वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ५. लंकेत प्रवेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088226 · अभंग क्र. ५

5.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय पाचवा ॥
मारूतीला अशोकवनात सीतेचे दर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचा शांतिहोम :

विघ्नदेखिलें सभेआंत । रावण होम क्री शांत्यर्थ ।
मंदोदरी सेजे गुप्त । देखे हनुमंत एकाकी ॥१॥

मंदोदरीलाच सीता समजून हनुमंताचे विचार व मनोविकार :

ही निश्चये होय सीता । ऐसे मानले हनुमंता ।
तेचि अवधारा पै कथा । श्लोकीं श्लोकार्थ अवधारिजे ॥२॥
विमानी उपराउपरीं । शोधिता एकांत ओवरी ।
रावणाचे सेजेवरी । मंदोदरी देखिली ॥३॥
ठाण माण गुणलक्षण । रूपरेखा स्थान यौवन ।
सीतेसारखी समसमान । दोघी अनुपम्य स्वरूपें ॥४॥
हेचि श्रीरामाची कांता । हेचि माझी स्वामिनी सीता ।
ऐसे मानिलें हनुमंता । उल्लासतां नाचत ॥५॥
हर्षे निजबाहु आफळी । पुच्छा चुंबी सुखमेळी ।
परमानंदे पिटी टाळी । जनकबाळी भेटली ॥६॥
मज जोडली सीताशुद्धी । जाहली श्रीरामकार्यसिद्धी ।
ही जानकी होय त्रिशुद्धी । हर्षानंदी नाचत ॥७॥
आता फिटेल सांकडे । कैसे रावण बापुडे ।
वांकुल्या दावी देवाकडे । वेगे उडे स्वानंदे ॥८॥
हनुमान आनंदें डुल्लत । माझा जाहला निजस्वार्थ ।
मज तुष्टला श्रीरघुनाथ । चुकल अनर्थ वानरा ॥९॥
ऐकता सीताशुद्धाची गोष्टी । श्रीरामासी आनंदकोटी ।
हर्षे माझी पाठी थापटी । सुखसंतुष्टी वानरा ॥१०॥
हर्षे जाता हनुमंत । करोनि रावणे होम समाप्त ।
सेजे आला लंकानाथ । चिंतायुक्त उद्वेगी ॥११॥
देखोनि विघ्नांची पै थोरी । रावणासी भय भारी ।
न उठविता मंदोदरीं सेजेवरी पहुडला ॥१२॥

होम समाप्तीनंतर मंदोदरी रावणाची पूजा करिते :

रावणाचे सांचलेवरी । जागी जाहली मंदोदरी ।
वेगे उठोनि चरण धरी । नमस्कारी सद्‌भावे ॥१३॥
घेवोनि जांबुनदतस्त । पतिचरण प्रक्षाळित ।
ते देखोनि हनुमंत । अत्यद्‌भुत कोपला ॥१४॥

हे दृष्य पाहून मारूतीचा क्षोभ :

माझिया स्वामीची हे कांता । अनुसरली लंकानाथा ।
मी काय उगाचि पाहू आता । करीन घात दोघांच्या ॥१५॥
दाही शिरे लंकानाथा । अकरावा सीतेचा माथा ।
नखे खुडूनियां आता । नेईन रघुनाथा भेटीसीं ॥१६॥
सीता रतली लंकानाथा । त्या दोहींच्या केलिया घाता ।
कोपलिया श्रीरघुनाथा । चरणी माथा ठेवीन ॥१७॥
किंवा जीत पुच्छी बांधोनी । श्रीरामापासीं नेईन दोन्ही ।
मग तो दंडील निजबाणीं । ऐसेंही मनी विचारीं ॥१८॥
अथवा करू आणीक एक । पुच्छी बांधोनि मंचक ।
दोघे किष्किंधे नेलिया देख । दोष निर्दोख राम जाणे ॥१९॥
ऐसे करिता जाण । श्रीरामे सांगितली खूण ।
आधी पाहो पा आपण । नाममहिमान सीतेचे ॥२०॥
सीतेचे स्तंभभिंती लाविता कर्ण । तेथे नुठी रामस्मरण ।
कानी लावितां पाषाण । नामोच्चारण तेथे नाही ॥२१॥
पतिव्रता त्यागितां पती । तेथोनि पळे नामशक्ती ।
सीता सती ते असती । नामकीर्ति मावळली ॥२२॥
सीता रतली अनाचारीं । नाम नुठी चराचरी ।
इसी मी आता जीवे मारीं । आला वानरी अति कोप ॥२३॥
रागे कांपत थरथरां । दात खातसे करकरा ।
डोळे भोवंडी गरगरा । रोम थरथरा थरकती ॥२४॥
दोघा मारावया कडाडीं । वळिली पुच्छाची पै विडी ।
रागे पिंजारिली दाढी । शेंडी तडतडी हनुमंताची ॥२५॥

अविचार करण्यापूर्वी खरे काय आहे ते ठरविण्याचा निश्चय :

कोपामाजी हनुमंत । अतिशयेंसी बुद्धिवंत ।
ऐकता सुलोचनावृत्तांत । इंद्रजित वांचला ॥२६॥
आतांही कोप करू शांत । या दोहींची ऐकों मात ।
विचारोनि शब्दार्थ । निजकार्यार्थ साधावा ॥२७॥

क्रोधाचे परिणाम :

कोप आलिया दुर्धर । जयाचा लोपेना विचार ।
तोचि मोक्षगामी नर । परम धीर तो एक ॥२८॥
कोपामाजी सावधान । अवतारपुरूषाचे हे चिन्ह ।
ते ते चालते ब्रह्मज्ञान । जग पावन त्याचेनि ॥२९॥
लोभ क्रोधांचे कारण । तो हनुमंता नाही जाण ।
यालागी क्रोधी सावधान । रघुनंदनगुरूकृपा ॥३०॥

दोघांचा संवाद. मंदोदरीला पडलेले वाईट स्वप्न :

कपीनें कोप शांत करूनी । दोहींच्या कथा ऐकाव्या कानी ।
राहिलासे गुप्त होऊनी । सावधानीं सादर ॥३१॥
मंदोदरी म्हणे लंकानाथा । दुष्ट स्वप्न म्या देखिले आता ।
तेणे पावले अति आकांता । ते सादरता अवधारी ॥३२॥
ऐसे स्वप्न देखिले नयनी । पडलंके क्रौंचा निर्दाळोनी ।
तो पुरूष निघोन अशोकवनी । श्रीरामपत्‍नी शोधित ॥३३॥
तो रिघतां अशोकवनी । त्रिविध शोक लंकाभुवनीं ।
पुत्रशोक पतिअपमानीं । पुरदहनीं आकांत ॥३४॥
अशोकवनी अति आप्त । केला सीतेंसी एकांत ।
करोनि वनकरांचा घात । समुद्रांत निक्षेपी ॥३५॥
अशोकवनाची खंदळी । तो मारिला जंबुमाळी ।
राक्षसकुमरां करोनि होळी । उपटिली पौळी अखयातें ॥३६॥
सैन्यासी करोनि निःपात । इंद्रजित गेला युद्धाआंत ।
करिता राक्षसांचा घात । भयें पडत मेघनाद ॥३७॥
तो ब्रह्मयाने आणिला बांधोनी । रागे पुच्छातें पेटवोनी ।
तुमच्या दाढ्या मिशा जाळोनी । प्रथम कंदन हे केले ॥३८॥
लंका जाळीत भडभडा । पुच्छे नगरा लाविला वेढा ।
रिघो नेदी मागापुढां । चहूंकडा आकांत ॥३९॥
ऐसे दुष्ट स्वप्न देखोनि । वेगे उठलें गजबजोनी ।
थोर धाक लागला मनी । निद्रा नयनी लागेना ॥४०॥
मग चरणक्षाळण करोनी । शुद्धाचमनातें सेवूनी ।
सदाशिवाला स्मरोनी । डावे कानी निजेलें ॥४१॥
तंव स्वप्न देखिले दुर्धर । शिळीं बांधोनि सागर ।
लंके आले नरवानर । निशाचरनिर्दळणीं ॥४२॥
इंद्रजित कुंभकर्ण दोनी । दोघे मारिले दोघे जणी ।
तुमची शिरे रामबाणी । गिधाचे चरणी लोळती ॥४३॥
रणी निमाला दशानन । माझ्या चुडियां पडले खान ।
ऐशी करितसे रूदन । आक्रंदन उठियेली ॥४४॥
ऐसे सांगता एकाएक । मंदोदरी भुलली देख ।
बैसोनि रावणाचे संमुख । करी शंख अति दुःखे ॥४५॥
बोंब पडली लंकेआंत । रणी निमाला लंकानाथ ।
म्हणोनि महाशब्द करित । तेणे हडबडित रावण ॥४६॥

रावणाकडून मंदोदरीचे सांत्वन :

मग धांवोनि लंकानाथ । तिचे धरिले दोन्ही हात ।
मी तंव आहें जीवे जीत । तू का वृथा तळमळसी ॥४७॥

मंदोदरीची प्रार्थना :

सावध म्हणे लंकानाथा । माझे स्वप्न नव्हे मिथ्या ।
अशोकवनी राहिली सीता । तुमचे घात ते करील ॥४८॥
सख्य करोनि श्रीरघुनाथा । त्यासी संतोषे देइजे सीता ।
तेणे तुज कल्याण लंकानाथा । आणि समस्ता राक्षसा ॥४९॥
मी तंव होते तुमची दासी । म्हणोनि लागले पायांसी ।
भुक्ति मुक्ति होय आम्हासी । सीता रामासी अर्पिलिया ॥५०॥

त्या संवादात सीतेचा पत्ता लागल्याने मारुतीला आनंद व पुढिल बेत :

सीता ऐकता अशोकवनी । हनुमान उल्लासला मनी ।
हर्ष न माया त्रिभुवनी । श्रीरामपत्‍नी चोजवली ॥५१॥
सीता आहे अशोकवनी । अशोकवनिका कोण स्थानी ।
ते समूळ ऐकावया कानी । सावधानी हनुमंत ॥५२॥
रावणमंदोदरी एकांत । समूळ परिसा वृत्तांत ।
गुप्त राहोनि हनुमंत । चित्ती सावचित वचनार्थी ॥५३॥

सीतेच्या नामोच्चारामुळे रावणाचा चित्तक्षोभ :

जानकी आठविता चित्ता । काम खवळला लंकानाथा ।
अशोकवना जाऊनिया आता । बळेंचि सीता भोगिन ॥५४॥
नांठवे सभेचे अति विघ्न । नाठवे मंदोदरीचे स्वप्न ।
सीतासंभोगीं दशानन । अति उद्विग्न कामार्थी ॥५५॥
सहा महिने अशोकवनी । म्या ठेविली जनकनंदिनी ।
आता निजबळेंकरूनी । रामपत्‍नी भोगीन ॥५६॥
सीताकामे सकामता । सन्निपात लंकानाथा ।
विसरला हितहितार्था । नाठवे चित्ता निजस्वार्थ ॥५७॥
सीताचिंता नित्यचिंतनी । सीता नाम नित्य वदनी ।
सीता नाम स्मरे अनुदिनी । ध्यानीं मनी जानकी ॥५८॥
सकाम स्मरता पै सीता । पापधुणी लंकानाथा ।
हे सामर्थ्य श्रीरामभक्तां । भेटी रघुनाथा तिचेनी ॥५९॥
रावणासी सकामता । कळली मंदोदरीची चिंता ।
सीता अर्पावी श्रीरघुनाथा । लंकानाथा नमनेंसीं ॥६०॥
सीता करावी रामार्पण । कदा न मानी दशानन ।
मंदोदरीस कळलें चिन्ह । स्वहितवचन अनुवादे ॥६१॥
मीच जावोनि आपण । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
प्रधानांसी पाचारून । रामार्पण करीन सीता ॥६२॥
सीताकामें रावण वेडें । सांगों नये तयापुढें ।
अर्पिता सीता मज राम जोडे । फिटे साकडे भवाचें ॥६३॥
सखा जोडोनि रघुनंदन । विघ्न ते होय निर्विघ्न ।
चित्त होय चैतन्यघन । दुःख संपूर्ण सुख होय ॥६४॥
श्रेष्ठ सुख तेंचि मरण । मरता स्मरल्या श्रीरामचरण ।
मरण होय ब्रह्म पूर्ण । सुखैकघन श्रीराम ॥६५॥
ऐसेंच मी करीन आता । शरण रिघेन श्रीरघुनाथा ।
स्वये अर्पितांचि सीता । लंकानाथा कल्याण ॥६६॥

रावणानें योजलेली युक्ती :

ऐकता मंदोदरीचे वचन । रावण जाहला अति उद्विग्न ।
प्रिया नव्हे महाविघ्न । सीता हरोन नेऊ पाहे ॥६७॥
मंदोदरीचे वचन । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
नुल्लंघिती अणुप्रमाण । प्रधानजनही अवघे ॥६८॥
मंदोदरीचे वचनार्था । करिती मजही न पुसता ।
इणें हिरोनि नेली सीता । दुःखावस्था रावणा ॥६९॥
अत्यंत खळबळला रावण । करावया मंदोदरीछळण ।
युक्ति करी दशानन । सावधान अवधारा ॥७०॥
विघ्न निरसावया समस्त । अनुसरावया श्रीरघुनाथ ।
आधी पूजूं उमाकांत । कुळदैवत तो आम्हा ॥७१॥
सदाशिवाचे आज्ञेवरी । श्रीरामा अर्पू सीता सुंदरी ।
यापरी छळोनि निजनारी । कार्यांतरीं गोंविली ॥७२॥
रावणे पूजिला श्रीशंकर । मंदोदरीसी हर्ष थोर ।
येरीकडे दशशिर । करी विचार तो ऐका ॥७३॥

आपल्या दासीला पाठविले :

दूतिका पाचारोनि विश्वासी । वेगे जाय अशोकवनासी ।
शरमा आणि त्रिजटेसी । गुप्त त्यांपासी सांगावे ॥७४॥
अति सन्मान इंद्रजिता । जरी तो माझा पढियंता ।
तेणेंही सोडा म्हणता सीता । तुम्ही सर्वथा न सोडावी ॥७५॥
कुंभकर्ण माझा भ्राता । तोही सोडा म्हणता सीता ।
तुम्ही न सोडावी सर्वथा । सोडिल्या घाता करीन मी ॥७६॥
मंदोदरी माझी कांता । आवडती आणि पतिव्रता ।
तिणेंही सोडा म्हणता सीता । तुम्ही सर्वथा न सोडावी ॥७७॥
अति महिमेचा सन्मान । सोडा म्हणता श्रेष्ठ प्रधान ।
तरी न सोडावी आपण । सोडिल्या प्राण घेईन मी ॥७८॥
भट जोशी विद्वांस जन । मज पूज्यत्वें अति सन्मान्य ।
त्यांचेनिही सोडिल्या जाण । तुमचा प्राण घेईन मी ॥७९॥
आलिया स्वर्गींचे देवगण । स्वये आलिया चतुरानन ।
सीता न सोडावी आपण । आज्ञा प्रमाण हे माझी ॥८०॥
ऐसे रावणाचे वचन । ऐकोनिया गुह्य ज्ञान ।
अशोकवना शीघ्र गमन । करी सावधान दूतिका ॥८१॥

त्या दूतिकेच्या मागून मारूती गेला :

दूतिका चालता लगबगे । हनुमान लागला मागेंमागें ।
कृपा केली श्रीरामरंगें । अनुद्वेगें सीताशुद्धि ॥८२॥
दूतिका सवेग चालता । अति उल्लास हनुमंता ।
कृपा केली श्रीरघुनाथा । भेटली सीता अनायासें ॥८३॥
दूतिका चालता पुढे पुढे । हनुमान मागे नाचे उडे ।
हर्षे लोळत गडबडे । कृपा चंद्रचूडें मज केली ॥८४॥
आपआपल्या दावी वांकुली । आपआपणा करी गुदगुली ।
सीता माझी निजमाऊली । ती भेटली अनायासें ॥८५॥
मंदोदरी रावणे छळिली । तै रघुनाथे मज कृपा केली ।
सीता माझी निजमाऊली । मज भेटविली अनायासें ॥८६॥
रावणाचा उपकार । आजी मज घडला थोर ।
न शोधिता अति दुस्तर । सीता सुंदर भेटली ॥८७॥
ऐशा हर्षाचेनि पूरे । हनुमान चालिला अति गजरें ।
पुढे अशोकवन अति साजिरे । स्वये वानरे देखिले ॥८८॥
श्रीरामाची निजपत्‍नी । सीता नाही शोकस्थानीं ।
नित्य वसे अशोकवनी । हे सत्य मानी हनुमंत ॥८९॥

सीता व अशोकवन :

सोडोनि अशोकवनाची गती । सीता शोधिता शोकाप्रती ।
अशोकवनी सीतेची वस्ती । नित्य मारूती स्वये मानी ॥९०॥
अशोक सीतेचे चरणी । अशोक सीतेचे दर्शनी ।
अशोक सीतेचे नयनी । सत्य मानी मारूती ॥९१॥
अशोक सीतेचे वचनी । अशोक सीतेचे स्मरणी ।
सीता वसे अशोकवनी । सत्य मानी मारूती ॥९२॥
अशोक सीतेच्या अंगुष्ठी । अशोक सीतेच्या पोटी ।
अशोकीं वसे सीता गोरटी । मानी जगजेठी हनुमंत ॥९३॥
अशोकवस्ती सीतेच्या पोटी । अशोकीं वसे सीता गोरटी ।
अशोक सीतेचे निजपृष्ठीं । अशोक सृष्टी सीतेनें ॥९४॥
रावणे आणिले हिरोनी । शोक न देखे तिचेनी ।
तेणे ठेविली अशोकवनी । श्रीरामपत्‍नी अशोक ॥९५॥
होता अशोकाची वस्ती । सकळ शोका जाहली शांती ।
अशोकवन त्यालागीं म्हणती । मानी मारूती निश्चये ॥९६॥

सीतेच्या दर्शनाने मारुतीला झालेला हर्ष :

परम आल्हादा हनुमंता । आला अशोकवनाआंतौता ।
सीता देखोनि हर्षयुक्ता । उल्लासत स्वानंदे ॥९७॥
सीता देखतांचि जाण । हनुमान घाली लोटांगण ।
रामनाम स्मरती पाषाण । अणु रेणु तृण राम जपती ॥९८॥
वृक्षांची पाने वातगती । रामनामे दुमदुमती ।
धरा रामस्मरणीं गर्जती । सीता सती ही होय ॥९९॥
तेथे करितांचि आचमन । श्रीरामे स्वादिष्ठ जीवन ।
मंद सुगंध लागता पवन । होते संपूर्ण रामनामे ॥१००॥
सावध पाहता साचार । रामनामे गर्जे अंबर ।
सीता सती ही सुंदर । सत्य वानर स्वये मानी ॥१०१॥
जेथे हरिभक्तांची वस्ती । नाम कोंदे पंचभूती ।
नामे ओसंडता क्षिती । सीता सती ही होय ॥१०२॥
रामे सांगितली खूण । ती तेथे बाणली संपूर्ण ।
नामे गर्जताहे तृण । वृक्ष पाषाण नामेंसी ॥१०३॥
एकाजनार्दना शरण । नामे जीवन नामे दहन ।
नाम पावन नाम गहन । नामे त्रिभुवन कोंदले ॥१०४॥
॥ स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमदशोकवनप्रवेशजानकीदर्शनं नाम पंचमोऽध्यायः ॥
॥ ओव्या १०४ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १०४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग