पण जर तू अनुभव घेण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सहज कळेल त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानस्वरूप होणाचा ज्ञानमार्ग गुरूकृपेनेच समजेल. तिन्ही लोकांत व्याप्त असणारे, परमतत्त्व तुझ्यात आहे, त्या परमतत्त्वांत त्रैलोक्य आहे असे जाणलेस तर त्या अविनाश पदाचे ज्ञान तुला होईल व मग अज्ञानाचा नाश होऊन तुला अधिष्ठान असणारे अमूर्त परमतत्त्व स्वप्रकाशाने प्रकाशीत होईल. ही तुझी इंद्रिये परमतत्त्वाचे अंकूर होतील म्हणजे त्याची प्रवृत्ति विषयांत राहणार नाही. मग तू नित्यमुक्त हो अष्टमहासिद्धी तुझी सेवा करण्यास तत्पर राहून अविनाश पदाला प्राप्त होशील व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटशील. तूर्यावस्थेच्या पलीकडे असणारी उन्मनी म्हणजे ज्ञानस्वरूप तू झाल्यावर रिद्धिसिद्धि व माया ही सर्व तुझ्या ताब्यांत राहतील व ज्या मायेच्या योगाने आशारूपी पाश बळकट होतो. ती जीवबुद्धी नाहीसी झाली काय? माझी बुद्धी चांगली आहे आता पुन्हा गर्भवासाचे नांव नाही. श्रीनिवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज संतोषाने म्हणतात गुरूकृपा दृष्टीने आत्मतत्त्व बोध स्पष्ट झाला व मी ज्ञानरूप झालो. एवढेच नव्हे तर त्या ब्रह्मरसात मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान ही मावळले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग