शून्य नाही निरशून्य
875.
शून्य नाही निरशून्य नाही ।
तेथे पाळणा पाही लावियेला ॥१॥
जातिवीण बाळ उपजले पाही ।
तेथे परिये देते माय तेही नाही ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठली पाळणा नाही ।
तेथे मी बाळ पाही पहुडलो ॥३॥
अर्थ :
ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही. किंवा निरशून्य म्हणजे मायेचा अभावही नाही. अशा रितीचे जे परमात्मस्वरूप हाच कोणी एक पाळणा परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी आहे. परमात्मस्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यात निजणारा परमात्मस्वरूपच पाहिजे. म्हणून जातिरहित उत्पन्न झालेले बाळक निजलेले आहे. त्या ठिकाणी त्या पाळण्याला झोके देणारी त्याची मायही कोणी नाही. परमात्मस्वरूपाचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यांत निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु या रूपकाने आहे. मा झे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही. अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बाळक होऊन, म्हणजे मुमुक्षु होऊन पहुडलो असे माऊली सांगतात.
