अकरा खणावरी मंदीर उभ
989.
अकरा खणावरी मंदीर उभविले ।
तेथे एक देखिले रुपेंवीण ॥१॥
त्या न बोलत्यासि बोलावया गेले ।
मीहि न बोलती झाले गे माय ॥२॥
बापरखुमादेविवरेंसि ठकचि पडिले ।
मीचि ठसावले ब्रह्माकारे ॥३॥
अर्थ :
दहा इंद्रिये व मन अशा अकरा तत्त्वांच्या खाणीवर देहरूपी मंदीर उभे केले आहे त्या मंदीरामध्ये रूपरहित आत्मा हा देव आहे. त्याला पाहिले. त्या न बोलणाऱ्या देवासी बोलण्याचा मी प्रयत्न करू लागले. पण तो आत्मा माझेच स्वरूप असल्या मुळे मीही मुकी झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या कृपेने मीच ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला व तोच माझ्या ठिकाणी बाणला. असे माऊली सांगतात.
