वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

भक्तांहून देवा आवडते

🙏 3. संत तुकाराम · ABH-080607 · अभंग क्र. ३१२०

3120.
भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनी नाही आन दुजे ॥१॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥धृपद॥
सर्वभावे त्याचे सर्वस्वे ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावे ॥२॥
सर्वस्वे त्याचा म्हणवी विकिला । चित्त द्यावे बोला सांगितल्या ॥३॥
तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाही ॥४॥

अर्थ :
देवाला भक्तावाचून त्रिभुवनामधे दुसरे काहीही आवडत नाही हे मी शपथ घेऊन सांगतो आहे. देवाला वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागर आवडत नाही केवळ त्याच्या दासांच्या अंत:करणामध्ये रहाणे त्याला आवडते. अहो दासांनी सर्वभावे त्याला काहीही अर्पण करु दया त्या सर्वाचा तो स्वीकार करुन घेतो आणि नुसते तुळशीदळ जरी त्याला वाहिले तरी त्याचे कोड कौतुक करुन ते देखील देव गोड मानून घेतो. माझ्या मते तर देव भक्ताला विकलाच गेलेला आहे भक्त जे काही सांगतील जे काही काम देतील जे काही बोलतील त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी सांगितलेल्या कामाकडेच तो चित्त देऊन असतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सुखामधे विठ्ठल बांधला गेलेला आहे भक्तांचे कार्य करण्यावाचून विठ्ठलाला दुसरा धर्मच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग