पूर आला आनंदाचा । ला
339.
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधू विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊ पैल थडी ।
अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥धृपद॥
हे तो नाही सर्वकाळ । अमुप अमृतांचे जळ ॥२॥
तुका म्हणे थोरा पुण्ये । ओघ आला पंथे येणे ॥३॥
अर्थ :
हरी भजनाचा आनंद घेताना आनंदाचा महापूर आला आहे व या महापुरात हरी प्रेमा विषयी लाटा उसळत आहे. या विठ्ठलनामाचे सांगडी आपण आपल्या कमरेला बांधून या भवसागराच्या पलीकडे पोहून जाऊ. अरे माझ्या भाईनो तुम्ही सर्वजण यामध्ये उडी मारा. आता सुदिन पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या भजन नदीत आनंदाने उडी मार येथे अमृत रुपआनंदाचे पाणी कमी पडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्याई आहे त्यामुळे हा भक्तीमार्गाचा ओघ आपल्याकडे आला आहे.
