(डाकाचे रूपक)
3911.
(डाकाचे रूपक)
चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धावोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन ॥धृपद॥
रजतम धुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धावती झडकरी ॥२॥
मन मारोनिया मेंढा मुठी । आशा मनसा तृष्णा सुटी ।
भक्तिभाव नैवेद्य ताटी । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करी तुकयासी ॥४॥
अर्थ :
अंत:करणरुपी आसनावर मी चौकभरणी करुन कुलस्वामीनीला पाचारण केले आहे. ते असे की, हे वैकुंठवासीनी तू लवकर माझ्याकडे धावत यावेस. हे श्रीरंगे विठाबाई तू लवकर ये तुझे सावळे स्वरुप मी माझ्या डोळयाने, तुझे साजिरे गोजिरे श्रीमुख मी माझ्या डोळयाने केव्हा पाहिन असे झाले आहे. रजतमाची धूपारती, पंचप्राणांची आरती, इत्यादी सर्व सामग्रीची तयारी मी करुन ठेवली आहे त्यामुळे तू लवकर माझ्याकडे धावत यावेस. मनरुपी मेंढा म्हणजे बोकड एका बुक्कीत मारुन त्यातील आशा, मनीषा, तृष्णा या बाजूला फेकून दिल्या आहेत. आणि भक्तिभावपूर्वक मी ताटामध्ये नैवेद्य ठेवून तुला हाकारा दिला आहे. हाकारा दिला म्हणजे तुला हाक मारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कानामध्ये अनुहात ध्वनीचा डंका अखंड चालू आहे त्यामुळे तू माझ्या अंगामध्ये येऊन संचार कर. तू तुझी पूजा आणि नैवेद्य घेऊन मला निरोगी कर भवरोगातून मुक्त कर.
