कासया लागला यासी चौघ
1629.
कासया लागला यासी चौघाचार । मुक्तीचा वेव्हार निवडिला ॥१॥
ग्वाही भक्तांची घालूनिया वरी । महजर करी आहे माझ्या ॥धृपद॥
तुम्हा वेगळ्या आपुल्या ठायी । होते करुनि ते ही माझे माझे ॥२॥
भांडण सेवटी जाले एकवट । आता कटकट करू नये ॥३॥
ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आता नसे सत्ता तुज देवा ॥४॥
तुका म्हणे वायाविण खटपटा । राहिलो मी वाटा घेऊनिया ॥५॥
अर्थ :
देवा आम्हीही तुमच्याप्रमाणे मुक्त झालो आहोत, तरी हा निवाडा चारचौघांमध्ये नेण्याचे काय कारण ? देवा आपल्यामध्ये जो करार झाला आहे त्याचे निकाल पत्र माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर भक्तांच्या स्वाक्षऱ्या देखील साक्ष म्हणून आपण घेतल्या आहेत. देवा या भव सागरातील सर्व " मी माझे माझेच " म्हणत होतो त्यामुळे मी व तुम्ही वेगवेगळे आहोत असेच मला भासत होते. देवा आता तुम्ही आणि आम्ही एकच आहोत याचा निकाल पूर्वी लागलेला आहे, तुम्ही आम्ही मुक्त आहोत याचा निकाल पूर्वीच लागलेला आहे त्यामुळे व्यर्थ कटकट आता नको आहे. आम्ही तुमच्या जवळच सेवारूपी ठेवा ठेवला होता तो आता आमच्या हाती लागला आहे त्यामुळे आता त्यावर तुमची सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही कितीही खटपट करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मी माझा वाटा घेऊन मोकळा झालो आहे.
