वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

भक्तिचिया चाडा गोकुळ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074888 · अभंग क्र. १६८

168.
भक्तिचिया चाडा गोकुळाशी आला ।
त्याशी गौळणी म्हणती वाल्हा दुल्हा गे माये ॥
आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुरवाडे ।
त्याशी गौळणी खेळविती लाडे कोडे गे माये ॥१॥
गोजरिया कान्हो अपछंद मत्ता पाउली रंगे रंगनाथ ।
दृष्टीचिया डोळा सुख निवडेना मागुते ते वाचा
वर्णावी केवि आता रया ॥धृ॥
अठुले लोळिया ढाळ देती कानी मुक्ते खेवणी हरि श्रवणी ॥
अंतरिचिया सुखा प्रगट दाविती देखा ।
ललाटी झळकती रेखा रत्न जडित पत्रे माथा गे माये ॥२॥
युगबंदु दिधला तैसा दोंदिलु मिरवला ।
नाभिकमळी प्रकाश जाला परमेष्टी ॥
कटितटी कडदोरा साजे त्या सुंदरा ।
वेगु तरु नेपुरा वेदु मानसी वसे गे माये ॥३॥
श्रुतिचेनि समागमे पाउले गोजिरी ।
घागुरली प्रेम नेपुरे कैसी वोप देती ॥
अंदु वाकी वाळे पाय करी बेंबिले ।
मुनिजनांचे सुखसोहंळे पुरवितसे गे माये ॥४॥
ऐसा अपुलिये लीळे आपणासीच खेळे ।
गौळणी भरुनिया डोळे कैशा पाहाताती ॥
अवघे कृष्णरुप भरलेसे मानसी ।
बापरखुमादेविवरेसी मिळोनि गेल्या गे माये ॥५॥

अर्थ :
भक्तांसाठी तो गोकुळाला आला त्याला गौळणी लाडाकोडाने रक्षकर्ता 'वाल्हा दुल्हा' म्हणतात. ते सुखरुप परमात्मतत्व आवडीने कृष्णरुप घेऊन आले त्याला गौळणी लडिवाळपणे खेळवतात. गोजिरा कान्हा म्हणुन त्याला संबोधतात. त्या रंगनाथाच्या पाऊलात रंगुन जातात. असे दृष्टीला त्या पेक्षा जास्त सुख नाही असे त्याचे वर्णन वाचा कशी करेल. अठुळे लोळिया सारखी कर्णभुषणे कांनात घातली आहेत. ते त्यांच्या अंतरीचे सुख प्रगट करुन दाखवतात. कपाळावर गंधरेखा झळकते व माथ्यावर रत्नजडित पिंपळपान डोक्यावर शोभते. कंबरपट्यामुळे कमरेला शोभा आली आहे. तसाच करगोटा ही शोभतो. नाभीकमळात ब्रह्मतेज आहे. अशा कृष्णरुपाचे निंबलोण उतरवावे अशी आस मनाला लागली आहे. पायातील घागुऱ्या व नुपुरांचे आवाज श्रुतीसारखे आहेत. अंदु वाकी सारखे दागिने त्यांने घातले आहेत. वाकडे पाय टाकत चालत आहे. व त्या मुनीजांचे सुखसोहंळे तो पुरवीत आहे. अशा लीला करुन तो आपणाशीच खेळताना पाहुन त्या गोपींचे डोळे भरुन आले आहेत. अशा त्या कृष्णरुपाला गौवळणी डोळे भरुन पाहतात. माझे पिता व रखुमाईचे पती यांच्याशी त्या मिळुन गेल्या आहेत असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग