ढेंकणासी बाज गड । उत
2347.
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळो भाव । आला वाव अंतरीचा ॥धृपद॥
बोरामध्ये वसे अळी । अठोळीच भोवती ॥२॥
पोटासाठी वेची चणे । राजा म्हणे तोंडे मी ॥३॥
बेडकाने चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥
तुका म्हणे ऐसे आहे । काय पाहे त्यांत ते ॥५॥
अर्थ :
ढेकणासाठी बाज म्हणजे एक प्रकारचा गडच आहे त्याच बाजेवर चढण्यासाठी त्याला किती उतारचढ करावी लागते. मनुष्याच्या अंतरंगात कसा भेद आहे त्याच्या अंतरंगात नेमक काय आहे हे त्याच्या बोलण्या चालण्या वरूनच लगेच लक्षात येते. बोरांमध्ये आठवळीच्या भवती आळी असती व त्या आळीला एवढेच आपले जग आहे असे वाटते त्याप्रमाणे देहा विषयी अभिमान असणाऱ्याला देह पुरताच आत्मा मर्यादित आहे असे वाटते. पोटासाठी हरभरा वेचणारा आपल्या तोंडाने मी राजा आहे असे म्हणून घेतो. बेडकाने केवळ चिखलच खावा त्याला समुद्र म्हणजे काय आहे हे कसे कळणार? तुकाराम महाराज म्हणतात मी वर जेवढे काही दृष्टांत उदाहरण सांगितले आहेत तशी प्रत्येक संसारिक मनुष्याची स्थिती आहे परंतु आपल्या देहामध्ये जो सत्य पदार्थ आहे तो सत्य पदार्थ हे संसारिक आपल्या अंतरंगा मध्ये ढोकुन पाहू शकतात काय?
