निरासि निर्गुण नुमटे
79.
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच । विषयसुख साच नाही नाही ॥१॥
ते रूप गोजिरे कृष्णमूर्ति ठसा । तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥२॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टे । नेतसे वैकुंठा नाम घेता ॥३॥
निवृत्तिसी ध्यान सर्व जनार्दन । वैकुंठ आपण गोपींसंगे ॥४॥
अर्थ:
ते गुणातीत परब्रह्म जे निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा विषयसुखाशी संबंधच येत नाही. हे नाही शब्दाची द्विरोक्ती करुन सांगतात.तेच निर्गुणरुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोपाळांबरोबर त्यांच्या सारखे होऊन खेळ खेळत आहे. ते रुप चित्तात राहते व आपण आपणास पाहते व त्याचे धारण चित्तात करुन नामसाधना करणाऱ्या साधकास वैकुंठात नेते. निवृत्तिनाथ म्हणतात, तो परमात्मा गोपीसंगे राहतो त्याचे ध्यान केले की तो सर्व जनात प्रतित होतो.
