॥ श्रीएकनाथमहाराजकृत
21.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकविसावा ॥
रावण व कुंभकर्ण यांचा संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भयानक कुंभकर्णाला पाहून वानर सैन्याची अस्वस्थता :
प्रबोधोनि कुंभकर्णा । भेटो जाता पै रावणा ।
भय उपजलें वानरगणा । त्याच्या उग्रपणा देखोनी ॥१॥
जगाम तत्रांजलिमालया वृतः शतक्रतुर्गेहमिव स्वयंभुवः ।
तं मेरुशृंगप्रतिमं किरीटिनं स्पृशंतमादित्यमिवात्मतेजसा ॥१॥
वनौकसः प्रेक्ष्य विवृद्धमद्भुतं भयार्दिता दुदुविरे समंततः ।
केचिच्छरण्यं शरणं स्म रामं वज्रांति केचिद्व्यथिताः पतंति ॥२॥
कैविद्दिशश्च त्वरिताः प्रयांति केचिद्भयार्ता भुवि शेरते स्म ॥३॥
मेघांचिया मेघमाळा । शोभती कुंभकर्णाच्या गळा ।
मुकुट टेंकला नभोमंडळा । तेजे रविकळा लोपती ॥२॥
कराळ विक्राळ भयानक वदन । प्रळयतेजें अत्युग्र नयन ।
देखोनि त्याचे भ्यासुरपण । वानरगण त्रासले ॥३॥
उग्र देखोनि कुंभकर्ण । वानर श्रीरामा आले शरण ।
एक पडले मूर्च्छापन्न । एकांचे प्राण निर्बुजले ॥४॥
एकांची वळली बोबडी । एका भरली अरडीदरडी ।
एक पडली उबंडीं । तोंडे कोरडी एकांची ॥५॥
एक वानर त्वरेंकरी । गेले समुद्रपरतीरीं ।
एक झाली रानभरी । एक धरेवरी लवंडली ॥६॥
नावानिगे जे जुत्पत्ती ।वानरवीर भद्रजाती ।
कुंभकर्णाच्या युद्धार्थी । आज्ञा पुसती श्रीरामा ॥७॥
ततो रामो महातेजा धनुरादया वीर्यवान् ।
किरीटिनं महाकायं ददर्शातिभयंकरम् ॥४॥
यं दृष्ट्वा विद्रुता दिग्भ्यो वानराणां महाचमूः ।
सुविस्मितभिदं रामो बिभीषणमुवाच ह ॥५॥
कोयं पर्वतसंकाशः किरीटी हरिलोचनः ।
आचक्ष्व मे महान्कोऽसौ राक्षसो यदि वा सुरः ॥६॥
न मयैवंविधं भूतं द्दष्टपूर्वं कदाचन ।
संपृष्टो राजपुत्रेण रामेणाक्लिष्टकर्मणा ॥७॥
बिभीषणो महाप्राज्ञः काकुत्स्थमिदमब्रवित् ॥८॥
बिभीषण रामांना कुंभकर्णाचे वर्णन सांगतो :
दीर्घ मुकुट अति दारुण । भयानक कुंभकर्ण ।
श्रीरामे देखोनि आपण । धनुष्यी बाण सज्जिला ॥८॥
नाही पूर्वी ऐकिला । नाही पुराणी परिसिला ।
अकस्मात दीर्घ दादुला । रामे देखिला एकाएकी ॥९॥
तेणे अतिशये विस्मित । बिभीषणा पुसे श्रीरघुनाथ ।
अति दिर्घ लंकेआंत । कोण दिसतो विक्राळ ॥१०॥
ज्याचे देखता उग्रपण । पळाले माझे वानरगण ।
मुकुट कुंडले पिंगट नयन । सांग हा कोण मजपासीं ॥११॥
ऐसे पुसतां रघुनाथ । बिभीषण बुद्धिमंत ।
कुंभकर्णाचा पूर्ववृत्तांत । असे सांगत श्रीरामा ॥१२॥
सैष विश्रवसः पुत्रः कुंभकर्णो निशाचरः ।
एतेन जातमात्रेण क्षुधितेन महात्मना ॥९॥
भक्षितानि सहस्त्राणि सत्वानि सुमहान्त्यपि ।
प्रजाभिः सह शक्रस्तुययौ स्थानं स्वयंभुवः ॥१०॥
कुंभकर्णस्य दौरात्म्यं शशंसुस्ते प्रजापतेः ।
प्रजानां भक्षणं चैव शशंसुस्ते दिवौकसः ॥११॥
एवं यदि प्रजा नित्यं भक्षयिष्यति राक्षसः ।
अचिरेणैव कालेन शून्यो लोको भविष्यति ॥१२॥
तो हा विश्रव्याचा पुत्र जाण । नांवे विख्यात कुंभकर्ण ।
येणे उपजातांचि जाण । केले भक्षण प्रजेचे ॥१३॥
शतसहस्र भूतावळी । प्रजा भक्षिल्या जन्माळी ।
तरी तृप्ति नव्हे आतुर्बळी । जिव्हा लळलळी हळहळित ॥१४॥
स्वर्गीचे भक्षी देवगण । मृत्युलोकींचे मानव जाण ।
सर्व पक्षी सिद्ध चारण । भक्षी संपूर्ण जीवजात ॥१५॥
ऐसा देखोनि भूतावर्त । प्रजा शक्रसमवेत ।
ब्रह्मयासीं गार्हाणे देत । भूते भक्षित कुंभकर्ण ॥१६॥
करावया भूतांचा घात । भला निर्मिला कुंभकर्ण नात ।
ब्रह्मसृष्टीचा क्षयार्थ । भोजनावर्त कुंभकर्ण ॥१७॥
कुंभकर्ण भोजनासाठीं । त्रिसप्तरात्रीं शून्य सृष्टी ।
हा करील उठाउठी । शक्र परमेष्ठी प्रार्थिला ॥१८॥
नित्य भक्षिता भूतानुकोटी । तृप्ति नव्हे याचे पोटी ।
भूतशून्य करील सृष्टी । पोटासाठीं कुंभकर्ण ॥१९॥
वासवस्य वचः श्रुत्वा सर्वलोकपितामहः ।
रक्षः समाह्वयामास कुंभकर्ण ददर्श च ॥१३॥
कुंभकर्णं समीक्ष्यैव विस्मितोऽभूत्प्रजापतिः ।
कुंभकर्णं महावीर्यं स्वयंभूरिदमब्रवीत् ॥१४॥
शयितो ह्येष षण्मासमेकाहं जागरिष्यति ।
असौ तु वीर एकान्हा क्षुधितो विचरन्मुवि ॥१५॥
आत्मना व्यसनेनाद्य कुंभकर्णो विबोधितः ।
त्वपराक्रमभीत्श्च राजा संप्रति रावणः ॥१६॥
कुंभकर्णाच्या अधाशीपणाला निर्बध म्हणून ब्रह्मदेवाचा शाप :
ऐसी एकोनि इंद्राची गोष्टी । सादर जाला परमेष्ठी ।
कुंभकर्ण पहावया दृष्टी । उठाउठी आणविला ॥२०॥
कराल विक्राळ दारुण । अति उग्र कुंभकर्ण ।
त्याचे देखोनि चतुरानन । विस्मयापन्न स्वये जाला ॥२१॥
पोटासाठीं भूतविघाती । निर्माण केला हा पौलस्ती ।
कुंभकर्णासी प्रजापती । शापोन्मुक्ती स्वये वदला ॥२२॥
मृतकल्प अति असोस । नित्य निद्रा तुज षण्मास ।
जागा होशी एक दिवस । त्यामाजी त्रास क्षुधेचा ॥२३॥
ब्रह्मशापे निद्रा पूर्ण । तो हा जाण कुंभकर्ण ।
तुजसी करावया रण । स्वये रावण उठविता झाला ॥२४॥
तुझेनि संग्रामे रावण । धाकेंचि सोडू पाहे प्राण ।
म्हणोनि तुजसी करावया रण । कुंभकर्ण उठविला ॥२५॥
त्यासी देखताचि जाण । वानर पळती घेवोनि प्राण ।
त्यासी संमुख करावया रण । नाही आंगवण कपींसीं ॥२६॥
इंद्र चंद्र कुबेर वरुण । विद्याधर सिद्ध चारण ।
कुंभकर्णे करोनि रण । रणी सुरगण जिंकिले ॥२७॥
दैत्य दुर्धर दानव । यक्ष राक्षस गणगंधर्व ।
पाताळपन्नग मानव । येणे सर्व जिंतिले ॥२८॥
या कुंभकर्णाची पाठी । कोणी देखिली नाही सृष्टी ।
देव दैत्य दानवकोटी । येणे रणसंकटी गांगिले ॥२९॥
ऐसा दुर्धर कुंभकर्ण । क्षुधेने पीडिला दारुण ।
भक्षावया वानरगण । येईल आपण आक्रोशे ॥३०॥
स एष क्षुधितो वीरो निर्गतः शिबिरात्खलु ।
वानरान्भृशसंक्रुद्धो भक्षयिष्यति वीर्यवान् ॥१७॥
विभीषणवचः श्रुत्वा हेतुमत्सुमुखोदतम् ।
उवाच राघवो वाक्यं नीलं सेनापतिं तदा ॥१८॥
गच्छ सैन्यानि सर्वाणि व्युह्य तिष्ठस्व पावके ।
द्वाराणि संक्रमांश्चैव लंकाया यूथपैः सह ॥१९॥
राघवेण समादिष्टो नीलो हरिचमूपतिः ।
शशास वानरानीकं यथावत्कपिकुंजरः ॥२०॥
लंकेचे निरोधन :
साक्षेंपें सांगे बिभीषण । अति खादाड कुंभकर्ण ।
भक्षावया वानरगण । येईल आपण संग्रामा ॥३१॥
ऐकोनि बिभीषणवचन । हासिन्नला रघुनंदन ।
मी असता कुंभकर्ण । वानरगण केंवी भक्षी ॥३२॥
एक एक वानरगण । गांजू शकती कुंभकर्ण ।
सर्व याची आंगवण । करिता रण कळेल ॥३३॥
देखोनिया मांसें मोठा । म्हणसी कुंभकर्ण लाठा ।
लागता वानरचपेटा । धाटामोटा घोळसिती ॥३४॥
आणोनि नीळ सेनापती । स्वमुखे सांगे रघुपती ।
वानरभार वीर जुत्पत्ती । सन्नद्ध स्थितीं सज्जावें ॥३५॥
शिळा शिखरें द्रुम पाषाण । पर्वतपाणी वानरगण ।
सन्नद्ध बद्ध सावधान । लंकाभवन रोंधावें ॥३६॥
आलिया रावण कुंभकर्ण । इंद्रजितासगट सैन्य ।
अवघ्या करीन रणकंदन । रघुकंदन गर्जत ॥३७॥
पळत्या देवोनि नाभिकार । दृढ सज्जिला वानरभार ।
अरे मी असता श्रीरामचंद्र । कपींसी मारुं कोण शके ॥३८॥
नीलें ऐकता श्रीरामवचन । पळत्या आले अति स्फुरण ।
भ्याडा शतधा आंगवण । रणी रावण गांजावया ॥३९॥
नीळ सेनापति आपण । स्वमुखें करिता गर्जन ।
ऐकोनि श्रीरामवचन । वानरगण हरिखले ॥४०॥
श्रीरामांचे आज्ञापन । दृढ रोधावें लंकाभवन ।
वानरी करोनि उड्डाण । त्रिकुटीं जाण वळंघले ॥४१॥
येरीकडे लंकेआंत । भेटावया लंकानाथ ।
हरिखें कुंभकर्ण जात । तोही कथार्थ अवधारा ॥४२॥
सौऽभिगम्य गृह भ्रातुः कक्षामभिविगाह्य च ।
ददर्शसीनमाविष्टं विमाने पुष्पके गुरुम् ॥२१॥
अथ दृष्ट्वा दशग्रीवः कुंभकर्णमुपस्थितम् ।
तूर्णमुत्थाय संहष्टः सन्निकर्षमुपानयत् ॥२२॥
अथासीनस्य पर्यंके कुंभकर्णो महाबलः ।
स जग्राह तदा भ्रातुः पाढौ राक्षसपुंगवः ॥२३॥
उत्पत्य चैव मुदितो रावणः परिषस्वजे ।
स भ्रात्रा संपरिष्वत्को यथावच्चाभिनंदितः ॥२४॥
कुंभकर्णस्ततो दिव्यं प्रतिपेढे वरासनम् ।
स तदासनमश्रित्य कुंभकर्णो महाबलः ॥२५॥
संरत्कनयनः कोधाद्रावणं वाक्यमब्रवीत् ॥२६॥
कुंभकर्ण रावणाला भेटतो :
कुंभकर्ण महाबळ । भ्रातृभेटीस उतावेळ ।
जाता सप्त द्वारपाळ । पाया सकळ लागती ॥४३॥
विमानसदृश सिंहासन । तेथे बैसला दशानन ।
त्यासी देखोनि कुंभकर्ण । लोटांगण घातले ॥४४॥
रावणे उठोनि आपण । हाती धरोनि कुंभकर्ण ।
आपणाजवळी आणून । आलिंगन दीधले ॥४५॥
पर्यंकारुढ रावण । त्याचे कुंभकर्णे आपण ।
मस्तकी वंदिले चरण । प्रेम संपूर्ण बंधूचें ॥४६॥
अतित्वरेनें रावण । सिंहासनींचा उठोन ।
पुढती दिधले आलिंगन । समाधान दोघांसी ॥४७॥
कुंभकर्ण दशानन । दोघीं देता आलिंगन ।
दोघें जाले सुखसंपन्न । समाधान दोघांसी ॥४८॥
ते वेळीं रावण उल्लासोन । आपल्या समसमान ।
कुंभकर्णासी वरासन । संतोषोन दीधलें ॥४९॥
तया आसनी कुंभकर्ण । बैसोनियां सावधान ।
संमुख करोनि दशानन । सादर प्रश्न पूसत ॥५०॥
किमर्थमहामत्राद्य त्वया राजन्प्रबोधितः ।
शंश कस्मद्भयं तेऽद्य को वा प्रेतो भविष्यति ॥२७॥
पर्वतांश्चूर्णयिष्यामि दारायिष्यमि मेदिनीम् ।
देवान्विद्धि वधिष्यामि त्रैलोक्ये पार्थिवानपि ॥२८॥
अद्य पश्यंतु भूतानि भक्ष्यमाणानि सर्वशः ।
सोऽद्य तृप्ति गमिष्यामि भक्षयित्वा सुरासुरान् ॥२९॥
कुम्भकर्णवचः श्रुत्वा जहषे रावणस्तदा ।
पुनर्जातमिवात्मानं मेने स रजनीचरः ॥३०॥
रावणाला कुंभकर्ण उठविण्याचे कारण विचारतो :
रावणांसी पुसे कुंभकर्ण । मज उठवावया काय कारण ।
कोण भय आले दारुण । मजलागून ते सांगे ॥५१॥
तुजलागीं लंकानाथा । सुरासुरांच्या करीता घाता ।
चूर्ण करींन पर्वतां । पृथ्वी आता विदारीन ॥५२॥
जरी एक अपराध केला । तो जाण पा प्रेतत्वा गेला ।
माझेनि हातें रणी निमाला । संशय या बोला धरुं नको ॥५३॥
देव दानव मानव । यक्ष किन्नर गंधर्व सर्व ।
भूते गिळोनि सावयव । प्रतापगौरव पाहे माझे ॥५४॥
सुरासुर भक्षून येथ । सहसा मी नव्हे तृप्त ।
पुढे माझा कार्यार्थ । सावचित्त अवधारी ॥५५॥
तुझे वैरी जे समस्त । भक्षावया मी अति क्षुधित ।
जे जे भक्षूं सांगसी येथ । ते तेंस त्वरित गिळीन ॥५६॥
ऐकोनि कुंभकर्णाचे वचन । हरखिला दशानन ।
मरोनि वांचलो आपण । नवा जन्म जाण कुंभकर्णा ॥५७॥
अयं ते सुमहन्कालः शयानस्य निशाचर ।
स्वपितस्त्वं न जानीषे मम रामान्महद्भयम्॥३१॥
एष दाशरथी रामः सुग्रीवसहितो बली ।स
मुद्रं लंघयित्वा तु कुलं नः परिकृंतति ॥३२॥
न देवासुरनागेभ्यो गंधर्वेभ्यःकदाचन ।
भूतपूर्वं भयं तादृग्यादृशं मानुषादिदम् ॥३३॥
रावणाचे कुंभकर्णाला कथन :
ऐके कुंभकर्णा सावधान । तुवा निद्रा केलिया जाण ।
मज श्रीरामभय दारुण । जागृति स्वप्न सुषुप्तीं ॥५८॥
श्रीरामबाणीं रणर्दित । अहर्निशी धुकधुकित ।
श्रीरामे माझा प्राणात । जाण निश्चित कुंभकर्णा ॥५९॥
अश्व ध्वज रथ सारथी । छेदोनि मुकुत पाडिला क्षिती ।
विरथी केले मज क्षीणशक्ती । रणी रघुपति न मारीच ॥६०॥
श्रीराम कृपा संपूर्ण । सांपडला न घेच प्राण ।
देवोनियां जीवदान । रणी रावण सोडिला ॥६१॥
अति गर्वी मी लंकानाथ । मोकळा केशीं करोनि विरथ ।
आणि नागवा हळहळित । लंकेआंत धाडिला ॥६२॥
पूर्वी ऐसा अपमान । दानव मानव सुरगण ।
त्याहीपासून अति दारुण । नाही अपमान देखिला ॥६३॥
न भूतपूर्व अपमान । स्वप्नी न देखे दशानन ।
तैसाही श्रीरामे गांजून । तृणासमान मज केले ॥६४॥
आणिक एक नवल जाण । समुद्री तारुन पाषाण ।
करोनिया सेतुबंधन । आला आपण लंकेसी ॥६५॥
त्याच्या सेतूच्या परिपाठी । लंके आल्या वानरकोंटी ।
दूर्ग वेढिले मर्कटीं । आपले दृष्टी पाहे पा ॥६६॥
वनी उपवनीं वानरथाटी । दुर्गी झोंबती कोट्यनुकोटी ।
पैल पाहे लंकात्रिकटीं । वीर जगजेठी वळंघले ॥६७॥
करिता वानरांसी रण ।विरुपाक्ष अकंपन ।
प्रहस्त मारिला प्रधान । न लागता क्षण वानरी ॥६८॥
येवढाले महावीर । युद्धा आलिया दुर्धर ।
नुठी श्रीराम ना सौमित्र । केला रणमार वानरी ॥६९॥
सुग्रीव अंगदादि कपिपती । हेही नाहीम् आले युद्धार्थी ।
वानरी लावोनियां ख्याती । तिघे पुरुषार्थी मारिले ॥७०॥
विरुपाक्ष अकंपन । एके हनुमंते मारिले जाण ।
नीळे प्रहस्त प्रधान । न लागता क्षण निर्दळिला ॥७१॥
नीळे मजसी करिता रण । मज केले तृणासमान ।
गाढी वानराची आंगवण । निधडे दारुण संग्रामी ॥७२॥
ये राक्षसा मुख्यतमा हतास्ते युधि वानरैः ।
वानराणां क्षयं युद्धे न पश्यामि कदाचन ॥३४॥
रावणाचे आश्चर्य कथन :
मुख्य धुरेंसी निशाचर । वानरी मारिले अपार ।
एकही न मरेचि वानर । रण दुर्धर करितांही ॥७३॥
घायीं जर्जर वानरभुज । लाविती श्रीरामचरणरज ।
सवेंचि उठोनि कपिसमाज । नाचती भोजें रणरंगी ॥७४॥
अपार मरती निशाचर । एकही न मरेचि वानर ।
हेंचि मज आश्चर्य थोर । दशशिर सांगत ॥७५॥
तुम्हा श्रीरामामाजी जाण । वैर पडावया काय कारण ।
ऐसे पुससी जरी आपण । तरी समूळ निरुपण ऐकावे ॥७६॥
पुरा त्वं नाभिजानीषे यदा सीता मया हृता ।
सीताहरणसंतप्ताद्रामान्मे सुमहद्भयम् ॥३५॥
हंतावेक्षस्व लंकाया वनान्युपवनानि च ।
सेतुना सुखमागम्य वानरैकार्णवं कृतम् ॥३६॥
नगरं शत्रुणा रुद्धं हता युद्धे सुहृज्जनाः ।
कोशश्च क्षयितः सर्व स त्वमद्य प्रपश्यताम् ॥३७॥
त्रायस्वेमां पुरी लंकां बालवृद्धवशेषिताम् ।
भ्रातुरर्थे महाबाहो कुरु साहाय्यमुत्तमम् ॥३८॥
मयैवं नोत्कपूर्वी हि भ्रातः कश्चित्परंतप ।
त्वय्यस्ति तु मम स्नेहःपरा संभावना च मे ॥३९॥
सीताहरण केल्याने श्रीराम ससैन्य लंकेवर
चालून आल्याचे रावण कुंभकर्णाला सांगतो :
तुंवा निद्रा केलिया जाण । पंचवटीं जावोनि आपण ।
मारीच मृगे करोनि छळण । सीताहरण म्या केले ॥७७॥
तेणे रागे रघुनंदन । मेळवोनि वानरसैन्य ।
करोनिया सेतुबंधन । बळवाहन लंके आला ॥७८॥
लंके यावया रघुनंदन । मुख्य द्वंद्वी वायुनंदन ।
विध्वंसोनि अशोकवन । राक्षसकंदन तेणे केले ॥७९॥
मारिले वनकर किंकर । पंच सेनानी प्रधानपुत्र ।
मारिला जंबुमाळी महावीर । अखया कुमर मुख्यत्वें ॥८०॥
अखया कुमरकैवारार्थ । युद्धा जाता इंद्रजित ।
रणी करोनि हताहत । केला निःपात सैन्याचा ॥८१॥
ब्रह्मपाशाचिये गती । लंके आणिला मारुती ।
तेणे केली अति ख्याती । सांगो किती सुबंधो ॥८२॥
जाळोनियां लंकाभवन । मजही देवोनि अपमान ।
असंख्य राक्षस मारुन । गेला निघोन किष्किंधे ॥८३॥
किष्किंधे जावोनि आपण । घेवोनि आला रघुनंदन ।
निरोधोनि लंकाभवन । माझे कंदन करु आला ॥८४॥
पूर्वी ऐसा काकुलती । नाही आलो कोणाप्रती ।
तू सखा बंधु रणसाह्यार्थी । यालागी तुजप्रती सांगितले ॥८५॥
सेतुद्वारा वानरवीर । येवोनि वेढिलें स्वनर ।
विध्वंसिले लंकापुर । द्वारे द्वार रोधूनी ॥८६॥
विध्वंसोनि लंकाभवन । रणी मारिले सुहृज्जन ।
ठेविले ठायी भांडार क्षीण । जाले जाण सुबंधो ॥८७॥
दुर्धर आम्हा आले विघ्न । माझे करी पा संरक्षण ।
लंका रक्षावी आपण । बाळें वृद्धजन कुळ रक्षी ॥८८॥
तुझ्या भुजांची मज आस । तुझा अति विश्वास ।
शत्रुसमुदाय करोनि ग्रास । दुःखक्लेश निवारी ॥८९॥
रणी गांगिलों संपूर्ण । त्वा साह्य करावे आपण ।
ऐसे सांगता रावण । आले रुदन अनिवार्य ॥९०॥
तू तव पराक्रमी परम । माझा निरसीं सकळ श्रम ।
साह्य करी अति उत्तम । सुखसंभ्रम जेणे वाढे ॥९१॥
ऐसी हे समूळ कथा । सांगितली यथार्थता ।
वैरासी मुख्य कारण सीता । जाण तत्वता सुबंधो ॥९२॥
प्रयासीं केले सीताहरण । ते त्वा भोगिली आपण ।
नाही म्हणता रावण । पुसे कुंभकर्ण छळणोक्ती ॥९३॥
कि कार्यं प्रतिबोधितो वद सखे रामांगनास्त्याहृता ।
सा भक्ता नहि कि यतो न रमते रामात्परं जानकी ॥
रामाः कि भवितासि नो शृणु सखे तारामलं श्यामलम् ।
रामांगं भजतो ममापि कपटो भावो हि संशाम्यति ॥
कुंभकर्णाचे प्रतिवचन व सूचना :
कुंभकर्ण म्हणे लंकानाथा । मज उठविलें कोण्या अर्था ।
सीताहरण दुःखावस्था । तुज तत्वता सांगावया ॥९४॥
हरुनि आणिली जे सीता । ते त्वा भोगिली लंकानाथा ।
रामावांचून सर्वथा । आणिकेंसीं सीता रमेना ॥९५॥
रुपरेखा लक्षलक्षण । हावभाव कताक्ष गुण ।
चाप सज्जोन ठाणमाण । गंभीर गहन विन्यासें ॥९६॥
श्यामसुंदर कमलनयन । श्रीराम होवोनि आपण ।
सीता न भोगावया काय कारण । कुंभकर्ण पूसत ॥९७॥
नानापरींच्या लंकानाथा । मावा जाणसी समस्ता ।
श्रीराम होवोनि भोगितां सीता । विलंबता का केली ॥९८॥
कुंभकर्णा ऐक आता । तुज मी सांगेन तत्वता ।
माव न चले श्रीरघुनाथा । छळणें सीता न भोगवे ॥९९॥
मज स्वये श्रीराम होता । कैंचा राम कैंची सीता ।
ठाव नाही लंकानाथा । भोग्य भोक्ता असेना ॥१००॥
नाही तेथे ध्येय ध्याता । नाही तेथे कर्म कर्ता ।
समूळ तेथे नाही सीता । नाही भोक्ता रावण ॥१॥
नाही द्रष्टा दृश्य दर्शन । नाही धर्माधर्मलक्षण ।
नाही कर्म क्रिया आचरण । मीतूंपण असेना ॥२॥
श्रीराम होता इत्यंभूत । जनी विजनी श्रीरघुनाथ ।
भूतमहाभूतें समस्त । सदोदित श्रीराम ॥३॥
श्रीराम जीवन पावन । श्रीरामही हुताशन ।
श्रीराम दशदिशा आपण । जग संपूर्ण श्रीराम ॥४॥
ऐसे मज श्रीराम होता । समूळ तेथे नाही सीता ।
काय म्या भोगावें गा आता । रावण भोक्ता असेना ॥५॥
ऐकता रावणाचे वचन । कुंभकर्णा आले रुदन ।
श्रीराम परब्रह्म परिपूर्ण । कुळनिर्दळण विरोधे ॥६॥
माया बाधेना श्रीरघुनाथा । कपटें भोगवेंना सीता ।
ऐसे कळोनि लंकानाथा । विरोध वृथा का करिसो ॥७॥
कपटे श्रीराम स्वये होता । पावली पूर्ण अगाधता ।
त्यांसी सप्रेम भावे भजता । स्वानंदता सुखवास ॥८॥
समुद्री तारिले पाषाण । त्यांसी अवश्य रिघावे शरण ।
सखा करोनि रघुनंदन । सुखसंपन्न नांदावे ॥९॥
श्रीरामस्वरुपाची प्रतीती । तुज बाणली लंकापती ।
विरोध सांडोनिया चित्ती । शरण रघुपती निघावें ॥१०॥
रामासीं निघाल्या शरण । स्वप्नी नाही जन्ममरण ।
विघ्नचि हो निर्विघ्न । सुखसंपन्न नांदावे ॥११॥
शरण रिघाल्या श्रीरघुनाथा । भयचि होय निर्भयता ।
सख्य केलिया काकुत्स्था । अति श्लाघ्यता तिही लोकी ॥१२॥
स तु श्रुत्वा महाराजः कुम्भकर्णस्य भाषितम् ।
भृकटिं चैव संचके क्रुद्धश्चैवमुवाच ह ॥४१॥
मान्यो गुरुरिवाचार्यः कि मां त्वमनुशाससि ।
किंवा कृच्छ्रगतं कर्तुंकालयुक्तं विधीयताम् ॥४२॥
अस्मिन्काले तु यद्युक्तं तदिदानीं विचिन्त्यताम् ।
ममापनयजं दुःखं विक्रमेण समीकुरु ॥४३॥
क्रुद्धोऽयमिति विज्ञाय शनैः श्लक्ष्ण्मुवाच ह् ।
कुम्भकर्णः शनैर्याक्यं बभाषे परिसांत्वयन् ॥४४॥
रावणाचा उद्वेग व क्रोधाविष्कार :
शत्रु मर्दिंल कुंभकर्ण । उल्लासें प्रबोधी रावण ।
तो म्हणे रामा निघावे शरण । तेणे उद्विग्र लंकेश ॥१३॥
श्रीरामा निघावें शरण । निश्चय वदला बिभीषण ।
तैसेंचि वदला कुंभकर्ण । तेणे रावण अति दुःखी ॥१४॥
ऐकता कुंभकर्णउत्तर । रावण कोपला दुर्धर ।
नेत्र भोवंडी चक्राकार । भृकुटी विक्राळ सक्रोध ॥१५॥
कुंभकर्णी सुनी दृष्टी । रावणे भंवयां दिधली गांठी ।
क्रोधे खवळला पोटी । वदता गोष्टी साशंक ॥१६॥
क्रोधानुवादें कुंभकर्ण । बिभीषणाऐसा आपण ।
श्रीरामासी गेलिया शरण । मग रक्षण मज कैंचें ॥१७॥
यालागी स्वये दशानन । निजक्रोधातें आंवरुन ।
कुंभकर्णासी मृदु वचन । कोपयामान अनुवादे ॥१८॥
जेंवी का शिष्यांसी नेमून । सद्गुरु करी आज्ञापन ।
तैसाचि तू मजलागून । निग्रहून वदतोसी ॥१९॥
मी ज्येष्ठ तू कनिष्ठ । ही सांडोनि नीट वाट ।
धरोनि जाणिवेचा लोट । गुरुत्वे स्पष्ट नेमिसी मज ॥२०॥
शत्रु निर्दाळिसी करोनि रण । तुझा भरंवसा होता पूर्ण ।
शेखी श्रीरामा निघावें शरण । निग्रहून वदतोसी ॥२१॥
बहु बोलाचे काय कारण । उचित काळ अनुलक्षुन ।
माझिया साह्यालागीं जाण । करावे रण रामासीं ॥२२॥
बहुता दिवसांचा क्षुधित । उठलासि निद्रिस्थ ।
श्रीरामवानरांचा घात । करी निःपात निजभक्षें ॥२३॥
कुंभकर्णाचे रावणाला प्रत्युत्तर :
कुंभकर्ण अति सज्ञान । कोपला देखोनि रावण ।
त्यासी द्यावया समाधान । काय आपण अनुवादे ॥२४॥
श्रीरामेंसी नरवानरां । देखोनिया दशशिरा ।
मीच कांपतो थरथरा । मृत्यु खरा हा आम्हा ॥२५॥
नारदाचे त्रिसत्य सत्य वचन । सुटल्या श्रीरामाचे बाण ।
रावण इंद्रजित कुंभकर्ण । कुळनिर्दळण राक्षसा ॥२६॥
त्रिसत्य सत्य नारदवचन । तुज त्यासी कोठे दर्शन ।
कैसे केले संभाषण । पुसे रावण साक्षेपे ॥२७॥
एका जनार्दना शरण । नारदइतिहासलक्षण ।
हे मुळींचे रामायण । सावधान अवधारा ॥२८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणकुंभकर्ण संवादो नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥
ओव्या ॥१२८॥ श्लोक ४४ ॥ एवं ॥१७२॥
