वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६७. राममहिमा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088194 · अभंग क्र. ६७

67.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सदुसष्टावा ॥
जानकीचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा सर्वत्र जयजयकार :

बिभीषण राज्यधर । देखोनि वानर निशाचर ।
अवघी केला जयजयकार । नामे अपार गर्जती ॥१॥
नामे कोंदलें पाताळ । नामे व्यापिले जगतीतळ ।
नामे कोंदलें नभोमंडळ । ब्रह्मांडगोळ व्यापिला ॥२॥
नामे गर्जती माकडें । वर्णिती रामाचे पवाडे ।
नाचती प्रेमे वाडेंकोडें । बिभीषणापुढे अति प्रीती ॥३॥
श्रीराम दत्त तेजाकार । रावणमुकुट परिकर ।
आणोनि बाणे सुग्रीव वीर । धरिले छत्र रामदत्त ॥४॥
तेणे शोभा अत्यद्‍भुत । बिभीषण राज्यमंडित ।
ते देखोनि सुर समस्त । सुमनें वर्षत अति प्रीती ॥५॥
करोनिया जयजयकार । नामे गर्जती सुरवर ।
नभीं सिद्धांचा जयजयकार । रामचरित्र अनुपंअ ॥६॥

राजा बिभीषण सर्वांसह श्रीरामवंदनासाठीं निघाला :

हनुमंतादि सुग्रीव वीर । सकळ वानरांचा भार ।
बिभीषण राज्यधर । निशाचर समवेत ॥७॥
श्रीरामनामालागीं जाणा । परम आल्हाद बिभीषणा ।
वानरराक्षसांची सेना । समीप घेउनि वंदना चालिला ॥८॥
ध्वजपताकामंडित । मत्तगज अश्वरथ ।
वीर चालिले असंख्यात । अति हरिखत रामनमना ॥९॥
गजस्कंधी बिभीषणा । पाठीसी सखा सौ‍मित्र जाण ।
हनुमान अति विचक्षण । दोही नाही सैन्य सज्जिलें ॥१०॥
यथाक्रमे परिकर । दोही भागीं विचित्र ।
दक्षिणांगीं सुग्रीव वीर । अति मनोहर वेत्रपाणि ॥११॥
वामांगी चालत हनुमंत । जो श्रीरामाचा आप्त ।
श्रीरामाआज्ञा तेथ । पुढे चालत जुत्पती ॥१२॥
वाद्यें विचित्र अति गजरीं । भोंगळा काहळा निशाण भेरी ।
विराणीं वाजती अति कुसरी । ध्वनी विचित्र त्यांमाजी ॥१३॥
वाद्यांचा नाद गंभीर । भाट गर्जती अपार ।
अवघे करिती जयजयकार । आले रघुवीरवंदना ॥१४॥
राज्याभिषिक्त बिभीषण । देखोनिया रघुनंदन ।
आनंद उथळला पूर्ण । तेणे त्रिभुवन कोंदले ॥१५॥

लक्ष्मणाने बिभीषणाला श्रीरामांच्या चरणांवर घातले :

हाती धरोनि बिभीषण । पुढे झाला सुमित्रानंदन ।
श्रीरामचरणा वंदन । करवी आपण अत्यादरें ॥१६॥

स तान्गृहीत्वा दुर्धर्षो राघवाय न्यवेदयत् ।
मांगल्य मंगलं सर्वं लक्ष्मणाय च वीर्यवान् ॥१॥
कृतकार्यं समृद्धार्थं दृष्ट्वा रामो बिभीषणम् ।
यावच्चंद्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी ॥२॥
यावद्रामकथा लोके तावद्राज्यं बिभीषणे ।
प्रतिजग्राह तत्सर्वं तस्यैव प्रियकाम्यया ॥३॥
उवाचेदं वचो रामो हनूमंतं प्लवंगमम् ।
अनुज्ञाप्य महाराजमिमं स्ॐय बिभीषणम् ॥४॥
प्रविश्य नगरी लंकां कुशलं ब्रूहि मैथिलीम् ॥५॥

आनंदित होऊन श्रीरामांनी बिभीषणाला आशीर्वाद दिला :

जैसे श्रीरामाचे मनोगत । तैसे सुमंगल वेदोक्त ।
देखोनिया रघुनाथ । आनंदभरित पै देखा ॥१७॥
अति दुर्धर रावण । क्षणे निवटोनियां जाण ।
अभिषेकिला बिभीषण । श्रीरघुनंदन सुखमय ॥१८॥
राज्यलंकृत बिभीषण । देखोनिया रघुनंदन ।
अति आल्हाद पावोन । आशीर्वचन पै देत ॥१९॥
विपायें ऐसे घडों शके । जै भानूतें तम जिंके ।
तरी बिभीषणा निके । अक्षयी सुखें राज्य भोगी ॥२०॥
चंद्र संतप्त होय आगी । अथवा प्रळय जावो भंगीं ।
तथापि बिभीषणा जगी । अभंग भोगी निजराज्य ॥२१॥
बैसका सांडी कुळाचळा । पृथ्वी जाय रसातळा ।
तरी जो श्रीरामे स्थापिला । तो अक्षयी झाला बिभीषण ॥२२॥
जंववरी श्रीरामकीर्ती । शाश्वत आहे त्रिजगती ।
तंववरी सुखसंवित्ती । अक्षयस्थितीं राज्य करी ॥२३॥
जंववरी श्रीरामनामकीर्ती । जंववरी श्रीरामभक्ती ।
जंववरी श्रीरामाची ख्याती । तंव राज्यस्थिती बिभीषणा ॥२४॥

बिभीषणाला लंकेत नेऊन ही वार्ता जानकीला सांगण्यास रामांनी मारुतीला सांगितले :

ऐसे देवोनि आशीर्वचना । सवेंचि सांगे वायुनंदना ।
हनुमंता सर्वज्ञा । लंकाभुवना नेई यासी ॥२५॥
सप्राकार सतोरण । अति मंडित लंकाभुवन ।
महोत्सवें वायुनंदन । राजा बिभीषण प्रवेशवीं ॥२६॥
निर्दळूनि रावणासी । अभिषेकिले बिभीषणासीं ।
गुढी उभवोनि जानकीसी । हे वार्ता तिसी सांगावी ॥२७॥
ऐकोनिया श्रीरामाज्ञा । उल्लास वायुनंदना ।
मस्तकी वंदोनियां वचना । घाव निशाणा घातला ॥२८॥

सर्वानी वाजतगाजत बिभीषणाला लंकेत नेला :

नळनीळादि जुत्पती । सुग्रीव राजा वानरपती ।
अंगदेंसहित मारुती । अति प्रीती निघाला ॥२९॥
वाद्यें लागलीं विचित्रे । ध्वनि उठला अति गजरें ।
हरिखें नाचती वानरे । माथा पुच्छाग्रें उभवोनी ॥३०॥
उपायनें बळिदाने । राक्षस आणिती सन्मानें ।
प्रीती घालिती लोटांगणें । बिभीषण संतुष्टे ॥३१॥
सुरासुरी यथेष्ट । वानर हावोनियां भाट ।
श्रीरामगुण उद्‌भट । कीर्ति अचाट वर्णिती ॥३२॥
अति गजरें राज्यमंडित । चौघे प्रधान समवेत ।
वानरमांदी अपरिमित । लंकेआंत प्रवेशले ॥३३॥

लंकेत गेल्यावर मारुतीसह बिभीषण सीतेला नमन करण्यास जातो :

प्रवेशोन लंकाभुवन । बिभीषण अति विचक्षण ।
रामांगनेलागीं नमन । करावया आपण चालिला ॥३४॥
प्रवेशोनि अशोकवनी । देखोनिया जनकनंदिनी ।
नमन करावयालागूनी । सकळा मनी उत्साहो ॥३५॥
पुढे देखोनि जानकीसी । सुख दाटले हनुमंतासी ।
लोटांगण अति प्रीतीसी । घालोनि चरणांसीं लागला ॥३६॥

मारुतीला पाहून जानकीला परमानंद , परस्परांचे दृढलिंगन :

देखोनिया हनुमंतासी । अति आल्हाद जानकीसी ।
उचलोनि अति प्रीतीसी । सर्वभावे आलिंगिला ॥३७॥
महार्णवांतून बाळक । सुटोनिया एकाएक ।
मातेंसीं भेटतां आवश्य्क । सप्रेम देख आलिंगी ॥३८॥
तेंवी पुत्रस्नेहें हनुमंता । आलिंगितां जनकदुहिता ।
आनंद दाटला चित्ता । सप्रेमता सद्‌गदित ॥३९॥
श्रीरामभक्ति सुखापुढें । पुत्रस्नेह ते बापुडे ।
जानकिया प्रेमपाडें । निजनिवाडे आलिंगिला ॥४०॥
प्रेमाश्रूकरोनि जाण । हनुमंतासी अभिषिंचन ।
जानकिये करोनि पूर्ण । अमृतहस्तेंकरोनी कुरवाळी ॥४१॥

जानकीला हनुमंताचे प्रांजळ निवेदन :

वंदोनियां चरण । दोन्ही करसंपुट जोडून ।
विनविता झाला आपण । प्रीती करुन हनुमंत ॥४२॥
निर्दाळावया रावण । श्रीरामा आला शरण ।
श्रीरामभजनार्थ जाण । केले निर्दळण स्वकुळाचें ॥४३॥
अति गूढ मारका युक्ती । सांगोनिया श्रीरामाप्रती ।
मारविला लंकापती । विजयी रघुपती जेणे केला ॥४४॥
तो हा राजा बिभीषण । श्रीरामे अभिषेकून आपण ।
तुज करावया नमन । प्रीती करोन पाठविला ॥४५॥
या बिभीषणाचे संगतीं । विजयी तुझा श्रीरघुपती ।
अक्षयी विजयस्थिती । ऊर्मिलापती जाण माते ॥४६॥
विजयी सुग्रीव कपिराजा । विजयी अंगद युवराजा ।
विजयी सेनापति वोजा । विजयी रघुराजा याचेनि ॥४७॥
नळनीळादि जांबवंत । वानरवीर विख्यात ।
रणयोद्धे रणोन्मत्त । विजयी समस्त याचेनी ॥४८॥
ऐसे बोलोनि हनुमंत जाण । हाती धरोनि बिभीषण ।
नमस्कारिले श्रीचरण । प्रीती करोन जानकीचे॥४९॥

जानकीकडून बिभीषणाला प्रेमाश्रूंचे सिंचन,
नंतर सर्व वानरवीरांचे जानकीला नमन :

येरी उचलोनि त्वरित । प्रीती मस्तक अवघ्राणित ।
प्रेमाश्रुसिंचने तेथ । अभिषेकित बिभीषण ॥५०॥
तैसाचि सुग्रीवराजा जाण । हनुमान भेटवी आपण ।
येरी प्रीती उठवोन । केले अवघ्राण मस्तकी ॥५१॥
तंव अंगद पुढे झाला । तोही प्रीतीनें आश्वासिला ।
नीळे नमस्कार केला । कुरवाळिल अमृतहस्तीं ॥५२॥
तंव पुढे झाला जांबवंत । सुषेण दधिमुख तेथ ।
जानकीतें नमस्कारित । अति विनीत रामप्रेमें ॥५३॥
येरी निजकृपा अवलोकन । सकळा देवोन समाधान ।
हनुमंतासी आज्ञापन । केले आपण जानकिये ॥५४॥

प्रथम बिभीषणाला लंकाभुवनात नेण्याची हनुमंताला सीतेची आज्ञा :

श्रीरामे अभिषेकिला । निजराज्य हा पावला ।
अनुग्रहें विराजला । निजभुवना वहिला प्रवेशवी ॥५५॥
लाहोनियां आज्ञापन । हनुमान अत्यंत सज्ञान ।
बिभीषण आपण । राज्यभुवन प्रवेशविलें ॥५६॥
सिंहासनादि सकळ भोग । श्रीरामकृपा अव्यंग ।
बिभीषण पावला सांग । सुख अभंग उथळले ॥५७॥
सर्वथा जे दुष्प्राप्य राज्य । ते श्रीरामकृपा निज ।
बिभीषण पावोनि सहज । नाचत भोज आनंदें ॥५८॥
दुकाळिया जेवी मिष्टान्न । अवर्षणीं वर्षे घन ।
सुकतया अंकुरा जाण । होय संपूर्ण अमृतवृष्टी ॥५९॥
गतायुषा जोडे आयुष्य । रंका इंद्रपद सावकाश ।
तैसे जाले बिभीषणास । श्रीरामास विनटता ॥६०॥

वानरप्रमुखांनी सीतेला नेण्याविषयी मारुतीला सांगितला,
परंतु राजाज्ञा नसल्यामुळे त्याचा नकार :

येरीकडे मारुती । विनविते जाले कपिपती ।
झाली सकळ कार्याची स्थिती । सीता सती नेवों आता ॥६१॥
ऐकोनि तयांचें वचन । हनुमान नेदी प्रतिवचन ।
तेणे खवळले कपिगण । कोल्हाळ संपूर्ण आदरिला ॥६२॥
सकळ भोग आदिकरोनी । राजोपचार देवोनि पाणी ।
पादत्राणही सांडूनी । एकली वनी प्रवेशली ॥६३॥
श्रीरामसेवलागीं देखा । सांडणे केले शरीरसुखा ।
ते जानकी सत्वर देखा । रघुकुळटिळका भेटवावी ॥६४॥
आम्ही विनविता सकळ जन । तू न देसी प्रतिवचन ।
काय तुझे आहे मनोज्ञ । ते संपूर्ण चिन्ह लक्षेना ॥६५॥
तंव भावार्थाचा मेरु । जो आज्ञेचा किंकरु ।
श्रीरामहृत्कमलमधुकरु । हनुमान वीरु विनवित ॥६६॥
स्वमुखें श्रीरघुनाथ । बोलिला नाही इत्थंभूत ।
अथवा नाही संकेत । ते जानकी तेथे आणावी ॥६७॥
याकरितां माझे चित्त । जाले अतिशये भ्रमित ।
कांही योजेना निश्चितार्थ । राहिलों निवांत म्हणवोनी ॥६८॥
नकलतां या अर्थासी । म्या काय सांगावे तुम्हांसी ।
म्हणोनि निवांत मानसी । तंव तुम्हांसी क्षोभ आला ॥६९॥

हे ऐकून जांबुवंत पुढे होऊन रामाची मूकसंमती असल्याचे सांगतो :

याकरितां ऐकोनि वचनार्थ । पुढे जाला जांबवंत ।
लक्षोनिया हनुमंत । स्वये बोलत आवेशे ॥७०॥
हनुमंता सकळाविखीं । तुज व्युत्पत्ति आहे निकी ।
स्त्रीपुरुषांची उखीविखी । अनोळखी ते तुज ॥७१॥
स्वमुखे श्रीरघुपती । केंवी सांगे तुम्हांप्रती ।
मज भेटवावी सीतासती । म्हणोनि काकुळती तंव नये ॥७२॥
आपुलेठायीं आपण । विचार करावा पूर्ण ।
जानकीलागीं रघुनंदन । तनुसंकीर्ण पै झाला ॥७३॥
जीलागीम् वधिला विराधू । खर दूषण त्रिशिरा बंधू ।
त्यांचा क्षणे केला वधू । तो निजवधू केंवी सांडी ॥७४॥
जीलागीं मारीचासी । चर्म काढिले कंचुकीसी ।
जिचेनि उद्धार जटायूसी । त्या जानकीसी केंवी सांडी ॥७५॥
जीलागीं वनोवन । हिंडता झाला रघुनंदन ।
तीतें सांडील आपण । सर्वथा जाण हे न घडे ॥७६॥
वाळी वधोनिया देखा । सुग्रीव जीलागीं केला सखा ।
ते जानकीतें देखा रघुकुळटिळकातें न सांडवे ॥७७॥
तुम्ही आम्ही सकळ वानर । जिचेनि व्याजें श्रीरामकिंकर ।
ते सीता सती सुंदर । श्रीरघुवीर केंवी सांडी ॥७८॥
जिचेनि शुद्धीसी रघुपती । तुंते पाथविलें मारुती ।
शोधिता लंका पालथी । केली निश्चिती जीलागीं ॥७९॥
जीलागीं सागर गांजिला । शिळासेतु बांधिला ।
लंकेचा निरोध केला । रावण वधिला जीलागीं ॥८०॥
जिचेनि सुर तहतीस कोडी । त्यांची सुटली बांधवडी ।
निजराज्याची उभवोनि गुढी । स्थापिला निरवडी बिभीषण ॥८१॥

सीता – रामाची ताबडतोब भेट करावी :

ते सती जनकदुहिता । सांडणे नघडे सर्वथा ।
सावध होई हनुमंता । भेटवी सीता श्रीरामा ॥८२॥
आमचें सेवेचें पै देख । हेंचि फळ अलौकिक ।
दोघा करावया मेळ एक । विचार आणिक असेना ॥८३॥
तिये वेळे निश्चित । स्वये बोलिला श्रीरघुनाथ ।
जानकीये सांगावे हर्षित । जे लंकानाथ निवटिला ॥८४॥
याचे पोटी ध्वनित । बोलोनि गेला रघुनाथ ।
सकळ झाला कार्यार्थ । भेटवा निश्चित जानकी ॥८५॥
हा अर्थ न कळे पै तुज । स्वये झालासि निर्बुज ।
भेटावया रघुराज । जनकात्मजा चालों द्या ॥८६॥
ऐकोनिया ते वचन । हनुमान घाली लोटांगण ।
तुम्हांहूनि अधिक ज्ञान । सर्वथा जाण मज नाही ॥८७॥
बहुतांच्या मनासी आले । ते मज सर्वथा मानले ।
उचित पाहिजे केले । तेंचि वहिले करावे ॥८८॥
हनुमंताचेनि वचनें । हरिखलीं वानरगणें ।
देत नामांची किराणे । रामांगने नेवो पाहती ॥८९॥

विज्ञापयति वैदेहीं सुग्रीवोऽथ प्रणम्य च ।
द्रष्टुमिच्छति भर्ता त्वां रामो धर्मभृतां वरः ॥६॥
सुस्नातालंकृतामेव संयुक्तां प्रतिकर्मणा ॥७॥

बीभीषणादि सर्वजण सीतेला वंदन करुन तिला रावण ठार झाल्याचे सांगतात :

सकळ वानरांचा वर । किष्किंधेचा राज्यधर ।
पुढे होवोनि सुग्रीव वीर । नमन सत्वर पै केले ॥९०॥
अति विनति अत्यंत प्रीती । लोटांगणी पुढतपुढती ।
अति मधुर वचनोक्ती । जानकीप्रती विनवित ॥९१॥
ऐके जानकिये माते । श्रीरामवियोगें व्रतस्थे ।
जाळूनि सांडिलें देहभावातें । श्रीरामाते आठविता ॥९२॥
त्यजिलें अन्न जीवन । त्यजिलें फळभोजन ।
त्यजिले भोग गहन । श्रीरघुनंदनवियोगें ॥९३॥
त्यजिले वस्त्रालंकार । त्यजिले अभ्यंगपरिकर ।
माथा वळला जटाभार । वल्कलांबरपरिधान ॥९४॥
रुधिर शोषलें समस्त । मांस आटले जेथींचें तेथ ।
चर्म झाले अस्थिगत । श्रीरघुनाथवियोगें ॥९५॥
ऐसी उग्र तपश्चर्या । अतिअटक सुरवर्या ।
तेणे तेजे रघुवर्या । संताप सबाह्य झाला असे ॥९६॥
जानकीवियोगविरहें पूर्ण संतप्त रघुनंदन । करोनिया सेतुबंधन ।
वीर रावण निर्दाळिला ॥९७॥

सीताभेटीशिवाय रामांची शांती नाही :

राक्षस कुळनिर्दळण । तुजलागीं केले जाण ।
लंके राजा बिभीषण । झाला संपूर्ण तुझेनि धर्मे ॥९८॥
अति दुर्जय त्रिजगती । विस्तारली श्रीरामकीर्ती ।
तथापि श्रीरामविश्रांती । नपवे निश्चिती तुजवीण ॥९९॥
बिभीषण राज्यधर । प्रवेशला लंकापुर ।
श्रीरामे आज्ञोत्तर । तुज सत्वर पाठविले ॥१००॥
माझे वियोगें गांगली । सीता अत्यंत कष्टली ।
अस्थिमात्र असे उरली । वेडी झाली मजलागी ॥१॥
म्हणवोनियां तुजपासी । वेगे पाठविले आम्हांसी ।
बिभीषण स्थापावा लंकेसी । आणि जानकीसी आणावे ॥२॥

सालंकृत होऊन श्रीरामदर्शनास सत्वर निघावे :

वंदोनि श्रीरामाज्ञापन । विलंब न करावा आपण ।
वेंगी घ्यावें रामदर्शन । म्हणोनि चरणा लागला ॥३॥
करावीं अभ्यंगमार्जनें । दिव्यवस्त्रें परिधानें ।
विचित्र अलंकारभरणे । सुमनचंदने अंगीकारीं॥४॥
स्वामीचिया दर्शनासी । मलिन वेषे केंवी जासी ।
अंगीकारावे विनंतीसी । म्हणोनि चराणांसी लागला ॥५॥

श्रीरामदर्शनाशिवाय तैलाभ्यंजनादि गोष्टीला सीतेचा नकार :

ऐकोनि त्याच्या वचनासी । हांसूं आले जानकीसी ।
जवळी असोन अहर्निशी । रामभजनासी अनोळख ॥६॥
श्रीरामेंविण जे अन्न । ते केवळ विष्ठाभोजन ।
तांबूल ते रुधिरपान । साचार जाण सुग्रीवा ॥७॥
श्रीरामावीण उदकपान । ते मरणप्रद विष दारुण ।
जीवन त्याते म्हणे कोण । सत्य जाण सुग्रीवा ॥८॥
श्रीरामवासावाचून । इतर वास परिधान ।
तेणे व्यभिचार घडला पूर्ण । व्यभिचारिणी ते नारी ॥९॥
श्रीरामतेजाहून इतर । अलंकार जे रत्‍नाकार ।
शरीरी केवळ तो भार । खदिरांगार तैसे ते ॥११०॥
सुमनमाळा परिकर । ते माळा नव्हती सूचिकाग्र ।
अभ्यंग चंदन परिकर । ते लेप साचार विष्ठेचे ॥११॥
ऐसे बोलता जानकीसी । स्वेदाश्रु रोमांच सर्वांगासी ।
जानकीची निष्ठा कैसी । देहांत भोगासी आतळतां ॥१२॥
इतर जे रामसेवक । श्रीराम भजनीं अति दक्ष ।
जानकी त्यांचा आचार्य देख । निष्ठा अलोलिक दाखविली ॥१३॥

सीतेची रामांवरची अतूट निष्ठा पाहून सर्वांनीं तिला लोटांगण घातले :

देखोनि तिच्या निश्चयार्था । आनंद सकळांचियां चित्ता ।
लोटांगणी सादरता । चरणी माथा ठेविला ॥१४॥
श्रीराममहिमा अगाध । तैसीच जानकी अगाधबोध ।
निष्ठा अति विशुद्ध । सामर्थ्य शुद्ध जानकीचे ॥१५॥
ऐसे करोनिया स्तवन । विनविते झाले सकळही जन ।
जैसे तुझे मनोज्ञ । तैसे निर्गमन करी माते ॥१६॥
कायसी आमची युक्ती । जे विनंती करु तुजप्रती ।
जैसी तुझी मनोवृत्ती । तैसिये स्थिती भेट रामा ॥१७॥

पालखीतून रामदर्शनार्थ सीतेने यावे अशी
बिभीषणाची विनंती ऐकून त्याला सीतेचे समर्पक उत्तर :

म्हणोनि राहिलों निवांत । तंव बिभीषण शरणागत ।
शिबिकेसहित आला तेथ । आरोहण तेथे करी माते ॥१८॥
देखोनि त्याच्या आदरासी । जानकी बोले प्रतीतीसी ।
तू जाणता भजनधर्मांसी । व्रत पाहसी तू माझे ॥१९॥
पारखा पायी राम सांपडे । तरी साधक का शिणती बापुडे ।
ऐसे सर्वथा नघडे । जे राम सांपडे परके पायी ॥१२०॥
प्रवहणावरी यात्रा करित । यात्रा श्रेय ते पै नेत ।
कर्ता लटिकाची वल्गत । अभिमान वसत लौकिकी ॥२१॥
श्रीरामाची निजप्राप्ती । प्रवहणाची नलगे गती ।
परपायीं रघुपती । न भेटे निश्चिती कोणाही ॥२२॥
पुढिलाचेनि भोजने । तृप्ति नपवे निजप्राणे ।
तेंवी जाण परचरणें । रघुनंदन भेटेना ॥२३॥
श्रीरामाची अंतरस्थिती । तो केंवी गावे प्रवहणगती ।
म्हणोनिया मुनिपंक्ती । नातळती यानासीं ॥२४॥

असे बोलून सीता पायीच निघाली :

ऐसे बोलोनिया सती । मस्तकांजली विनय वृत्ती ।
उठोनिया अति प्रीती । सहजस्थिती चालिली ॥२५॥
पदसंचाराच्याठायीं । धरे सबाह्य राम पाही ।
देखोनिया लवलाही । देह देही नाठवे ॥२६॥
जेंवी वायूचें चळण । सर्वत्र विचरे गगन ।
परी अंशही नव्हे मिन्न । गगनी गनन होऊन राहे ॥२७॥
जानकीच्या पाउलाची मोहर । लघुत्वें अति अरुवार ।
शून्यत्व सांडोनि साचार । पदसंचार श्रीरामे ॥२८॥
अति अरुवार हंसगती । सवे हरिगणांची संपत्ती ।
शीघ्र आली सुवेळेप्रती । निकटवर्ती श्रीरामा ॥२९॥

श्रीरामदर्शनानें जानकीची झालेली भावावस्था :

देखोनिया श्रीरामचरण । आले जानकींसीं स्फुरण ।
वेळोवेळा बाहुस्फुरण । रोमांची पूर्ण उभविली गुढी ॥१३०॥
अंतरी सुखोर्मी दाटली । ते बाह्य चिद्रत्‍ने प्रकट झाली ।
अंगींची कांचोळी उतटली । पताकी वहिली मंडित ॥३१॥
जेंवी सूर्योदयीं कमळिणी । त्यजोनियां संकोच रजनी ।
अति संतोष विकासनी । दिनमणी देखोनिया ॥३२॥
तेंवी सूर्यवंशदिनमणी । अद्वयाब्जविकासिनी ।
श्रीराम देखोनिया नयनी । जनकनंदिनी विकासत ॥३३॥
सुप्रसन्न मुखकमळ । मुखचंद्र अति निर्मळ ।
टवटवीत तनु सोज्वळ । जनकबाळ सतेज ॥३४॥
होता सूर्याकांतीं वैश्वानर । भासे सकळा गोचर ।
पचनवेव्हार संपादी ॥३५॥
तेंवी देखता रघुत्तम । जानकीची शोभा परम ।
भासे अति मनोरम । विश्रामधाम जगाचें ॥३६॥
पुढे देखोनि राघव । अति आवेशें भरला जीव ।
समर्पीन सर्व भाव । म्हणोनि हाव उथळली ॥३७॥
म्हणे भाग्य आले फळा । षण्मासांचा वियोग गेला ।
नमावया घनसांवळा । जनकबाळा अभिमानली ॥३८॥

सीता समोर येताच रामांनी दुरसीकडे तोंड फिरवले. त्यामुळे सीता दुःखी :

संमुख घालिता लोटांगण । न पाहेचि रघुनंदन ।
पूर्व सांडूनि अपूर्व जाण । करी वदन पश्चिमेकडे ॥३९॥
उठोनि पाहे रामवदन । संमुख न दिसे रघुनंदन ।
स्वये दक्षिणेकडे होऊन । केले नमन श्रीरामा ॥१४०॥
वाम सव्य दश दिशे । नमन करिता आवेशें ।
संमुख राम न दिसे । अति निःश्वासें स्फुंदत ॥४१॥

अथैतां बाष्परुद्धाक्षीं संमुखें नाभ्यलोकयत् ।
अथ सा भूमिजा दुःखस्वरेण महताऽरुद्त ॥८॥
बाष्पव्याकुळताम्राक्षी मध्ये तेषां वनौकसाम् ।
तस्या विलपितं दृष्ट्वा सर्वे ते हरियूथपाः ॥९॥
रुरुदुर्जातसंतापाः शोकव्याकुललोचनाः ।
मुखं वस्त्रेण संच्छाद्य सौ‍मित्रिर्जातसंभ्रमः ॥१०॥

श्रीराममुखदर्शन न झाल्यामुळे सीता स्वतःलाच दोष देऊन विलाप करिते :

अतिदुःखेंकरुनि जाण । अश्रुपूर्ण आरक्त नयन ।
स्फुंदस्फुंदोनि करी रुदन । विमुख रघुनंदन मज झाला ॥४२॥
दीर्घस्वरे आक्रंदत । मज न पाहे रघुनाथ ।
वृथा वांचोनि काय येथ । निंद्य जीवित रामविण ॥४३॥
जेव्हांच वियोग् रामासी । तेव्हांच सांडावे देहासी ।
पापिणी मी ऐसी कैसी । देहभारेंसीं वांचलें ॥४४॥
पृथ्वीयेमाजि पाही । पापें आहेत जी कांही ।
श्रीरामवियोंगें सर्वही । माझ्या देही आदळलीं ॥४५॥
महापातकियाचें मुख । सवर्था राम न पाहे देख ।
मी केंवी आले संमुख । प्राण निःशेख नव्हे माझा ॥४६॥
पापांमाजि महापातक । मज घडले आत्यंतिक ।
सौ‍मित्र शापिला देख । श्रीराम विमुख तेणे झाला ॥४७॥
अत्यंत अनुज आणि सखा । तो म्या अभिशापिला देखा ।
कोण सुख रघुकुळटिळका । कासया मुखा अवलोकी ॥४८॥

जानकीची मूर्च्छा, वानरांमध्ये हाहाकार :

म्हणोनिया दीर्घस्वरीं । आक्रंदतसे सुंदरी ।
स्वये पडता धरेवरी । केला वानरी हाहाकार ॥४९॥
जीलागीं रघुनंदन । हिंडता झाला वनोवन ।
जीवीण न रुचे अन्नजीवन । समुद्रा पालाण जीलागीं ॥१५०॥
लंकेलागीं करोनि पूर्ण । दारुण येथ रणकंदन ।
जीलागीं वधून रावण । राजा बिभीषण जीलागीं केला ॥५१॥
ते जवळी आलिया पाठी । राम न पाहे दृष्टी ।
स्फुंदत पडलीसे गोरटी । श्रीराम पोटी कठिण भारी ॥५२॥

लक्ष्मणही शोकमग्न :

देखोनि जानकीची अवस्था । सौ‍मित्र वोसंडला चित्ता ।
निजपालवें तत्वता । होय झांकिता निजवदन ॥५३॥
पालवें झांकोनियां वदन । सौ‍मित्र करीतसे स्फुंदन ।
अति कठिण रघुनंदन । अंतरचिन्ह कळो नेदी ॥५४॥

श्रीरामांना विनवणी करण्यासाठीं उपस्थितांपैकी सर्वजण व स्वर्गातील देवही तेथे येतात :

श्रीराम नेदी समाधान । तेणे आवेशें पै जाण ।
विनवावया रघुनंदन । अवघेजण सरसावले ॥५५॥
अश्रु परिमार्जुन हातें । जानकीचेनि पक्षें तेथे ।
सकळ दुखावले निजचित्तें । विनवू पाहती श्रीरामा ॥५६॥
तंव स्वर्गीहून अवलीळा । आला सुरगणांचा पाळा ।
सिद्धगंधर्वयक्षमेळा । रघुकुळपाळा विनविती ॥५७॥
एका जनार्दना शरण । जानकी देखोनिया जाण ।
राम झाला उदासीन । कांही वचन बोलेना ॥५८॥
पुढे दिव्य अद्‍भुत । जानकीये घेईल रघुनाथ ।
श्रोती अवधान द्यावे तेथ । कथा अद्‍भुत रामायणीं ॥५९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
जानकीआगमनं नाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥६७॥
ओंव्या ॥१५९॥ श्लोक ॥१०॥ एवं ॥१६९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग