वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ५९. शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088291 · अभंग क्र. ५९

59.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एकूणसाठावा ॥
शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिलें प्रसंगीं शत्रुघ्नासी । अभिषेकोनि मधुपुरीसीं ।
पाठवितसे लवणासुरासी । वधावयाकरणें ॥१॥

शत्रुघ्नाला युद्धनीतीची शिकवण :

श्रीराम म्हणे शत्रुघ्ना । सवे घेईं असंख्य धना ।
धान्याचा संग्रह करोनि जाणा । मार्गक्रमण करावी ॥२॥
अश्व उत्तम अनेक । सर्वे घेईं असंख्य ।
रथ कुंजर सेना सेवक । नृत्यकारक तेही नेई ॥३॥
जे मार्गीं चालता श्रमलियासी । गीत विनोद करिती संतोषीं ।
आप्तवर्गसेवकांसीं । धन बहुत पै द्यावे ॥४॥
मार्गीं वैरियासी कळो न द्यावे । हळू हळू सैन्य पाठवावे ।
आपण स्थिर होवोनि जावे । उत्तम मार्ग पाहोनी ॥५॥
एकाएकी मधुपुरीस जाण । धाडी घालोनि आपण ।
करी लवणासुराचें निर्दळण । अन्यहस्तें मरण त्यासी नाही ॥६॥
आपण जावोनि मधुपुरीसी । कळो न द्यावे त्या दैत्यासी ।
एकाएकी पाचरीं संग्रामासी । सावध मानसी होवोनी ॥७॥
जान्हवीचे तीरीं । सेना नेई बा झडकरी ।
एक मास मार्ग क्रमोनि वैरी । दुश्चित करोनि मारावा ॥८॥
वरदबळें तो अति लाठा । तया कळो नेदीं वीरसुभाटा ।
मग एकाएकी मोक्षपुरीचा वाटा । रणरंगीं लावावा ॥९॥

शत्रुघ्न युद्धार्थ निघाला :

ऐकोनिया श्रीरामवचन । शत्रुघ्ने वंदोनि श्रीरामचरण ।
रघुनाथा करोनि प्रदक्षिणा । माता जाण वंदिल्या ॥१०॥
सद्गुरु जो का वसिष्ठ । तयासि वंदोनियां स्पष्ट ।
लक्ष्मण आणि भरत ज्येष्ठ । तया नमन पै केले ॥११॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरी । शत्रुघ्ने तया अवसरी ।
प्रयाण करोनि पुरीबाहेरी । सेनासहित उतरला ॥१२॥
तो शत्रुघ्न वीर कैसा । वैरितमनाशनीं सूर्य जैसा ।
पुढे चालिला धरोनि जयाशा । लवणासुरवधाची ॥१३॥
सन्नद्ध सेना दळभार । सवे सैनिकवीर अपार ।
तया पुढे करोनि शत्रुघ्न वीर । मागे आपण चालिला ॥१४॥
सेना करोनि पुढारी । शत्रुघ्ने मार्ग क्रमोनि मासवरी ।
सवेंचि सत्वर दो दिवसांभीतरीं । मधुपुरीस येता झाला ॥१५॥

शत्रुघ्नाचे वाल्मीकाश्रमास आगमन :

तंव त्या मार्गी वाल्मिकाश्रम । तेथे आला ज्येष्ठ बंधु जयाचा राम ।
सवे सेवक आज्ञाधर परम । पराक्रम जयाचा ॥१६॥
ऐसा वीर दाशरथी । वाल्मीकाच्या आश्रमाप्रती ।
येवोनि ऋषींस विनंती । कर जोडून पै केली ॥१७॥
अग ये स्वामी वाल्मीकमुनी । तुम्ही परोपकारी जनांलागोनीं ।
तुमच्या दर्शने कृतार्थ प्राणी । जे यमनियमी शिणताती ॥१८॥
तुमचे आश्रमी आजि निशी । क्रमोनि उदयिक प्राचीदिशेसी ।
जाणे आहे कर्तव्यकार्यासी । म्हणोनि तुमच्या दर्शने सुखी झालों ॥१९॥
ऐकोनि शत्रुघ्नाचें वचन । सुखावला ऋषि संतोषोन ।
प्रेमे दिधले आलिंगन । उल्हासे मन ऋषीचें ॥२०॥
ऋषि म्हणे शत्रुघ्नासी । जे जे नृप सूर्यवंशी ।
तयांचिये वस्तीसी । या आश्रमासी निर्मिलें ॥२१॥
वाल्मीक म्हणे दशरथात्मजा । माझी अंगीकारिजे पूजा ।
मग अर्पिली फळे मूळे वोजा । श्रीरामराजसुखार्थ ॥२२॥
करोनि मुनीचें पूजन । मग बोलता झाला शत्रुघ्न ।
दोनी करकमळ जोडून । वाल्मीकासी ते काळी ॥२३॥
पूर्वील यज्ञींच्या विभूती । वाल्मीकमुनि कोठे असती ।
ऐकोनि वाल्मीक शत्रुघ्नाप्रती । बोलता झाला ते समयी ॥२४॥
अगा ये शत्रुघ्ना अवधारी । पूर्वी येथे याग केला त्याची नवलपरी ।
सौदासनामें राजा पृथ्वीवरी । तयाचे पुत्राचे वीर्यजस हो नाम ॥२५॥
वीर्यजन सौदासाचा पुत्र । अति धार्मिक गुणवंत ।
प्रतापें परवीरा अंत । भुजबळे करी ऐसा ॥२६॥
सौदासपुत्र शौर्यसंपन्न । निघाला पारधीलागून ।
तंव दोघे राक्षस दारुण । मृग मारिता देखिले ॥२७॥
शार्दूळरुपें राक्षस घोर । देखोनि सौदासपुत्रा क्रोध थोर ।
त्यासी युद्ध करोनि घोर । राक्षस एक मारिला ॥२८॥
मुष्टिघातेंकरोनि जाण । सौदासपुत्रें असुराचा घेतला प्राण ।
तयाचे साह्यालागोन । दुसरा राक्षस धांविन्नला ॥२९॥
तो राक्षस म्हणे वीर्यजसासी । निरपराधे माझे बंधूसी ।
मारोनि तू कोठे जासी । तुझ्या प्राणासी मी घेईन ॥३०॥

त्या राक्षसबंधूची सूड घेण्याची प्रतिज्ञा :

माझे बंधूसीं करोनि रण । निरपराधें घेतला प्राण ।
त्याचा सूड मी घेईन । अवकाशकाळें राजेंद्रा ॥३१॥
ऐसे राक्षस बोलिल्यावरी । मग सौदासपुत्र नृपकेसरी ।
येवोनि माझे आश्रमाअरवरी । अश्वमेध मांडिला ॥३२॥
अश्वमेध महायज्ञ । आरंभिला वसिष्ठा पाचारुन ।
राये यक्षदीक्षा घेवोन । बहु सहस्त्र वर्षे पै झाली ॥३३॥
यज्ञसमाप्तीचे अंतीं । पूर्व वैर स्मरोनि राक्षस निश्चिती ।
येता झाला वसिष्ठरुपाची बुंथी । घेवोनिया ते काळी ॥३४॥
वसिष्ठाचे रुप धारोन । आला राक्षस कपटी जाण ।
रायसि म्हणता झाला आपण । मांसभोजन मज दीजे ॥३५॥
यज्ञसमाप्तीचे अंतीं । मांसभोजन मज करी तृप्ती ।
ऐसे वचन ऐकोनि नृपती । पाककर्त्या आज्ञा केली ॥३६॥
आजि वसिष्ठतृप्यर्थी । करी मांसाची पाकनिष्पत्ती ।
येरें आज्ञा वंदोनि शीघ्रगती । विचार करिता पै झाला ॥३७॥
येरीकडे राक्षस मायवी जाण । भाणवसां गेला नरमांस घेउन ।
सवेग पाकनिष्पत्ति करुन । रायाजवळी देता झाला ॥३८॥
अहो जी राया मांस मिष्टान्न । याचा स्वाद अति गहन ।
वसिष्ठा देवोनि तृप्तिभोजन । आशीर्वचन पै घ्यावे ॥३९॥
ऐसे करोनि रजनीचर । सवेंचि प्रवेशला वन घोर ।
येरीकडे नृपें सत्वर । वसिष्ठा भोजना पाचारिलें ॥४०॥

मांसभक्षण घडल्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप व उःशाप :

वसिष्ठासि करोनि आदर । भोजनी बैसवी नृपवर ।
ऋषीनें जाणोनि नरमांसविचार । रायासि शापिता पै झाला ॥४१॥
सक्रोध उंचबळोनि । म्हणे भला रे राया मजलागूनी ।
नरमांस देतोसी भोजनी । म्हणोनि शाप दीधला ॥४२॥
मज करविसी नरमांसभोजन । तो तू होसी मांसभक्षक जाण ।
ऐसा राये शाप ऐकोन । स्रियेसहित विनविता झाला ॥४३॥
म्हणे स्वामी वसिष्ठमुनी । तुमचे आज्ञेकरूनी ।
मांस मागितले म्हणोनी । ब्रह्मऋषे म्या दिधले ॥४४॥
ऐकोनि रायाचे विनीत वचन । क्षण एक वसिष्ठ धरोनि ध्यान ।
कळो सरले राक्षस मायावी शापसी । येवढे विंदान पै केले ॥४५॥
तंव वसिष्ठ म्हणे रायासी । द्वादश वर्षे क्रमिलिया शापसी ।
निष्कृति होईल तुझ्या देहासी । आनंदते पावसील ॥४६॥
पूर्वील शापस्तव कर्म जाण । तयाची तुज न होईल आठवण ।
शापापासोन राया सुटोन । प्रजापाळण स्वधर्मे करिसी ॥४७॥
ऐसा वसिष्ठशापें भूपती । शाप पावला शत्रुघ्ना तुजप्रती ।
म्या कथा सांगितली संकळिती । तयाचे यज्ञस्थळ पै हे ॥४८॥
माझ्या आश्रमासमीप जाण । येथे करीत होता यज्ञ ।
तंव तो राक्षस येऊन । विघ्न केले शेवटी ॥४९॥
ऐसा वीर दाशरथी । कथा ऐकोनि सुखावला चित्ती ।
सवेंचि अस्ता गेला गभस्ती । निशाप्राप्ती पै झाली ॥५०॥
पर्णशाळेसि शत्रुघ्न । केले सतां सुखें शयन ।
प्रहरद्वय शर्वरी क्रमिल्या जाण । तंव वाल्मीकाश्रमीं नवल झाले ॥५१॥

सीता प्रसूत होऊन तिला दोन पुत्र झाले :

सीता होती गर्भवती । तियेसी झाली प्रसूती ।
पुत्रद्वय उपजले राती । बाळचंद्रासारिखे ॥५२॥
ऋषिपुत्रें मिळोनि जाण । वाल्मीकासी जाणवून ।
तंव सत्वर वाल्मीके येऊन । जातकर्म करिता झाला ॥५३॥
वाल्मीके कुश घेवोन । जातकर्मातें करोन ।
पहिल्या पुत्रा नामाभिधान । कुश ऐसे ठेविले ॥५४॥
दुस-या नाम लव ऐसे । ठेविले ऋषीं परमपुरुषें ।
वर देता झाला तुमची यशें । भुवनत्रयीं विकासती ॥५५॥
रक्षा करोनि बाळकांसी । सवेंचि जाणविलें शत्रुघ्नासी ।
येरें येवोनि उल्हासेंसीं । बाळकांसी पाहिले ॥५६॥
तेथे क्रमोनियां निशी । उदय होता गरुडाग्रजासी ।
पूर्वाण्हिक करोनि वाल्मीकासी । नमस्कारोनि निघाला ॥५७॥
तो शत्रुघ्न यमुनातीरी । सप्त रात्री क्रमोनि मार्गीं ।
ऋषिआश्रमीं तया प्रसंगीं । हळू हळू काळ क्रमितसे ॥५८॥

शत्रुघ्नाचे च्यवनऋषींच्या आश्रमात आगमन :

तंव देखिला च्यवनाश्रम । अति रमणीय पावन परम ।
तेथे वसती ऋषिसत्तम । तपोधन तेजस्वी ॥५९॥
च्यवनाश्रमीं करोनि वस्ती । ऋषीस नमन साष्टांगें करी विनंती ।
लवणासुराची बळशक्ती । मजप्रती सांगावी ॥६०॥
ऐकोनि दाशरथीचें वचन । बोलता झाला ऋषि च्यवन ।
म्हणे शत्रुघ्ना सावधान । लवणाख्यान अवधारी ॥६१॥
तेणे शूळबळेंकरुन । मारिले ऋषि तपोधन ।
निवटिले राक्षस दारुण । प्राणिजन पीडिले ॥६२॥

मांधात्याची कथा :

पूर्वी अयोध्यानगरीचे ठायी । इक्श्वाकुकुळींचा युवानाश्व पाही ।
तयाचा पुत्र मांधाता लोकयात्रीं । विख्यात अति प्रसिद्ध ॥६३॥
तेणे पृथ्वी वश करुन । राज्य करिता झाला आपण ।
कोणे एके काळी स्वर्गा गमन । सुरलोक घ्यावया निघाला ॥६४॥
सर्व सेना असंख्य वीर । कोट्यानुकोटि कुंजर ।
अगणित घेतले रहंवर । इंद्रलोकअभिलाषार्थ ॥६५॥
शचीपतीचें राज्य घेईन । ऐसी उत्कंठा धरोनि मनें । प्
पातला अमरावतीस जाण । इंद्रासनीं बैसावया ॥६६॥
ते पाकशासने जाणोन । बुद्धयाच मांधात्या प्रतिवचन ।
बोलता झाला गुणसंपन्न । सावकाश अवधारा ॥६७॥
अहो जी रविवंशनृपती । तुमची मृत्युलोकी वस्ती ।
ते वश न करिता स्वर्गप्रती । काय कारणे आलांती ॥६८॥
आधी मृत्युलोक वश करुन । मग घ्यावें सुरसदन ।
ऐसे ऐकोनि मांधाता जाण । क्रोधे संपूर्ण खवळला ॥६९॥
म्हणे अगा ये शचीपती । मज कोण वश नाही नृपती ।
ते मज सांगे गा शीघ्रगती । नाही तरी दंड करीन ॥७०॥
इंद्र म्हणे लवणासुर । जेणे बळकाविलें मधुपुर ।
तुमच्या देशासमीप नगर । त्यांसी कांही न चले तुमचे ॥७१॥
तो नाही तुमच्या अधीन । तो न जिंतितां इच्छितां स्वर्गभुवन ।
तंव मांधाता लज्जायमान । होवोनि समौन तटस्थ ॥७२॥
लवणासुराचे शिक्षेसी । मांधाता धाडी दूतांसी ।
असुरें भक्षिले तयासीं । ऐकोनि क्रोधासी मांधाता चढला ॥७३॥
तैसाचि उठोनि सूर्यवंशी वीर । प्रवेशता झाला मधुपुर ।
युद्धा पाचरोनि लवणासुर । संग्राम घोर मांडिला ॥७४॥
मांधाता आणि लवणासुर । संग्राम करिते झाले घोर ।
लवणें शूळ टकोनि सत्वर । मांधाता जीवे मारिला ॥७५॥
राजा निवटिला रणी । सैन पडिले रणमेदिनी ।
लवणासुर विजयी होवोनी । मधुपुरीसी प्रवेशला ॥७६॥
शत्रुघ्ना शूळेंकरुन । तेणे मारिले वीर दारुण ।
आतांच युद्धालागीं जाण । मधुपुरीस नव जावे ॥७७॥
शूळ नाही लवणाकरीं । ऐसे जाणोनि युद्धा पाचारीं ।
मग तया जिंतोनि विजयकरीं । गुढी उभवी राजकुमरा ॥७८॥
रुद्रहस्तींचा शूळ कठोर । मधूने प्रसन्न केला कर्पूरगौर ।
तयाचा शूळ आणि वर । प्राप्त झाला मधूसी ॥७९॥
तो शूळ मधूनें लावणासुरातें । दिधला शत्रुघ्ना निश्चिते ।
त्याचा मृत्यु तुझेनि हाते । जाण उदयिक होईल ॥८०॥
शत्रुघ्ने तेथे क्रमोनि निशी । उदय होता गभस्तीसी ।
मनस्कारोनि च्यवनासी । प्रयाण करिता पै झाला ॥८१॥

शत्रुघ्न मधुपुरीस आला त्या वेळी प्रातःकाळीच
लवणासुर शिकारीला बाहेर गेला होता :

जे उतरोनि यमुनातीर । मार्गी चालता शत्रुघ्न वीर ।
लोटलें जी दोन प्रहर । ते समयी मधुपुर पावला ॥८२॥
मग येवोनि नगरद्वारीं । शस्त्रेंसीं शत्रुघ्न ते असवरीं ।
तिष्ठत राहिल्याउपरी । येरीकडे काय वर्तले ॥८३॥
मधुपुरें काय केले । प्रातःकाळी उठोन वन सेविले ।
पारधी खेळतां मारिले चितळे । मृग व्याघ्र असंख्यात ॥८४॥
मारोनि श्वापदांच्या थाटी । वनी भक्षी उठाउठी ।
कित्येकांचा भार बांधोनि पाठी । नगरा उजु मुरडला ॥८५॥
रुधिरें डवरिला असुर । जैसा सेंदुराचा गिरिवर ।
खांदी कावडी सजीव क्रूर । मारोनि मांस घेतलेसें ॥८६॥
जैसा काळ प्रयळकाळीं । जीवमात्राची करी रांगोळी ।
होट न लावितां सगळेंचि गिळी । चाटी अवाळी पुनरपि ॥८७॥

लवणासुर नगराकडे परतला :

ऐसा राक्षस महाक्रूर । खांदी मांस चिथळत रुधिर ।
प्रवेशतां नगरद्वार । तंव शत्रुघ्ने देखिला ॥८८॥
जैसा कुठार धरोनि करी । उभ्या पादपाची करी कांडोरी ।
तैसा लवण राक्षसारी । देखता झाला ते समयी ॥८९॥
लवण म्हणे धनुर्धरा । अनेक शस्त्रांचा करोनि भारा ।
उभा राहिलास चतुरा । आपुले वृत्तांता सांगावे ॥९०॥
म्या भक्षिले अनेक प्राणी । न सांगता गिळीन तुजलागोनी ।
अगा नराधमा झडकरोनी । आपला समाचार सांगावा ॥९१॥

शत्रुघ्नाचे त्याला प्रत्युत्तर :

शत्रुघ्न ऐकोनि राक्षस वचन । बोलता झाला वीरपंचानन ।
म्हणे राक्षसा तुझा घ्यावया प्राण । मी आलो जाण दशरथात्मज ॥९२॥
जेणे मारिले रावण कुंभकर्ण । राज्यीं स्थापिला बिभीषण ।
तो श्रीराम माझा अग्रज जाण । मी तुझा प्राण घेऊ आलो ॥९३॥
शत्रुघ्न नाम पै माझे । आलो असे युद्धाचे व्याजें ।
तुवा थांबोनि युद्ध कीजे । आर्त पुरविजे पै माझे ॥९४॥
शत्रुघ्नाचें कठिन वचन । ऐकोनि हांसे राक्षस जाण ।
म्हणे माझा मातुळ रावण । मजसी युद्ध करु न शके ॥९५॥
त्या रावणासी रामे मारिले । हे अपूर्व श्रवणीं ऐकिलें ।
क्रोधाचें भरिते असे दाटले । तयाच्या वधाकारणें ॥९६॥
तरी प्रथम तुझा वध करणे । मग श्रीरामासी मारणें ।
मातुळाचा सूड घेणे । दिनकरवंश निर्दळूनी ॥९७॥
तरी तिष्ठत रोहें क्षणभरी । मी शस्त्रे आणिन तंववरी ।
येरू म्हणे सांपडल्या वैरी । हातींचा कैसा सोडावा ॥९८॥
आता कैसा जासी मजपासून । निमेषें एका घेईन प्राण ।
ऐसे शत्रुघ्ने बोलोन । बाण गुणीं चढविला ॥९९॥
तुवा मारिले ऋषीश्वर । तापस मारोनियां जाण ।
त्याचा सूड घ्यावया शत्रुघ्नवीर । जाण निर्धार आलासे ॥१००॥
तुज मारोनियां जाण । सुखी करावे मुनिजन ।
मग येथील राज्यसन । रघुनंदन मज देईल ॥१॥
एका जनार्दना शरण । पुढिले प्रसंगी लवणमरण ।
तेणे देव सुखी होतील जाण । आणि तपोधन सुखावती ॥२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
शत्रुघ्नलवणपुरीप्रवेशो नाम नवपंचाशत्तमोऽध्यायः ॥५९॥ ओंव्या ॥१०२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग