पाळितो वचन । परि बहु
2704.
पाळितो वचन । परि बहु भीते मन ॥१॥
करितो पायाशी सलगी । नये बैसो अंगसंगी ॥धृपद॥
जोडोनिया कर । उभे असावे समोर ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥
अर्थ :
हे संतजनहो मी तुमचे वचन आज्ञा म्हणून पाळतो परंतू माझ्याकडून काही चुकले आहे काय म्हणून माझे मन फार भीत आहे. मी तुमच्या पायाजवळ बसलो आहे तुमच्या बरोबरीला किंवा तुमच्या अंगसंगतीला मी बसू शकत नाही कारण माझा तेवढा अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो मी हात जोडून तुमच्यासमोर उभे असावे हेच माझे मुख्य कर्तव्य आहे. कारण तुम्ही संत आहात आम्ही फारच पतित आहे.
