॥ श्रीएकनाथमहाराजकृत
60.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय साठावा ॥
लवणासुराचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
शत्रुघ्न-लवणासुराचे द्वंद्वयुद्ध :
दाशरथि युद्धा प्रवर्तला । हे देखोनि लवण क्रोधे उंचबळला ।
दंतदाढा रगडू लागला । हात चुरी कटकटा करुनी ॥१॥
लवणासुर म्हणे शत्रुघ्नासी । आता मजपसोनि कोठे जासी ।
कोणे मायेचे पोटी रिघसी । केउता पळसी मंदबुद्धि ॥२॥
द्विजारीचे ऐकोनि वचन । मग तो दाशरथ वीर दारुण ।
काय करिता झाला आपण । शत्रुघ्न लक्षोनि ते काळी ॥३॥
माझ्या भुजांचा पराक्रम गहन । आणि वज्रासारिखा बाण ।
घाये तुझा घेईन प्राण । तंव राक्षसें ताळ घेतला ॥४॥
तो टाकिला शत्रुघ्नावरी । ताळ येता देखोनि अंबरीं ।
दाशरथी वीर धनुर्धारी । बाणे शतखंड वृक्ष केला ॥५॥
सवेंचि दुसरा पादप घेतला । शत्रुघ्नावरी टाकिता झाला ।
अकस्मात येवोनि उरी बैसला । वीर पडला मूर्छित ॥६॥
बाणे खंडन जंव करी । तंव वृक्ष आदळला उरीं ।
शत्रुघ्न पडोनि धरणीवरी । नावेक मूर्छेनें दाटला ॥७॥
शत्रुघ्न पडतांचि मूर्छित । देव झाले हाहाभूत ।
ऋषीश्वर चळचळ कांपत । म्हणती कोण पुरुषार्थ राक्षसाचा ॥८॥
शत्रुघ्नासारिखा वीर रणी । मूर्छित पाडिला रणमेदिनी ।
राक्षस विजयी होवोनी । गर्जोनी उभा ठाकला ॥९॥
राक्षस म्हणे शस्त्रायुधाचे । प्रयोजन नाही येथे साचे ।
मनुष्यमात्र आहार आमुचे । तयावरी शस्त्रे कशाला ॥१०॥
शत्रुघ्न मूर्छित देखोन । राक्षस प्रवेशे स्वभवन ।
ऐसे निमेष एक क्रमिलें जाण । वीर रामानुज ऊठिला ॥११॥
तदनंतरे दिव्य अमोघ शर । करी घेवोनि उत्तम शत्रुघ्न वीर ।
शराचे तेजे अंबर । दैदीप्यमान होऊन ठेले ॥१२॥
वज्रासारिखें मुख जाण । वज्राहूनि वेग गहन ।
मेरुमांदासारिखा कठिण । समरीं वैरी निर्दाळीतसे ॥१३॥
शराअंगी अहिप्रियलेपन । शशीऐसें शोभे वदन ।
वरी रावणारीचे झळकत नाम । तेणे व्योम लखलखित ॥१४॥
काळदंडासमान शर । तेणे शशिसूर्य भयातुर ।
गगनी नक्षत्रे ग्रह क्रूर । धाके थरथर कांपती ॥१५॥
बाणची ध्वनि अति गाढी । धरणी गेली तिरढोविरढी ।
कूर्माची पाठी तडाडी । वृक्षपानझडी तेणे झाली ॥१६॥
देखोनिया सर्व जीवजंत । धाके हाहाकार करित ।
सिद्ध चारण महानुभव संत । अप्सरा कांपत चळचळीं ॥१७॥
ऐसे सकळहीं देव मिळोन । तिही प्रार्थिला चतुरानने ।
बोलते झाले भय दारुण । युगांतासारिखे ओढवले ॥१८॥
आजि होईल प्रळयकाळ । ऐसे ओढवले जगड् व्याळ ।
पूर्वी ऐसे भय सबळ । देखिले नाही पितामहा ॥१९॥
ऐकोनि तयांचें वचन । बोलता झाला चतुरानन ।
ऐका समस्तही मिळोन । सावधान मानसी ॥२०॥
लवणासुरवधाकारणें । ठाण मांडोनि शत्रुघ्ने ।
गुणीं शर चढविला तेणे । सकळांचीं मनें भ्रांत झाली ॥२१॥
लवणासुरवधी तुम्हांसि सुख । देईल दाशरथी वीर देख ।
यालागी मिळोन सकळिक । सावधवृत्तीं रहावे ॥२२॥
सकळा देवांसहित । ब्रह्मदेव आला तेथ ।
जेथे दाशरथीं वीर चढवोनि सीत । ठाण माहेश्वरी मांडिलें ॥२३॥
लवणासुराचा वध व देवादिकांना आनंद :
आकर्ण ओढोनि कानाडी । बाण सोडिला कडाडीं ।
जावोनि लवणासुराचे हृदयपरवडी । भेदोनी रसातळ प्रवेशला ॥२४॥
सवेंचि येवोनियां बाण । शत्रुघ्नभातां प्रवेशला जाण ।
येरीकडे हृदय विदारुन । दैत्य भूमीं पडियेला ॥२५॥
दैत्य पडतांचि भूमीवरी । स्वर्गींहूनियां सुरवरी ।
पुष्पवृष्टि करोनि ते अवसरी । गंधर्वी नृत्य आरंभिले ॥२६॥
अप्सरा नाचती उल्हासे थोर । ऋषींचें फिटले भयशारें ।
त्रैलोक्यी आनंदगजरें । जयजयकार पै केला ॥२७॥
येरीकडे लवणाचा शूळ । प्रवेशता झाला गगनमंडळ ।
क्रमोनि लोकालोक प्रबळ । कैलासासी पै गेला ॥२८॥
सकळ सुरवरांदेखत । शूळ प्रवेशला जेथे पार्वतीकांत ।
श्रीरामानुज विजयान्वित । उल्हास अद्भुत सैन्या झाला ॥२९॥
हर्षे वांटिती साखर । आनंदे नाचती ऋषीश्वर ।
एक पाडतां लवणासुर । त्रैलोक्यी जयजयकार पै झाला ॥३०॥
लवणासुर रणी पडिला । वीरी देवी कैसा देखिला ।
पर्वतकडा लोटला । की उन्मळिला तरुवर ॥३१॥
माथा केश बाबरझोटी । भयानक रुप रुधिर वाहे सृष्टी ।
देखोनि देवांच्या झांकल्या दृष्टी । भ्यासुर मोठी तनु त्याची ॥३२॥
देवंकडून शत्रुघ्नाची प्रशंसा व त्याला वरदान :
सकळ मिळोनि सुरवर । बोलते झाले शत्रुघ्नासमोर ।
म्हणती आश्चर्य देखिले थोर । आजिचें पै समरांगणीं ॥३३॥
भाग्येकरोनि लवणासुर । तुवा निवटिला दुर्धर ।
आजि आमचे पुण्य थोर । राक्षस घोर मारिला ॥३४॥
इंद्रासहित सुरगण । आम्ही सकळही सुप्रसन्न ।
तुज देतों वरदान । महाबाहो राघवानुजा ॥३५॥
विजयीं होई सर्वा ठायी । शत्रुदमनी शक्ति घोर पाही ।
देवांचे वचन ऐकोनि ते समयी । दाशरथी बोलता झाला ॥३६॥
हेचि मधुपुरी नगरी । अति रमणीय यमुनातीरी ।
दैत्यें उद्वस करोनि बहुत काळवरी । मनुष्यें भक्षोनि राहिला ॥३७॥
आता वसे हे नगर । ऐसी कृपा करोनि सत्वर ।
मजही रहावया तुम्ही वर । दिधला पाहिजे स्वामी हो ॥३८॥
राघवानुजाचें ऐकोनि वचन । ऋषी संतोषलें जाण ।
बरवे म्हणोनि वरदान । देते झाले ते समयी ॥३९॥
जे जे हृदयींची उत्कंठा । ते ते पावसी नरश्रेष्ठा ।
तुवा राक्षसा दिधला देशवटा । उपकार मोठा तुवा केला ॥४०॥
सर्व सेनेसहवर्तमान । तू प्रवेशे राजभवन ।
देवा द्विजांचे करी पाळण । सुखसंपन्न होऊनी ॥४१॥
नगरांत प्रवेश व तेथे अकरा वर्षे वास्तव्य :
ऐसे वदोनि शत्रुघ्नासी । देव निघाले स्वर्गासी ।
मागे लवणारीनें सर्व सैन्यासी । प्रवेश केला नगरी त्या ॥४२॥
नगरी प्रवेशला शत्रुघ्न । वधिला लवणासुर दारुण ।
हे ऐकोनि देशांतरींचें जन । गेले होते ते आले ॥४३॥
लोकांसि देवोनियां अभय । मग तो दशरथतनय ।
गृहमंदिरें उभवोनि सुवर्णमय । ब्राह्मणांसि देता झाला ॥४४॥
लवणासुराचें जे वसतिस्थान । ते शत्रुघ्ने केले नूतन ।
हाट हटवाटिया बिदी जाण । वाणी व्यवहारी सधन राहिले ॥४५॥
चहू वर्णाचे लोक । चौ वेदांचे वेदपाठक ।
चहू आश्रमांचे जन अनेक । वस्तिसुख पावते झाले ॥४६॥
नगराभोवतीं उद्यानें । नानापरींचीं पुष्पें वने ।
आर्मवनें मधुवनें । नारिकेळीवनें असंख्य ॥४७॥
रंभा आणि द्राक्षामंडप । जांबळी खर्जुरी चंपक ।
फणस आंवळी कपित्थक । वट अशोक अगणित ॥४८॥
ऐसिये रम्य नगरी । स्वधर्मे राघवानुज राज्य करी ।
द्वादश वर्षे लागता अंतरी । रघुनाथभेटी इच्छिता झाला ॥४९॥
अयोध्या सोडोनि आपणास । क्रमिली येथे वर्षे एकादश ।
वारावें प्रवर्तलें अग्रजभेटीस । जाऊ आता येथोनी ॥५०॥
शत्रुघ्न रामभेटीसाठी निघाला :
ऐसा करोनि निश्चय । काय करी कैकेयीतनय ।
कित्येक सेना घेवोनि जो कौसल्यातनय । तयाचे भेटी निघाला ॥५१॥
उर्वरीत जे सैन्य । ते मधुपुरीस ठेवोनि रक्षण ।
आपण निघाला भेटीलागून । श्रीरामाचे ते काळी ॥५२॥
तदनंतरे तो लवणारी । चालिला जेथ श्रीराम पाळित पुरी ।
बारा वर्षे प्रवर्तल्या अंतरी । थोर उत्साहें निघाला ॥५३॥
सवे घेवोनि अल्प सैन्य । अल्प अश्व अल्प सेवकजन ।
अल्प सवे घेवोनि वारण । किंचित रथ घेतले ॥५४॥
अल्प सैन्येंसहित । दाशरथी मार्ग क्रमित ।
तंव वाल्मीकाश्रम अकस्मात । देखिला मार्गीं ते समयी ॥५५॥
ऋषिआश्रम देखोन । संतोषला दशरथनंदन ।
प्रवेशला वाल्मीकभवन । तयचिया दर्शना ॥५६॥
वाल्मीका करोनि नमस्कार । तद्दिनीं तेथे होवोनि स्थिर ।
मुनीची पूजा घेवोनि नृपवर । स्वस्थासनीं बैसला ॥५७॥
वाल्मीकींनी शत्रुघ्नाची प्रशंसा केली :
तया समयी वाल्मीकमुनी । कथा सांगता झाला दाशरथालागूनी ।
शत सहस्त्र अगणित वाणी । श्रीरामाची चरित्रें ॥५८॥
वाल्मीक म्हणे दाशरथीसी । त्वा वधिले लवणासुरासी ।
हे ऐकोनि संतोष मानसी । बहुसाल मज झाला ॥५९॥
मधुवनी तो लवणासुर । वसतां भक्षिले प्राणी अपार ।
विशेषें भक्षिले ऋषीश्वर । तो त्वा सहज निर्दाळिला ॥६०॥
जगत्रयाचें भय नाशिले । लवणासुरा वधोनि सुखी केले ।
युद्ध करिता म्या देखिले । इंद्रापासीं बैसोनी ॥६१॥
संतुष्टलों तुझिया गुणां । म्हनोनि मूर्घ्नि अवघ्राणोनि जाणा ।
इतुके बोलोनि फळे नाना । विचित्रें आणिली ते काळी ॥६२॥
नानापरींची शत्रुघ्नासी । फळे अर्पोनिया ऋषी ।
मग आरंभिले गायनासी । ते समयी गायकीं ॥६३॥
वीणा मृदंग टाळ मोहरी । वाद्यें वाजताती नानापरी ।
श्रीरामचरित्रें ते अवसरी । गाते झाले गंधर्व ॥६४॥
अयोध्येहूनि केले प्रयाण । श्रीरामे वनवास सेविला जाण ।
तेथोनि वधून रावण । जानकी घेवोन अयोध्ये आला ॥६५॥
ऐसे श्रीरामाचे चरित्र । ऐकोनि शत्रुघ्न मूर्च्छागत ।
क्षणैक होवोनि सावचित्त । पुनरपि ऐकत पै ठेला ॥६६॥
श्रीरामाचे चरित्र पावन । कोटि ब्रह्महत्या करी दहन ।
ऐसे ऐकतेक्षणीं प्रेम । शत्रुघ्नासी दाटले ॥६७॥
सवे सैनिक वीर होते । तयांसी प्रेम दाटले तेथे ।
प्रेमे अवघे झाले नाचते । श्रीरामचरित्रा ऐकोनी ॥६८॥
रावणाचे चरित्र ऐकोन । प्रेमे वीर झाले मग्न ।
इतुके वर्तल्यवरी कथानुसंधान । सावधान अवधारिजे ॥६९॥
तेथून शत्रुघ्न सर्व सेनेसह अयोध्येला निघाला :
क्रमोनियां ते शर्वरी । सेना सज्जोनि ते अवसरी ।
नमस्कार करोनि लवणारी । मुनीस पुसोनी निघाला ॥७०॥
श्रीरामदर्शानची उत्कंठा । मार्गीं चालता दडदडाटा ।
इंद्रियनाथहून वेग मोठा । अयोध्येचे शेवटा येते झाले ॥७१॥
ते अयोध्या देखिली कैसी । अमरपुरीहूनि विशेषी ।
कैलास जीचे उपमेसी । तुळणेसी पै नये ॥७२॥
सुवर्णकळसांचिया हारी । रत्नदीप घरोघरी ।
उत्तममध्यमीं हाटक घरी । सुखसंभारीं असिजे हो ॥७३॥
कोणा नाही दुःख दैन्य । घरोघरी श्रीरामकीर्तन ।
श्रीरामकथा श्रीरामगायन । स्वानंदीं मग्न जन वसती ॥७४॥
सूर्यवंशी नृपकेसरी । जयाचे स्मरणे संसार दुरी ।
सकळ जन सहपरिवारी । रावणारी वसे जेथे ॥७५॥
ऐसिये अयोध्येभीतरीं । प्रवेशला तो लवणारी ।
सदना उजू येवोनि ते अवसरी । श्रीरामाची देखिले ॥७६॥
श्रीरामांना वंदन व निवेदन :
करोनिया साष्टांग नमन । चरणांवरी माथा ठेवोन ।
अग्रजें दिधले आलिंगन । समाधान येरयेरा ॥७७॥
लवणारी म्हणे रावणारीस । तुमचे आज्ञेनें मधुपुरीस ।
प्रवेश न करिता पुरद्वारीं राक्षस । पारधीहूनि आला ॥७८॥
तुमचे कृपेंकरुन । नगरद्वारीं देखिला लवण ।
युद्धी त्यासी मोक्ष देवोन । पुरीस प्रवेशन पै केले ॥७९॥
दैत्यभयेंकरोनि पुरी । उद्वस होती मधुनगरी ।
ते वसवोनि द्वादश वर्षांवरी । आम्हांवीण तेथे राहिलों ॥८०॥
तुजवीण रघुनाथा । नावडे मज राज्यपदार्था ।
तुजवीण भोग भोगितां । ते अधःपाताचें मूळ ॥८१॥
जैसे जननीवेगळे बाळक । तैसे येथे मी होतो रंक ।
चंद्रावेगळें चकोर देख । पडे उपवास न देखता ॥८२॥
जैसे रविउपासक जन । न होता सूर्याचे दर्शन ।
तयांसि पडे लंघन जाण । तैसे तुजवीण श्रीरामा ॥८३॥
तुझिये आज्ञेकरुन । केले प्रजेचे पाळण ।
रात्रंदिवस तुझे ध्यान । करितो जाण श्रीरामा ॥८४॥
नित्य अनुदिनी सावकाश । पाहे अयोध्येसी वास ।
युगासमान एक दिवस । ऐसी वर्षे द्वादश कंठिली ॥८५॥
माझा तू आत्मा माझा तू प्राण । माझी मातापिता रघुनंदन ।
माझे गणगोत जानकीरमण । तेथे संशय जाण असेना ॥८६॥
रामांच्या आज्ञेने शत्रुघ्नाचे परत मधुपुरीला गमन :
ऐसे शत्रुघ्नाचें ऐकोनि वचन । मग काय बोलिला धरणिजारमण ।
माझे आज्ञेनें दुष्टदाळण । करोनि यश पावलासी ॥८७॥
विप्रजनां सुख दिधले । सकळ सुरवरा संतुष्ट केले ।
पुनरपि माझे दर्शन घेतलें । यश जोडिले त्रैलोक्यी ॥८८॥
माझे दर्शन झाल्याउपरी । अयोध्ये राहीं सप्त रात्री ।
पुनरपि तू मधुनगरी । जावोनि राज्य करावे ॥८९॥
पद्माक्षीरमणाचें ऐकोनि वचन । मग शत्रुघ्ने सप्त रात्री क्रमून ।
श्रीराममाता अभिवंदून । वसिष्ठा नमन पै केले ॥९०॥
वंदोनि भरतलक्ष्मण । शत्रुघ्ने रथी आरुढोन ।
मधुपुरीस केले गमन । श्रीरामाज्ञा वंदोनि ॥९१॥
भरत लक्ष्मण बोळवीत गेले । ते पुनरपि मुरडोनि अयोध्ये आले ।
तदनंतर काय वर्तले । ते अवधारिजे श्रोते हो ॥९२॥
एका विनवी श्रोते जनार्दना । तुमचे दासाचा दास पोसणा ।
सलगी करितसे चरणा । लागोनियां तुमचिये ॥९३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरघुनाथशत्रुघ्नदर्शनलवणासुरवधो नाम षष्ठितमोऽध्यायः ॥६०॥ ओंव्या ॥९३॥
