आता तुज कळेल ते करी
4031.
आता तुज कळेल ते करी । तारिसी तरि तारी मारी । जवळी अथवा दुरी धरी । घाली संसारी अथवा नको ॥१॥
शरण आलो नेणतपणे । भाव आणि भक्ती काहीच नेणे । मतिमंद सर्वज्ञाने । बहु रंक उणे रंकाहुनी ॥धृपद॥
मन स्थिर नाही माझिये हाती । इंद्रिये धावता नावरती । सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाही ॥२॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायी ठेविला जीव । आता करी कळे तो उपाव । तूचि सर्व ठाव माझा देवा ॥३॥
राहिलो धरूनि विश्वास । आधार नेटी तुझी कास । आणीक नेणे मी सायास । तुका म्हणे यास तुझे उचित ॥४॥
अर्थ :
देवा आता तुला जे काही करायचे असेल ते कर मला या भवसमुद्रातून तार अथवा मारुन टाक. तू मला तुझ्याजवळ ठेव अथवा दूर लोट किंवा मला संसारात घाल किंवा घालूही नकोस. देवा मी अज्ञानात तुला शरण आलो आहे भाव आणि भक्ति हे मी काहीच जाणत नाही. देवा मी सर्व ज्ञानाविषयी अतिशय मतिमंद आहे रंकाहूनही खूप उणेपणा माझ्यात असून त्यांच्यापेक्षाही नीच रंक मी आहे. माझे मन स्थिर नाही आणि माझे इंद्रिय माझ्या हातात नाही ते विषयाकडे स्वैरपणे धावतात ते मला काही केल्या आवरत नाही. देवा माझ्या जवळ शांती आणि निवृत्ती नाही त्यामुळे त्यांना आवरण्याविषयी माझ्या सर्व युक्त्या कुंठीत झाल्या आहेत. माझ्या अंत:करणात जे काही होते ते सर्व मी तुझ्यापुढे निवेदन केले आहे आणि माझा जीव तुझ्या पायी ठेवला आहे. देवा तू आता माझा सर्वस्व आहेस माझा तुझ्या ठिकाणी पूर्णपणे आश्रय आहे त्यामुळे तुला जसे वाटेल तसे माझ्या रक्षणासाठी उपाय कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या ठिकाणी पूर्णपणे विश्वास धरुन तुझाच आध
