वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १०, देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१

आठवी तव तूचि जवळिके

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074872 · अभंग क्र. ३३५

335.
आठवी तव तूचि जवळिके ।
नाठविसी तरी निजसुखे ।
आठव ना विसरु पाहे तव ।
सगुणचि हृदयी एक रया ॥१॥
तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ ।
ध्यानाचा आठऊ असो मना ॥२॥
विसरु पडो संसाराचा ।
आठऊ हो तुझिया रुपाचा ।
येथे नामरुप ठसा हृदयी राहो ॥
जिवाचिया जिवलगा ।
माझिया श्रीरंगा ।
गोडी घेऊनिया द्वैत नाही पाहो रया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला सगुणी सुमनी गुंफिले ।
प्रीति आवडे तो कोंदाटले ।
सुमनी हे विराले ॥४॥
जाली नामरुपी ऐक्यभेटी ।
नामरूप सार जाणोनी ।
जीवन संसारा जाली तुटी रया ॥५॥

अर्थ :
हे श्रीकृष्णा तू स्वरुपाने अंतर्यामी असला तरी ज्या कोणी एखाद्याने तुझे स्मरण केले तर तू त्याच्या जवळच उभा आहेस आणि दुस-या एखाद्याने तुझे स्मरण न केले तरी तू आपल्या स्वरुपाने असतोच, तुझ्या स्वरुपदृष्टीने पाहिले तर स्वरुपाच्या ठिकाणी आठव आणि विसर हे दोन्ही नाहीत. व तुझे चिंतन करु पाहिले तर तुझी सगुण मूर्ति मात्र हृदयामध्ये येते. म्हणून तुझ्या नामाचा, स्वरुपाचा आणि ध्यानाचा नित्य आठव मनामध्ये असावा. आणि संसाराचा मात्र विसर व्हावा, माझ्या जीवाच्या जीवा श्रीरंगा या जन्मामध्ये तुझ्या रुपाचा आठव राहून मनामध्ये तुझे रुप नित्यराहो आणि त्या तुझ्या सगुण रुपाची गोडी घेऊन दुःखरुपी द्वैत, डोळे पाहोत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठला तुझी सगुण मूर्ति जर मनामध्ये राहीली तर ते मनच मनपणा विसरुन जाऊन तुझे रुपच होईल भाविक लोक तुझ्या नामाचा उच्चार करतात. परंतु तुझे व तुझे नामाचे ऐक्य आहे हे त्यांना माहित नसते. परंतु ज्या भक्तांना नाम रुपाच्या एकत्वाचे ज्ञान होऊन तुझी भेट होते. त्या भक्तांना तुझे नाम व रुप हेच जीवनाचे सार आहे असे जाणले असता त्यांच्या संसाराची निवृत्ती होते असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग