गगन घोटीत उठि पृथ्वी
102.
गगन घोटीत उठि पृथ्वी सगळी दाटी । आपणची पाठी कूर्म जाणा ॥१॥
कासवितुसार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥२॥
उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरी ॥३॥
निवृत्ति सादर हरिरुप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥४॥
अर्थ:
समुद्र मंथनावेळी पर्वताचा व घुसळणीचा भार सहन न झाल्या मुळे पृथ्वी खाली गेली तेंव्हा कासव रुप धरुन पाठीवर पृथ्वी घेऊन तिला आधार दिला. जशी कासवी आपल्या अमृतच्या नजरेने पिल्लांचे पोषण करते तसेच पाठीचा अमृतमय आधार पाठीवर घेऊन पृथ्वीला समुद्रात बुडण्या पासुन वाचवले. तोच कच्छ रुप परमात्मा नंदाघरी कृष्णरुपात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, चराचरात विस्तारलेला तो श्रीधर हरिरुप घेऊन गोकुळात आहे.
