अग्निमाजी गेले । अग्
1991.
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥
काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥धृपद॥
लोह लागे परिसा अंगी । तोही भूषण जाला जगी ॥२॥
सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनी जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वसे । तृण चंदन जाले स्पर्शे ॥४॥
तुका म्हणे जवळा संता पायी । दुजेपणा ठाव नाही ॥५॥
अर्थ :
अर्थ : –एखादी वस्तू आगीत पडली असता ती पण जळू लागते आणि थोड्याच वेळात ती वस्तूदेखील अग्निस्वरूप होऊन जाते मग त्या वस्तूला आधीचे वस्तूपण उरत नाही, एवढेच काय तर तिचे नांव आणि गुण देखील मागे उरत नाही. त्याप्रमाणेच एकदा का लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे त्वरित सोन्यात रूपातर होते, एवढेच नव्हे तर त्याचे मोल वाढते आणि ते जगी भूषण ठरते. त्याच न्यायाने एकदा का नदीनाले आणि ओघ-ओहोळ गंगेला मिळाले की त्यांचे पहिले अस्तित्व आणि ओळख जाऊन त्या गंगास्वरूपच होऊन जातात व चंदनाच्या संगतीत राहून इतर वृक्षांना देखील चंदनाचा सुगंध येऊ लागतो त्यामुळे नक्की चंदनाचे झाड कोणते ते अंती ओळखणे कठीण होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात की माझे देखील तसेच झाले आहे, संतांच्या चरणांची सेवा करता करता, त्यांच्या पायाचा स्पर्श मला झाला आणि मी देखील संतरूपच होऊन गेलो व त्यामुळे आता दुजेपणा मला नावाला देखील उरला नाही.
